कर्जत ः बातमीदार
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील 15 दिवसांपासून सुरू असलेले लॉकडाऊन वाढविण्यात आले आहे. अशा वेळी समाजातील स्तनदा माता आणि गरोदर महिलांच्या अतिरिक्त पोषण आहाराचा प्रश्न समोर आला होता, मात्र तालुक्यातील 135 अंगणवाड्यांमधील स्तनदा माता, गरोदर महिला आणि बालकांना घरपोच पोषण आहार पोहचवला जात आहे. डॉ. अब्दुल कलाम अमृत आहार योजना या माध्यमातून समाजाच्या कामाला आली असून त्यांच्या अंगणवाडीसेविका आणि मदतनीस या अन्न बनवून घरपोच पोहचवत आहेत. कर्जत तालुक्यात असलेल्या 330 अंगणवाड्यांमधील कारभार ठप्प झाला आहे. शाळा-कॉलेजप्रमाणे अंगणवाडीमध्येदेखील बालके येत नाहीत, मात्र यात कर्जत तालुक्यातील आदिवासी भाग अपवाद असून तालुक्यातील 135 अंगणवाड्यांमध्ये संभाव्य कुपोषण रोखण्यासाठी शासनाने खास बाब म्हणून सुरू केलेली डॉ. अब्दुल कलाम अमृत आहार योजना मदतीला आली आहे. कर्जत तालुक्यातील आदिवासीबहुल भागात आणि डोंगरपट्ट्यात असलेल्या भागात कुपोषणाचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे त्या भागाचा समावेश अमृत आहार योजनेमध्ये आदिवासी विकास विभागाच्या उपविभागात येत असलेल्या 130 अंगणवाड्यांचा समावेश आहे. त्या अंगणवाड्यांमधील बालकांना तसेच स्तनदा माता आणि गरोदर महिलांना अमृत आहार योजनेमधून अतिरिक्त आहार दिला जातो. त्या भागातील कुपोषणाचे प्रमाण आणि पार्श्वभूमी लक्षात घेऊन शासनाने त्या विभागाला अमृत आहार योजनेमधून अतिरिक्त आहार देण्याचा निर्णय घेतला. अतिरिक्त आहारात स्तनदा माता आणि गरोदर महिलांना सकस आहार म्हणून जेवण, तर अंगणवाडीमधील बालकांना त्यांच्या दररोजच्या पोषण आहारासह अंडी आणि केळी यांचा अतिरिक्त आहार दिला जातो.
आम्ही अमृत आहार योजना 100 टक्के कोणताही खंड न पडता राबवत आहोत. शासन निर्देशाप्रमाणे सात महिने ते सहा वर्षे वयोगटातील बालकांसाठी ही योजना राबविली जाते. 130 अंगणवाडी केंद्रांत स्तनदा माता व गरोदर महिलांना अतिरिक्त पोषण आहार पोहचवला जात आहे. आमच्या सेविका स्वतःची काळजी घेऊन वेळ मिळताच त्या त्या अंगणवाडी क्षेत्रात जनजागृती मोहीम राबविण्याचे कामही करतात.
-निशिगंधा भवाळ, प्रकल्प अधिकारी, कर्जत