Breaking News

पोटदुखी

घरात जन्मलेले तान्हे बाळ जेव्हा दोन-तीन आठवड्यांचे होते, तेव्हा एके  दिवशी संध्याकाळी अचानक किंचाळून रडायला लागते. पाय पोटावर घेऊन कण्हायला लागते. बाळाचे हे रडणे दोन-तीन तास चालूच राहते आणि तेव्हा ते दूधही पीत नाही. बाळाला डॉक्टरांकडे घेऊन गेल्यावर तपासणीअंती डॉक्टर तुम्हाला सांगतील की, हे रडणे पोटदुखीमुळे आहे. याच्यावर औषधांचा खूप परिणाम होणार नाही. हा त्रास बाळाला वारंवार होऊ शकतो व चार महिन्यांनंतर तो आपोआप बंद होईल.

दरम्यान, पालकांनी काही धोक्याची लक्षणे आढळल्यास (जसे की पोट फुगणे, शीमधून रक्त जाणे, बाळ सुस्तावणे) लगेच डॉक्टरांशी संपर्क साधावा. लहान मुलांमध्ये वयोगटानुसार पोटदुखीची कारणे वेगवेगळी असतात. त्यामधील जंतुसंसर्ग (जीवाणू, विषाणू, अमिबा) आणि अन्नातून विषबाधा कोणत्याही वयात होऊ शकते. पोटदुखीबरोबरच जुलाब, उलट्या, ताप ही लक्षणे त्यामध्ये जाणवतात. हे टाळण्यासाठी बाहेरचे, उघड्यावरचे अन्नपदार्थ मुलांना देऊ नयेत. पावसाळ्याच्या दिवसांत लहानग्यांना पाणी उकळून द्यावे. जुलाबामध्ये औषधोपचारांबरोबर क्षारसंजीवनी देऊन अतिसाराचा धोका टाळावा. बद्धकोष्ठता हे एक वरचेवर आढळणारे पोटदुखीचे कारण आहे. ते टाळण्यासाठी मुलांना सकस आणि तंतुमय पदार्थांनी युक्त आहार घेण्यास आणि भरपूर पाणी पिण्यास प्रोत्साहित करावे. आहारामध्ये फळे व भाज्यांचा समावेश करावा. जंकफूडचे सेवन टाळावे. याबरोबर काबरेनेटेड कोल्ड्रिंक्स, फळांचे तयार रस, अतितेलकट, तूपकट, तिखट पदार्थ मुलांपासून लांबच ठेवावेत. दिवसातील एक-दोन तास तरी मुलांनी बाहेर खेळले पाहिजे वा व्यायाम केला पाहिजे.

काही मुलांमध्ये पोटदुखीसाठी अन्नघटकांची अ‍ॅलर्जी, अपचन कारणीभूत ठरते. अंडी, मासे, गायीचे दूध, शेंगदाणा, काजू, सोयाबीन हे काही अ‍ॅलर्जीकारक सर्वसामान्य घटक आहेत. यामध्ये पोटदुखीबरोबर गॅस, उलट्या, जुलाब, अंगावर पुरळ येऊन खाज येणे असे काही त्रास संभवतात. अ‍ॅलर्जी असल्यास योग्य ते औषधोपचार घेऊन संबंधित पदार्थांचे सेवन टाळावे, तसेच दूध व फळांचा रस अतिप्रमाणात टाळावा.

काही मुलांमध्ये हा पोटदुखीचा त्रास वारंवार होतो. याचे कारण सापडत नाही. या मुलांच्या वाढीवर वा रोजच्या दिनक्रमावर याचा परिणाम होतो. शाळा व घरामध्ये काही अडचण असल्यास अगदी तीन ते आठ वयोगटांतील मुलेही मानसिक ताण-तणावाखाली असतात. त्याचे रूपांतर पोटदुखीत होते. यालाच ‘फंक्शनल अ‍ॅबडोमिनल पेन’ म्हणतात. पालकांनी मुलांसमोरच पोटदुखीचा बागुलबुवा न करता मुलांचे लक्ष दुसरीकडे वळवावे. मुलांचा दैनंदिन उपक्रम नियमितपणे सुरू ठेवावा. शाळेत आणि घरात असलेल्या तणावयुक्त बाबींचा शोध घेत शाळेतील शिक्षक व मुलांशी सुसंवाद साधत यातून मार्ग काढावा.

Check Also

आमदार महेश बालदींच्या उपस्थितीत विविध पक्षांतील कार्यकर्ते भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी यांचे सक्षम नेतृत्व मान्य करून व विकासात्मक धोरणावर …

Leave a Reply