Breaking News

आशेचे किरण

कोरोनाच्या प्रादुर्भावाचे यशस्वी व्यवस्थापन करणार्‍या देशांकडे भारताचे चांगले लक्ष आहे. इतरांकडील परिस्थितीतून आपल्याला काही शिकता येईल का, आपल्याकडील परिस्थिती अधिक शिताफीने नियंत्रणात आणण्याकरिता त्याचा काही वापर करता येईल का, याकडे आपली सरकारी यंत्रणाही बारकाईने लक्ष ठेवून आहे. कोरोना विषाणूचे जवळपास अवघ्या जगभरात थैमान सुरू आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये. काही हाताच्या बोटांवर मोजण्याइतपतच देशांनी नेमकी दक्षता बाळगून कोरोनाला आपल्या भूमीवर शिरकावच करू दिलेला नाही वा कोरोनाचा शिरकाव झाल्यावरही त्यांनी शिताफीने परिस्थिती नियंत्रणाखाली आणली आहे. साधारणपणे कमी लोकसंख्येच्या, लहान आकाराच्या काही देशांना यात यश मिळाले आहे असे दिसते. न्यूझीलंड हा अशाच देशांपैकी एक आहे. या देशातील नव्या कोरोनाबाधितांची संख्या आता एक आकडी उरल्याने या देशाने आनंद व्यक्त केला आहे. गेले पाच आठवडे कसोशीने सारे निर्बंध पाळल्यामुळेच हे यश मिळाले आहे, असे तिथल्या सरकारने म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यातून भारतीयांना नक्कीच सकारात्मक संदेश घेता येऊ शकतो. आज लॉकडाऊन जाचक जरूर वाटत आहे, पण यातूनच आपणही कोरोनाला आपल्या भूमीवरून हद्दपार करू शकू. न्यूझीलंडमध्ये या आठवड्यात एकच नवा कोरोनाबाधित रुग्ण आढळला असून संशयित रुग्णांची संख्या चार इतकी आहे. कोरोनामुळे या काळात तिथे फक्त एकच व्यक्ती दगावली आहे. हे आकडे दिलासादायक असले तरी आपण आपली दक्षता मात्र कमी करायची नाही, असेही तिथल्या सरकारने जनतेला बजावले आहे. निर्बंध आता काहिसे शिथिल करीत न्यूझीलंडच्या सरकारने निर्बंधांची पातळी चारवरून तीनवर नेली आहे, मात्र यानंतरही पुन्हा केसेस आढळू शकतील. तसे झाल्यास ते अपयश न म्हणता आपण पुन्हा आक्रमकपणे त्या केसेसचे व्यवस्थापन करू आणि पुन्हा ती संख्या खाली नेऊ याचीही तयारी त्यांनी ठेवली आहे. जगभरात सगळीकडेच सोशल डिस्टन्सिंग हा परवलीचा शब्द बनला आहे. पब, बार, हॉटेल्स आणि शाळा-कॉलेजेस बहुतेक सर्व देशांमध्ये बंद आहेत. अमेरिका, इटली, स्पेन आदी देशांमधील परिस्थिती कुणाच्याही मनात भीती निर्माण करील अशीच होती आणि आहे, परंतु त्यातही परिस्थितीत थोडीफार सुधारणा होताच याही देशांमध्ये दिलासा देणारे बदल केले जाताना दिसत आहेत. स्पेनमध्ये लोकांच्या प्रचंड मागणीनंतर अलीकडेच लहान मुलांना पालकांसोबत फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडण्याची अनुमती देण्यात आली. चीनमधीलही काही भागांमध्ये मुले शाळेत जाऊ लागली आहेत. आपल्याकडेही कालांतराने का होईना व किमान काही भागांमध्ये तरी जनजीवन पूर्ववत होऊ शकेल असे म्हणायला हरकत नाही. अर्थातच त्या दिशेने पावले उचलताना आपल्यालाही खबरदारी व दक्षता बाळगण्याची खूणगाठ मनोमन बांधावी लागेल. जिथे कोरोनाचे नवे रुग्ण सापडलेले नाहीत वा जिथे मुळातच कोरोनाचा शिरकाव झालेला नाही अशा भागांमध्येच हे शक्य होणार आहे हेही लक्षात घ्यायला हवे. या भागांना आहे तसेच सुरक्षित राखणे ही आपली सगळ्यांचीच जबाबदारी आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठात कोरोनावरील लसीच्या मानवी चाचण्यांना सुरुवात झाली आहे. भीती आणि अनिश्चितता मनाला व्यापून उरण्याच्या या दिवसांमध्ये या काही मोजक्या घडामोडी निश्चितच मनाला दिलासा देतात. पुढील पावलांचे बळ त्यातूनच मिळवायचे आहे.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply