
गव्हाण : प्रतिनिधी
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन राज्यात विद्यार्थी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेजमध्येही गुरुवारी (दि. 7) विद्यार्थी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सातारा येथील राजवाडा परिसरातील तत्कालीन गव्हर्नमेंट हायस्कूलमध्ये 7 नोव्हेंबर 1900मध्ये इंग्रजी पहिलीच्या वर्गात प्रवेश घेतला होता. या महान ज्ञानोपासकाचा शाळा प्रवेश दिन सर्व विद्यार्थ्यांना सदैव प्रेरणादायी ठरावा या हेतूने राज्यभर हा दिवस ’विद्यार्थी दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. गव्हाण विद्यालयाच्या प्रांगणात सांस्कृतिक विभागाच्या वतीने इ.6वी ब या गुरुकुल वर्गाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या या विद्यार्थी दिन कार्यक्रमाचे अध्यक्षपद प्राचार्या साधना डोईफोडे यांनी भूषविले. या वेळी पर्यवेक्षक दीपक भर्णूके यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकणारे भाषण झाले. इ.6वी ब च्या विद्यार्थिनी कुंजुम कोळी, कायनाथ अन्सारी यांनी हिंदीतून, तर आर्या पाटील हिने इंग्रजी भाषेतून आपले मनोगत व्यक्त केले. उपमुख्याध्यापक राजकुमार चौरे, पर्यवेक्षक दीपक भर्णूके, संस्थेचे नवनियुक्त आजीव सदस्य प्रमोद कोळी, अटल टिंकरिंग लॅब प्रमुख रवींद्र भोईर, ज्युनिअर कॉलेज विभागप्रमुख प्रा. बी. पी. पाटोळे, गुरुकुल प्रमुख संदीप भोईर, इ.6 वी ब या गुरुकुल वर्गाच्या वर्गशिक्षिका पी. एस. पाटील, प्रा. राजू खेडकर, प्रा. राजेंद्र चौधरी यांच्यासह विद्यार्थी व शिक्षक या कार्यक्रमाला उपस्थित होते. विद्यालयाच्या सांस्कृतिक विभागप्रमुख ज्योत्स्ना ठाकूर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन शिवांजली खरात यांनी केले. चिरायू कोळी या विद्यार्थ्याने आभार मानले.
RamPrahar – The Panvel Daily Paper