शहरी भागात प्रामुख्याने प्रादुर्भाव झालेल्या कोरोनाने आता ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणावर हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात असलेल्या करंजा गावात एकदाच 21 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. जिल्ह्याच्या अन्य भागांतही रुग्ण वाढत असल्याने चिंता व्यक्त होत आहे.
कोरोना विषाणू हळुहळू आपला देश व्यापत आहे. काही राज्यांचा अपवाद वगळता बहुतांश ठिकाणी कोरोनाने आपली दस्तक दिल्याचे चित्र आहे. देशभरात महाराष्ट्रामध्ये कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे, तर राज्यातील रुग्णसंख्येत मुंबईने गाठलेले अव्वल स्थान कायम आहे. मुंबईपासून जवळच असलेली नवी मुंबई तसेच रायगड जिल्ह्यातही संसर्ग वाढू लागला आहे. यापूर्वी शहरी पट्ट्यात रुग्ण आढळून येत होते, मात्र अलिकडे ग्रामीण भागातूनही रुग्णांची नोंद होऊ लागल्याचे दिसून येते. जिल्ह्यात सर्वप्रथम पनवेल तालुक्यातील कामोठ्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर संपूर्ण महापालिका क्षेत्रात फैलाव होऊ लागला. ही लागण विशेषकरून पनवेल परिसरातून मुंबईत अत्यावश्यक सेवेत काम करण्यास जाणार्यांपासून होत असल्याचे समोर आले. आजही असे अनेक जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून येत आहेत. या संकटकालीन परिस्थितीत वैद्यकीय यंत्रणा, पोलीस, प्रशासन यांची सेवा तर आवश्यक आहे. त्यांच्यामुळेच ही साथ आटोक्यात आणण्यात मदत होणार आहे, मात्र कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबईतून हा महाभयंकर विषाणू प्रचंड प्रमाणात पसरत असल्याने धोका अनेक पटींनी वाढला आहे. याकडे पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी लक्ष वेधले होते. त्यांच्या मागणीची दखल घेत मुंबई महापालिकेने आपले अधिकारी, कर्मचारी यांची राहण्याची व्यवस्था मुंबईत करायचा निर्णय घेतला. आता अन्य विभाग, आस्थापने यांनीही मुंबई महापालिकेचे अनुकरण केले पाहिजे. एव्हाना कोरोनाचा प्रादुर्भाव वाढून वेगवेगळ्या भागातून नवे रुग्ण समोर येत आहेत. रायगड जिल्ह्याचे एक टोक असलेले खारघर ते दुसरे टोक पोलादपूरपर्यंत कोरोनाचा शिरकाव झालेला आहे. याशिवाय श्रीवर्धन, महाड, कर्जत, खालापूर, अलिबाग येथेही कोरोनाने शिरकाव केला. सुरुवातीला शहरी भागांतून आलेल्यांमुळे हा संसर्ग झाला होता. आता मात्र अंतर्गत रुग्ण वाढत आहेत. अशाच प्रकारे उरण तालुक्यातील करंजा येथे एकाच वेळी 21 रुग्ण आढळले असून, त्यामुळे हाहाकार उडाला आहे. करंजा गावातील सुरकीच्या पाड्यात एक जण कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. त्या रुग्णाच्या आई-वडिलांचे गेल्या 15 दिवसांत निधन झाले. त्यामुळे मयतावर तसेच घरी सांत्वन करण्यासाठी अनेक लोक आले. नातेवाइकांचीही संख्या मोठी आहे. त्यामुळे रुग्णांचा आकडा वाढण्याची शक्यता होती. अखेर तसेच झाले. खरं तर कोरोना विषाणू शहर, ग्रामीण भाग अथवा जात, धर्म असे काही पाहत नाही. एखादी व्यक्ती कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात आली किंवा येनकेन प्रकारे या विषाणूच्या संपर्कात आल्यास तो संबंधित व्यक्तीला ग्रासतो, कारण हा विषाणू संसर्गजन्य आहे. म्हणूनच दक्षता घेणे अनिवार्य आहे. शासन-प्रशासन मास्क बांधा, हात स्वच्छ धुवा, सामाजिक अंतर (सोशल डिस्टन्सिंग) राखा असे वारंवार सांगत आहे. त्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करणे स्वत:च्याच जीवाच्या दृष्टीने हितावह आहे, मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्यास संसर्ग हाताबाहेर जाऊ शकतो. कोरोनावर मात करायची असेल, तर काही गोष्टी काटेकोरपणे पाळाव्याच लागतील.