
खोपोली : प्रतिनिधी
खोपोली शहरातील आरडी नगर या गृहनिर्माण सोसायटीचा कारभार मागील 25 वर्षे एकच कमिटी चालवत आहे. सोसायटी 194 कुटुंबातील सदस्यांना सोबत घेत सर्वधर्मीय सण, महोत्सव साजरे करीत आहे. या सोसायटीला 25 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने शनिवारी (दि. 4) विशेष समारंभ व स्नेहसंमेलन सोहळा साजरा झाला.
यामध्ये भविष्यात असाच एकोपा ठेवून विकास साधावा, असा सल्ला ठाणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी दिला.
या महोत्सवाला माजी नगराध्यक्ष दत्ताजी मसुरकर, ज्येष्ठ नेते रामकृष्ण तावडे, उल्हासराव देशमुख, सूर्यकांत देशमुख, सहकारी संस्था उपजिल्हा निबंधक पांडुरंग खोडका, माजी नगरसेवक इंदरमल खंडेलवाल, सोसायटीचे अध्यक्ष मधुकर दळवी, सचिव संभाजी पाटील, खजिनदार प्रभाकर किनी, नीलम समेळ, संजय गायकवाड यांच्यासह सोसायटीमधील सर्व कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.
प्रास्तविकात अध्यक्ष मधुकर दळवी यांनी सोसायटीच्या 25 वर्षातील कामांचा आढावा घेतला. या वेळी मान्यवरांच्या हस्ते सोसायटीचा कार्य अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांनी, या सोसायटीचा कारभार सर्वांसाठी आदर्श असल्याचे सांगून सोसायटीच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांचे तोंड भरून कौतुक केले.