Breaking News

अंबा नदी दूषित; परिसरातील पोल्ट्रीतील विष्ठा नदीपात्रात; ग्रामस्थ करणार जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार

पाली ः प्रतिनिधी

तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत माणगाव बुद्रुक हद्दीतील उंबरवाडी गावालगत असलेल्या अंबा नदीच्या बाजूला असलेल्या पोल्ट्रीतील विष्ठा पाण्यात मिसळत असल्याने पाणी दूषित झाले आहे. शिवाय नजीकच्या पोल्ट्रीतून नियमित मोटर लावून पाणीउपसा होत असल्याने पाण्याचा स्त्रोतही कमी झाल्याचा गंभीर आरोप उंबरवाडी ग्रामस्थांनी केला आहे. परिणामी उंबरवाडी गावावर ऐन उन्हाळ्यात

पाणीटंचाईचे संकट ओढवले आहे. यासंदर्भात उंबरवाडी ग्रामस्थ

 लवकरच रायगड जिल्हाधिकार्‍यांची भेट घेऊन तक्रार करणार आहेत.

 सुधागड तालुक्यात अनेक गावांच्या व नद्यांच्या आसपास विविध प्रकल्प, फार्म हाऊस व पोल्ट्री फार्म थाटत आहेत. अनेकदा येथील नदीपात्रातून येथे

स्थिरस्थावर झालेले विकसक आपल्या खासगी कामासाठी पाण्याचा मोठ्या प्रमाणावर उपसा करताना दिसतात. परिणामी स्थानिक ग्रामस्थांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. उंबरवाडी येथील महिलांनी याबाबत सांगितले की, आम्ही अनेक वर्षांपासून नदीतील पाण्याचा वापर पिण्यासाठी तसेच कपडे, भांडी धुण्यासह गुरांना पाजण्यासाठी करीत होतो. नदीतील मुबलक पाण्यामुळे आम्हाला कधीही पाणीटंचाई जाणवली नाही, मात्र आजघडीला नदीतील पाण्याचा जोरदार उपसा होत असल्याने नदीतील पाणी आटले आहे. त्यामुळे आमची रखरखत्या उन्हात पाण्यासाठी दाही दिशा भटकंती होत आहे. एप्रिल-मेसारख्या कडक उन्हाळ्याच्या दिवसांत आम्हाला नदीतील पाण्याचा मोठा आधार होता. येथील

एमकेएम पोल्ट्री फार्ममधून मोठ्या प्रमाणावर विष्ठा बाहेर पडून नदीतील पाण्यात मिसळते. त्यामुळे नदी दूषित झाली आहे. येथून ये-जा करताना येणार्‍या असह्य दुर्गंधीने आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. तसेच धरण उशाला आणि कोरड घशाला अशी आमची परिस्थिती झाल्याची व्यथाही येथील वृद्ध महिलांनी मांडली. प्रदूषण मंडळाने तातडीने येथील जलप्रदूषणाची दखल  घ्यावी, तसेच सुधागड तालुका प्रशासनानेही या बाबीकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन नदीचे पाणी पूर्ववत शुद्ध व पिण्यायोग्य होण्याच्या दृष्टीने योग्य ती  कार्यवाही करावी, अशी मागणी उंबरवाडी ग्रामस्थांनी केली आहे. याबरोबरच येथील पोल्ट्रीतील पशुधन मुंबईसह अन्य ठिकाणी जात असल्याने सध्या कोरोनासारख्या आजारात व लॉकडाऊनमध्ये येथील कामगार बाहेर वाहतूक व ये-जा करीत आहेत. त्यामुळे कळत नकळत कोरोना संसर्गाची भीतीही दिनेश शिंदे, सुधीर शिंदे, प्रशांत शिंदे, नंदा कदम, यमुना शिंदे, दीपक शिंदे, दिनेश शिंदे आदी ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, यासंदर्भात तहसीलदार दिलीप रायन्नावार यांची प्रतिक्रिया घेतली असता ग्रामस्थांच्या तक्रारीच्या अनुषंगाने प्रत्यक्ष जागेवर जाऊन वस्तुस्थिती पाहून योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Check Also

वावंजे, मानपाडा येथे विकासकामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल विधानसभा मतदारसंघातील वावंजे निताळे आणि मानपाडा कातकरी वाडी येथे मंगळवारी (दि.28) …

Leave a Reply