Breaking News

‘सीकेटी’च्या राज्यस्तरीय वेबिनारला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद

पनवेल : रामप्रहर वृत्त
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील स्वायत्त दर्जाप्राप्त चांगू काना ठाकूर (सीकेटी) कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात विद्यार्थी परिषद व विद्यार्थी कल्याण विभाग, महिला विकास कक्ष व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे राज्यस्तरीय वेबिनार घेण्यात आले. या उपक्रमास विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद लाभला
’कोविड 19 : लॉकडाऊन काळात मानसिक आरोग्यावर होणारा परिणाम व सल्ला’ या विषयावर विद्यार्थ्यांबरोबर सुसंवाद साधण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञ डॉ. शिल्पा परहार या वेबिनारमध्ये सहभागी झाल्या होत्या. या वेळी प्राचार्य डॉ. वसंत बर्‍हाटे यांनी उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. महिला विकास कक्षाच्या प्रमुख डॉ. रत्नप्रभा म्हात्रे यांनी प्रास्ताविक केले. या वेबिनारसाठी उपप्राचार्य डॉ. एस. के. पाटील, प्राध्यापक व शिक्षकेतर वर्गही उपस्थित होता.
राज्यस्तरीय वेब संवादामध्ये मानसोपचार तज्ज्ञ डॉ. शिल्पा परहार यांनी विद्यार्थ्यांच्या विविध समस्यांवर सखोल चर्चा करून येणार्‍या भविष्यात आपण काय करू शकतो याचे विवेचन केले. त्याचप्रमाणे दररोज योगा, प्राणायाम व ध्यानधारणा करावी आणि आपल्या कुटुंबासोबत सुरक्षित राहावे, असा मौलिक सल्लाही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
विद्यार्थी परिषद व विद्यार्थी कल्याण विभाग प्रमुख डॉ. मंदा म्हात्रे यांनी विद्यार्थ्यांचे प्रश्न वेब संवादाद्वारे डॉ. परहार यांच्याकडे पाठविले. डॉ. परहार यांनी या प्रश्नांना समर्पक उत्तरे देऊन मार्गदर्शन केले. या वेबिनारमध्ये राज्यभरातून 465 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. शैलेश वाजेकर, डॉ. बी. डी. आघाव, प्रा. सागर खैरनार, प्रा. सत्यजित कांबळे व डॉ. योजना मुनीव यांनी परिश्रम घेतले.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply