Breaking News

खासदार सुनील तटकरे यांच्या कार्यअहवालात राज्य शासनाच्या योजना

माजी आमदार माणिक जगताप यांची टीका

महाड : प्रतिनिधी
खासदार सुनील तटकरे यांनी त्यांचा एक वर्षाचा कालावधी पूर्ण केल्यानंतर एक कार्यअहवाल सादर केला. यामध्ये सर्व योजना राज्य शासनाच्या असून, त्या धादांत खोटेपणाने मांडल्या गेल्या आहेत, अशा शब्दांत या कार्यअहवालावर माजी आमदार माणिक जगताप यांनी सोमवारी (दि. 25) पत्रकार परिषदेत घणाघाती आरोप करीत महाआघाडी सरकारला घरचा आहेर दिला. कोरोनाचे रुग्ण सर्वाधिक दक्षिण रायगडमध्ये असताना अलिबागमध्ये मेडिकल कॉलेज किंवा रुग्णालयाची मागणी करणे योग्य नाही. खासदार म्हणून तुम्ही दक्षिण रायगडमधून निवडून गेला आहात हे विसरलात का, असा सवालही जगताप यांनी तटकरेंना उद्देशून केला.
या वेळी जगताप यांनी स्थानिक नेतृत्वावर न बोलणेच योग्य ठरेल, अशा शब्दांत आमदार भरत गोगावले यांचे नाव न घेता त्यांचादेखील समाचार घेतला तसेच सद्याच्या परिस्थिती कोणाचे कोणावर नियंत्रण नसल्याचा आरोप केला.
खासदार तटकरे यांच्यावर टीका करताना माजी आमदार जगताप पुढे म्हणाले की, भविष्याचा वेध घेऊन कोविड-19वर येथेच उपचार करता यावे याकरिता डॉ. भास्कर जगताप यांनी हिंमत दाखवून कोरोनाबाधित परिचरिकेला बरे केले, परंतु गेल्या काही दिवसांपासून दक्षिण रायगडमध्ये कोरोना रुग्णांत वाढ होत आहे. यामुळे महाड परिसरात अद्ययावत हॉस्पिटल किंवा मेडिकल कॉलेजची गरज आहे. महाड हा तसा ग्रामीण व डोंगरी भाग असल्याने बॅरिस्टर अंतुले साहेबांनी दूरदृष्टी ठेवून येथे तंत्रशास्त्र विद्यापीठ उभे केले. याठिकाणी जागा उपलब्ध असताना अलिबागमध्ये खासगी जागा कोणासाठी संपादित करणार, हा एक प्रश्न आहे. शिवाय अलिबाग येथून जलमार्गाने रुग्ण मुंबई येथे जाऊ शकतो. तरीही आपल्या कार्यअहवालात खासदार सुनील तटकरे यांनी मेडिकल कॉलेज अलिबागमध्ये व्हावे, अशी मागणी केली, मात्र ते आपण दक्षिण रायगडमधून निवडून गेलो आहे, हे विसरले का असा सवाल करून सरकारकडे जागा असताना खासगी जागा निवडली जाणे योग्य नाही. मेडिकल कॉलेज महाडमध्येच झाले पाहिजे अशी मागणी करीत जगताप यांनी सर्वाधिक रुग्ण जर दक्षिण रायगडमध्ये आहे तर मग हॉस्पिटल अलिबागला कदापि होऊ दिले जाणार नाही, असा इशाराही दिला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंबडवे गावाचा विकास करणार, असेही कार्यअहवालात खासदारांनी म्हटले आहे, मात्र जिल्हा परिषद ते खासदार यापर्यंतच्या प्रवासात कधी या गावाचा विकास दिसला नाही. लोकांसाठी काम करायचे असेल, तर ठोस उपाययोजना सांगा. गेल्या तीन महिन्यांत खासदार आहेत कुठे, असा सवालही जगताप यांनी केला.
कोकणी माणूस भयग्रस्त वातावरणात तर मजूर शहर सोडून स्थलांतरित झाला. मध्यमवर्गीय चांगलाच भरडला गेला आहे. त्यांचा राज्य शासनाने गांभिर्याने विचार केला पाहिजे, अशी मागणी या वेळी जगताप यांनी केली.

Check Also

कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा

कामोठे : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या …

Leave a Reply