Breaking News

सॅनिटायझरमुळे त्वचारोगाची समस्या

पनवेल : बातमीदार

कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाकडून तीन प्रमुख उपाययोजना सांगितल्या गेल्या असून त्यात सातत्याने हात धुण्याचा सल्ला महत्त्वाचा आहे. भीतीपोटी साबणाने अथवा सॅनिटायझरने सातत्याने हात धुतले जात आहेत. हे प्रमाण वाढू लागल्याने त्वचेच्या संरक्षक थराला इजा होऊन त्वचारोगांची समस्या निर्माण झाली आहे. हाताला खाज येणे, पांढरे चट्टे उठणे आणि हात लाल होणे अशा त्वचाविषयक तक्रारी वाढल्या असल्याचे त्वचारोगतज्ज्ञ सांगत आहेत.

कोरोनावर कोणतीही लस किंवा औषधाचा अद्याप शोध लागलेला नाही. त्यामुळे यापुढील काळ कोरोनासोबत घालवावा लागणार असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केले आहे. प्रतिबंधात्मक उपाय हे कोरोनाला रोखण्याचे एक प्रभावी शस्त्र मानले जात आहे. सतत हात धुणे हा या प्रतिबंधात्मक उपायामधील एक प्रमुख उपाय आहे. टाळेबंदीमुळे घरात असूनही साबणाने सतत हात धूत आहेत किंवा सॅनिटायझरचा वापर सर्रास केला जात आहे. सुरुवातीच्या काळात सॅनिटायझरचा विक्रमी खप झाल्याने औषध दुकानात त्यांचा तुडवडा भासू लागला होता.

सध्या चांगल्या कंपन्यांच्या सॅनिटायझरबरोबर घरगुती जंतुनाशकांची विक्री जोरात सुरू आहे. सातत्याने सॅनिटायझरने हात धुण्याची आवश्यकता नाही, असे त्वचारोग डॉक्टर सांगत आहेत. एकदा सॅनिटायझरने हात धुतल्यानंतर त्याचा प्रभाव दोन ते तीन तास राहू शकतो. सतत जंतुनाशक अथवा साबण हाताला लावल्याने त्वचेचा पहिला नाजूक संरक्षक थर कमकुवत होत असून त्वचारोगांची समस्या उद्भवू लागल्या आहेत. काही सॅनिटायझरमध्ये रसायनांचे प्रमाण जास्त असल्याने त्वचारोगाची समस्या निर्माण होत असल्याचेे ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयाचे त्वचारोग तज्ञ डॉ. दत्तात्रय सोनावणे यांनी सांगितले.

निर्जंतुकीकरणासाठी सध्या जास्त मात्रा वापरून सर्वत्र रासायनिक फवारणी केली जात आहे. त्यामुळे घशाचे विकार होण्याची शक्यता आहे तर सतत वापरण्यात येणार्‍या मुखपट्टीमुळे चेहर्‍यांवर फोड्या, पुरळ उठण्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत.  शरीराला या बदलाची सवय नसल्याने हातमोजे वापरतानाही त्वचेची काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

-डॉ. दत्तात्रय सोनावणे, त्वचारोगतज्ज्ञ

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply