Breaking News

सायबर युद्धाचे ढग

कोरोनासंबंधी आर्थिक मदत, मोफत कोविड चाचणी या आशयाचे मेल सरकारी ई-मेलवरून आल्याचे भासवून सर्वसामान्यांना जाळ्यात ओढण्याचा हॅकर्सचा प्रयत्न असू शकेल. हे हॅकर्स बड्या कंपन्या, श्रीमंत व्यक्ती यांच्यावर तर हल्ले करतातच, परंतु एखाद्या मोठ्या हल्ल्यात लाखो सर्वसामान्यांनाही फटका बसू शकतो.

गेले अनेक दिवस भारत आणि चीन यांच्यादरम्यान सीमाभागात तणाव आहे. चीनची वाढती आक्रमकता अनेक स्वरूपात समोर येत आहे. डिसेंबर महिन्यात चीनमधून कोरोना विषाणू जगभरात पसरला. हा चीनने केलेला जैविक हल्ला आहे की काय अशा आशयाची चर्चा कोरोना महामारीच्या सुरुवातीच्या काळात मोठ्या प्रमाणात झाली. त्यावेळेस दोन्ही बाजूंनी तज्ज्ञांनी युक्तिवाद केले. ही शंका येण्यामागे चीनची आर्थिक क्षेत्रातील वाढती आक्रमकता हेही एक कारण होतेच. चीनच्या वुहान प्रांतात कोरोना वेगाने फैलावत असताना अनेक अमेरिकी व युरोपीयन भागभांडवलदारांनी वाटेल त्या किमतीला आपले शेअर्स विकून पळ काढला. तर त्याच वेळेस चिनी भांडवलदारांनी हे सारे शेअर्स विकत घेऊन अनेक कंपन्यांवर ताबा मिळवला. हे सारे कोरोना महामारीला समांतर घडल्याने जगभरात चीनबद्दल संशयाचे वातावरण निर्माण झाले. अशा परिस्थितीत एकटा पडल्यानंतरही वरमण्याऐवजी चीनची खुमखुमी मात्र सर्वच बाबतीत वाढताना दिसत आहे. आर्थिक क्षेत्रात तर चीन अनेक डावपेच खेळून मुसंडी मारत आहेच, परंतु संरक्षण सज्जतेच्या दृष्टीने पाहिल्यासही आपण कुणाला डरणार नाही असे दाखवण्याची मुजोरीदेखील चीनला आवरता आलेली नाही. गेला जवळपास महिनाभर चीनच्या सीमाभागातील कारवाया हळूहळू वाढल्याच होत्या. अखेर गलवान परिसरात उभय देशांमधील संघर्षात त्याची परिणती झाली. एकीकडे सीमाभागातील तणाव वाढलेला असतानाच देशात मोठा सायबर हल्ला होण्याची शक्यता सरकारच्या सायबरविषयक सल्लागार संस्थेने व्यक्त केली. मार्चमध्ये देशात लॉकडाऊन सुरू झाल्यापासून बहुसंख्य व्यवहार हे आपसुकच ऑनलाइन झाले होते. यात अर्थातच आर्थिक व्यवहारांचाही समावेश होता. प्रत्यक्ष संपर्क टाळण्यासाठी सामान्यातला सामान्य माणूस व छोटा भाजी विक्रेतादेखील गुगल पे वा तत्सम ऑनलाइन पेमेंट माध्यमाचा वापर करू लागला. देशातील ऑनलाइन आर्थिक व्यवहार 500 टक्क्यांनी वाढले असे म्हटले जाते. अर्थातच या काळात सायबर गुन्ह्यांचे प्रमाणही वाढू लागल्याचे समोर आले, परंतु भारत-चीनदरम्यान सीमाभागात तणाव निर्माण झाल्यापासून मे महिन्याच्या तुलनेत जून महिन्यात सायबर हल्ले तब्बल 200 टक्क्यांनी वाढल्याचे सायबर क्षेत्रात हेरगिरी करणार्‍या कंपन्यांकडून सांगण्यात आले. भारतातील सायबर क्षेत्रातील पायाभूत सुविधांमधील त्रुटींचा मागोवा घेण्याचे प्रयत्न प्रचंड प्रमाणात वाढल्याचे महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर विंगने सांगितले. विशेषत: भारतातील आयटी आणि बँकिग क्षेत्राला लक्ष्य करण्यासाठी गेल्या आठवडाभरात 40 हजारांहून अधिक वेळा हॅकर्सकडून अशी हेरगिरी करण्यात आली, असे आपल्या सायबर शाखेने म्हटले. केंद्र सरकारच्या सायबर सल्लागारांनी फिलिंग हल्ल्यांपासून सावध राहण्याचा इशारा दिलेला असतानाच पाठोपाठच महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर शाखेनेही त्यास दुजोरा दिला. या सार्‍यांपासून सावध राहायचे तर कोणत्याही अनोळखी संदेशावर वा ई-मेलवर आपण विश्वास ठेवता कामा नये. आर्थिक व्यवहार करताना विशेष दक्षता बाळगण्याला पर्याय नाही. अँटीव्हायरसचा वापर वा फायरवॉल अपडेट करणे यांसारख्या दक्षता तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली बाळगाव्यात. लडाखमधील सीमाभागापाठोपाठ आता सायबर युद्धाचे ढगही दाटू लागले आहेत. तेव्हा सावधगिरी हवीच.

Check Also

जाहीर धुव्वा

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन शुक्रवारी संपले. या संपूर्ण अधिवेशनाच्या काळात विरोधी पक्षाचे नेते पूर्णत: निष्प्रभ झालेले …

Leave a Reply