Breaking News

काँग्रेस-राष्ट्रवादीकडून कायद्यांबाबत ढोंगीपणा का? : फडणवीस

मुंबई : प्रतिनिधी
काँग्रेसने बाजार समिती रद्द करण्याचे आश्वासन दिले. 2006मध्ये कंत्राटी शेतीचा कायदा महाराष्ट्राने केला. महाराष्ट्राने केलेले कायदे चालतात? मग देशाचे कायदे का नाही? हा ढोंगीपणा का, अशा सवालांच्या फैरी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला उद्देशून झाडल्या आहेत.
केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकरी संघटना आंदोलन करीत आहेत. या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी संयुक्त शेतकरी-कामगार मोर्चाच्या नेतृत्वात मुंबईतील आझाद मैदानात शेतकरी आले आहेत. त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी प्रमुख उपस्थिती लावली. या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे.
फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रात कृषी विधेयक येऊन एवढे दिवस झाले. कुठलेही आंदोलन महाराष्ट्रात झाले नाही. आता काही पक्ष जाणीवपूर्वक ढोंगबाजी करीत आहेत. शेतकर्‍यांना भरकटविण्याचा प्रयत्न करीत आहेत. शेतकर्‍यांना चुकीच्या गोष्टी सांगितल्या जात आहेत. आता जी लोकं या ठिकाणी या मोर्चाच्या निमित्ताने मंचावर जात आहेत किंवा जी लोकं या मोर्चाला मदत करीत आहेत त्यांना माझा प्रश्न आहे, काँग्रेसने आपल्या 2019च्या जाहीरनाम्यामध्ये बाजार समिती रद्द करा आणि आम्ही निवडून आलो तर बाजार समिती रद्द करून टाकू, असे का म्हटले होते? याचे उत्तर दिले पाहिजे. 2006मध्ये कंत्राटी शेतीचा कायदा त्यांनी का मंजूर केला? 2006पासून 2020पर्यंत तो महाराष्ट्रात सुरू आहे. महाराष्ट्रातला कायदा चालतो आणि देशातील कायदा का चालत नाही? ही ढोंगबाजी का? काँग्रेस-राष्ट्रवादीने याचे उत्तर दिले पाहिजे.
महाराष्ट्रात 29 थेट खरेदीची परवाने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात सर्वांत अगोदर देण्यात आले. ही सगळी ढोंगबाजी सुरू आहे. वाहत्या गंगेत हात धुण्याचा हा प्रयत्न आहे. याला शेतकर्‍यांचा कुठलाही पाठिंबा नाही. उलट शरद जोशीप्रणिीत शेतकरी संघटनेने या तिन्ही कायद्याचे स्वागत केलेले आहे व त्यांनी म्हटले आहे की हे शेतकर्‍यांच्या हिताचे कायदे आहेत, असेही फडणवीस यांनी या वेळी सांगितले.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply