अलिबाग : प्रतिनिधी
महापुरात महाड, पोलादपूर तालुक्यातील अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. या पूरग्रस्तांना पुन्हा उभे करण्यासाठी अनेक हात पुढे आले. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषददेखील यात मागे राहिली नाही. शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष राजेश सुर्वे यांनी केलेल्या आवाहनानुसार संस्थेच्या अहमदनगर जिल्हा शाखेकडून मोठ्या प्रमाणावर मदत आली असून, महाड व पोलादपूर तालुक्यातील सुमारे 300 गरजू कुटुंबांना या मदतीचे किट्स वितरित करण्यात आले. संघटनेचे संस्थापक आमदार संजय केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला. राज्य संपर्क प्रमुख रावसाहेब रोहोकले यांच्या प्रयत्नाने आणि अहमदनगर येथील गुरुमाऊली मंडळ व जिल्हा विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने महाड, पोलादपूर तालुक्यातील पूरबाधित वाडीवस्तीवर जाऊन तेथील कुटुंबीयांना जीवनावश्यक वस्तूंच्या 300 किट्सचे वाटप करण्यात आले. संघटनेचे रायगड जिल्हा कार्यवाह विजय पवार, रविकिरण पालवे, वैभव कांबळे, भिकाजी मांढरे, बारगजे, सुजित बनगर, सचिन खोपडे, बालाजी गुबनारे, दीपक साळवी, रवी पाटील, पार्टे सर आदींनी नियोजनबद्ध रीतीने गरजू लोकांना मदत पोहोचवण्यात सक्रिय सहभाग घेतला. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे (प्राथमिक विभाग)अहमदनगर जिल्हा अध्यक्ष प्रवीण ठुबे, गुरुमाऊली मंडळाचे अध्यक्ष विकास डावखरे, जिल्हा विकास मंडळाचे अध्यक्ष संजय शिंदे, विश्वस्त अविनाश साठे, जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे संचालक राजेंद्र मुंगसे, बाबा पवार, जिल्हा कार्यालय मंत्री गणेश वाघ, बाळासाहेब वाबळे या वेळी उपस्थित होते.