Breaking News

निसर्ग चक्रीवादळग्रस्त कोकणवासीयांच्या व्यथा

निसर्ग चक्रीवादळ होऊन एक महिना उलटून गेला. तरीही वादळग्रस्तांच्या समस्या कायम आहेत. आधीच कोरोना या वैश्विक महामारीचा सामना करताना कोकणवासीय त्रस्त असताना नैसर्गिक आपत्तीने त्यांचे वर्तमान पुरते उद्ध्वस्त झाले असून, भविष्याबाबतही चिंतेचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत राज्य शासनाने त्यांना सर्वतोपरी साह्य करणे आवश्यक असताना साध्या मूलभूत सेवाही नीटपणे पुरविल्या जात नसल्याचे विदारक चित्र आहे.

कोकणाला वादळी पाऊस काही नवीन नाही. येथे दरवर्षी हजारो मिलिमीटर पाऊस

पडतो. जोरदार वारेही वाहतात. यामध्ये किरकोळ नुकसान होते, मात्र 3 जून रोजी रायगड आणि

रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये घोंघावलेल्या निसर्ग चक्रीवादळाने अक्षरश: होत्याचे नव्हते केले. रायगडात तब्बल 1905 गावांना त्याचा फटका बसला. असंख्य घरांची पडझड झाली. फळबागा

उद्ध्वस्त झाल्या. सहा जणांचा बळीदेखील गेला. या चक्रीवादळामुळे श्रीवर्धन, मुरूड, अलिबाग या किनारपट्टीवरील तालुक्यांमध्ये सर्वाधिक नुकसान झाले. इतर तालुक्यांनाही त्याची झळ बसली. काही तासांसाठी आलेल्या चक्रीवादळाने दशकभराहून अधिक काळ न भरून निघणारे नुकसान झाले आहे.

चक्रीवादळानंतर राज्याचे मुख्यमंत्री आणि अन्य मंत्रिमहोदयांनी नुकसानग्रस्तांच्या भेटी घेऊन मदतीचे आश्वासन दिले. जे जे शक्य असेल ते देऊ, असे त्यांच्याकडून सांगण्यात आले, मात्र जी आर्थिक मदत देण्यात येतेय ती तुटपुंजी आहे. काही ठिकाणी अद्याप मदत पोहचली नाही. मदत सोडाच साधे पंचनामेही पूर्ण झाले नाहीत. इतकी राज्य शासन आणि प्रशासकीय यंत्रणेची

उदासीनता तसेच बेजबाबदारपणा दिसून येतो. वास्तविक या संकटानंतर नुकसानग्रस्तांच्या समस्यांची सोडवणूक करून त्यांना आर्थिक मदतीचा हात देणे अपेक्षित होते, मात्र वादळात उन्मळून पडलेली झाडे उचलण्याचे कामही स्वत: नागरिकांनाच करावे लागले. दुसरीकडे आजही अनेक गावांमध्ये अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. येथेही गावकर्‍यांनी वीजपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी

महावितरणच्या कर्मचार्‍यांना सहकार्य केले. त्या बदल्यात त्यांना वाढीव बिलाची भेट मिळाली. त्यामुळे लोक आता

चिडले आहेत. 

चक्रीवादळामुळे विविध घटकांचे नुकसान झाले आहे. एकट्या रायगड जिल्ह्यात एक लाख 75 हजार घरांची पडझड झाली. यामध्ये काही घरे थेट पडली, तर काहींचे पत्रे, कौले उडाली. हे नुकसान एकवेळ भरून काढता येईल, पण ज्यांच्या बागायती भुईसपाट झाल्या त्यांची अपरिमित हानी झाली आहे. सुमारे 22 हजार हेक्टर फळबागांचे नुकसान झाले आहे. नारळ, सुपारी, काजू, फणस, आंब्यांची झाडे डोळ्यांदेखत उन्मळून पडली. यापैकी सुपारीचे झाड पिकते होण्यासाठी पाच-सहा वर्षे लागतात, तर नारळ 10 वर्षांनंतर फळ देते. त्यामुळे हे नुकसान भरून काढण्यासाठी बराच कालावधी लागणार आहे. ते लक्षात घेऊन त्यांना भरीव मदत देणे आवश्यक होते, मात्र हेक्टरी 50 हजार रुपये देऊन बागायतदारांची थट्टा करण्यात आली आहे. मुळात कोकणातील शेतकर्‍यांची जमीन गुंठ्यांमध्ये असते. एखाद्याकडे दोन-चार गुंठ्यांवर पीक घेतले जात असेल, तर त्याच्या पदरी काय पडणार?

शेतकरी, बागायतदार, छोटे व्यापारी यांच्याप्रमाणेच कोळी बांधवांचेदेखील नुकसान झाले आहे. यापूर्वीच छोटी-मोठी वादळे, लॉकडाऊनमुळे मच्छीमार हैराण झाला असताना निसर्ग चक्रीवादळाने त्याचे कंबरडेच मोडले आहे. या संकटाची आधीच कल्पना असल्याने कोळी बांधवांनी त्यांच्या बोटी किनार्‍यावर उभ्या करून ठेवल्या होत्या. त्यामुळे जीवितहानी टळली असली तरी किनारी लावलेल्या बोटी एकमेकांवर आदळून त्या फुटून नुकसान झाले आहे. त्यांचीही अल्प मदत देऊन बोळवण करण्यात आली आहे. त्यामुळे तेसुद्धा

वैतागले आहेत.

अशातच जोरदार पर्जन्यवृष्टी सुरू झाल्याने चक्रीवादळग्रस्तांच्या अडचणी आणखी

वाढण्याची शक्यता आहे. कोकणी माणसाने आजवर अनेकदा संयम पाळला. कोणतीही तक्रार न करता वेळोवेळी सहकार्याची भूमिका घेतली, मात्र वादळानंतर त्यांना सावरण्यासाठी, उभे करण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न होण्याऐवजी उलट त्यांच्या जखमेवर मीठ चोळले जात आहे. त्यामुळे कोकणवासीयांच्या संयमाचा बांध आता फुटत चालला आहे. राज्यकर्त्यांनी त्यांचा अंत पाहू नये; अन्यथा कोकणी माणूस संतापल्यास योग्य वेळी उत्तर देतो हा आजवरचा इतिहास आहे. समाधान पाटील

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply