खोपोली : प्रतिनिधी
मुंबई-पुणे महामार्गावर खालापूरनजीक रस्त्याशेजारी रानभाज्या विक्रीसाठी बसलेल्या एका महिलेचा कंटेनरची धडक बसून जागीच मृत्यू झाला. त्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे. जानकी पवार (वय 65, शिरवली वाडी, ता. खालापूर) असे मयत वृद्ध महिलेचे नाव असून, तिच्या पश्चात अपंग मुलगा आहे.
पोटाची खळगी भरण्यासाठी आदिवासी महिला महामार्गालगत रानभाज्या विक्रीसाठी बसतात. पुणे, मुंबई येथील प्रवासी गाडी थांबवून या भाजी खरेदी करीत असतात. अशाच प्रकारे जानकी पवार ही वृद्ध महिला रानातूनभाज्या गोळा करून नेहमीप्रमाणे खालापूरनजीक महामार्गाशेजारी भाजी विक्रीसाठी बसली होती. पुण्याहून मुंबईकडे जाणार्या एका कंटेनरवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि या वाहनाने भाजीविक्रेत्या पवार यांना धडक दिली. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या अपघाताची माहिती समजताच अपघातग्रस्त मदतीसाठी टीमच्या सदस्याने घटनास्थळी धाव घेत महिलेला रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने स्वतःच्या वाहनातून प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले, मात्र वेळ निघून गेली होती. दरम्यान, अपघातानंतर कंटेनरचालक फरार झाला आहे.
Check Also
नवी मुंबई विमानतळाला ‘दिबां’चे नाव द्या; भाजपचे लक्षवेधी आंदोलन
पनवेल : रामप्रहर वृत्तनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते स्व. दि.बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी …
RamPrahar – The Panvel Daily Paper