माणगाव ः प्रतिनिधी
माणगाव तालुक्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला असून रुग्णसंख्येत वाढ होत आहे. लॉकडाऊनच्या सहाव्या टप्प्यात निजामपूर गावात कोरोनाने शिरकाव केला असून येथे एक 25 वर्षीय तरुण, माणगाव येथील एक, मोर्बा येथील दोन रुग्णांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तसेच तालुक्यातील 13 रुग्णांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती माणगाव उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रदीप इंगोले यांनी रविवारी दिली. माणगाव तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 55वर पोहचली असून तालुक्यातील मोर्बा गावात रुग्णांची संख्या वाढत चालल्याने तेथील नागरिकांची धास्ती वाढली आहे. माणगाव तालुक्यात लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यापासून रविवारपर्यंत 124 जणांना कोरोनाची लागण झाली असून यापैकी 67 रुग्ण बरे होऊन आपल्या घरी गेले. तसेच तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. इंगोले यांनी दिली. तालुक्यातील 33 गावांतून आतापर्यंत कोरोनाचे रुग्ण आढळले असून मोर्बा गावात लॉकडाऊनच्या सहाव्या टप्प्यात रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली. ग्रामपंचायत नागरिकांना वेळोवेळी मार्गदर्शन करीत आहे. मोर्बा गावात कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने विभागातील तसेच निजामपुरात पहिलाच कोरोना रुग्ण आढळल्याने निजामपुरातील नागरिकांत भीती पसरली आहे. त्या अनुषंगाने तालुक्यातील जनतेला जागरूकता व सतर्कता बाळगण्याबरोबरच सरकारने केलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन प्रांताधिकारी प्रशाली जाधव- दिघावकर यांनी केले आहे.