खासदारांनी केला महायुतीच्या पदाधिकार्यांचा सत्कार
कर्जत : बातमीदार : खासदार श्रीरंग बारणे यांना नेरळ गावातून मोठे मताधिक्य मिळाले आहे. विजयानंतर महायुतीचे नेरळमधील पदाधिकारी खासदार बारणे यांचे अभिनंदन करण्यासाठी गेले असता, खासदार बारणे यांनी या पदाधिकार्यांचा सत्कार केला.
मावळ लोकसभा निवडणुकीचा कर्जत विधानसभा मतदारसंघातील निकाल हा अपेक्षितपणे लागला आहे. नेरळमधील मतदारांनी खासदार बारणे यांना मतांची आघाडी दिली आहे. त्यासाठी शिवसेना-भाजप आणि आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी केलेले नियोजन कामी आले.
विजयानंतर शिवसेनेचे नेरळ शहरप्रमुख रोहिदास मोरे, उपशहर प्रमुख बंडू क्षीरसागर, शहर संपर्कप्रमुख किसन शिंदे, भाजपचे नेरळ अध्यक्ष अनिल जैन आणि आरपीआयचे नेरळ अध्यक्ष बाळा संदानशिव आदि पदाधिकारी खासदार बारणे यांचे अभिनंदन करण्यासाठी गेले होते, त्यावेळी खुद्द श्रीरंग बारणे यांनीच नेरळमधील पदाधिकार्यांचा सत्कार केला. महायुतीच्या कार्यकर्त्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे आपल्याला नेरळमध्ये आघाडी मिळाली, असे सांगून खासदार बारणे यांनी यावेळी युवासैनिकांचेदेखील कौतुक केले.
नेरळ ग्रामपंचायत हद्दीत प्रचार यंत्रणा राबविणारे महायुतीचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि बूथ कार्यकर्ते यांचे कौतुक करण्यासाठी त्यांना येत्या रविवारी पुणे येथे घेऊन येण्याच्या सूचना खासदार बारणे यांनी यावेळी रोहिदास मोरे यांना केल्या. या वेळी खासदार बारणे यांचे सुपूत्र विश्वजित बारणे आणि पुतणे किरण बारणे उपस्थित होते.