आमदार प्रशांत ठाकूर यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी
पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महानगरपालिका क्षेत्रात जाहीर केलेला लॉकडाऊन तातडीने हटवून जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी पावले उचलावीत, अशी आग्रही मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे केली आहे. याबाबत त्यांनी निवेदन दिले आहेे.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी नागरिकांना भेडसावणार्या समस्यांचा निवेदनात उहापोह केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, पनवेल महापालिका हद्दीत सुरुवातीच्या काळात केंद्र शासनाने जाहीर केलेला व महाराष्ट्र शासनाने वाढवलेला असा लॉकडाऊन 24 मार्च ते 31 मेपर्यंत सुरू राहिला. काही प्रमाणात मे महिन्यात व नंतर जून महिन्यात उद्योग, व्यवसाय व व्यापार यांची गाडी रूळावर येते ना येते तोच कोरोना संसर्गाची साखळी तोडण्याच्या नावाखाली 3 जुलैपासून पुन्हा लॉकडाऊन जाहीर झालेला आहे. मूळातच लॉकडाऊन हा कोरोनाचे संक्रमण थांबण्यावरचा उपाय नाही हे विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांनी वारंवार बोलून दाखवले आहे. नागरिकांनी लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काळात मास्क घालणे, सॅनिटायझर वापरणे (हात साबणाने वारंवार स्वच्छ धुणे) व एकमेकांपासून किमान तीन फुटांचे शारीरिक अंतर पाळणे या सवयी लावून घेणे अभिप्रेत होते, मात्र सुरुवातीच्या काळात राज्य सरकारला पनवेल परिसरातून अत्यावश्यक सेवेत दैनंदिन कामासाठी मुंबईत जाणार्या लोकांपासून त्यांच्या परिवारांना होणारे कोरोनाचे संक्रमण थांबण्यात अपयश आल्याने पनवेलमधील कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.
मुंबईत रुग्णांची संख्या रोज वाढत असताना संपूर्ण जुलै महिन्यात तिथे लॉकडाऊन नाही, मात्र पनवेल महापालिका क्षेत्रात लॉकडाऊन लागू केला आहे तसेच लॉकडाऊनच्या कालावधीत सातत्याने वाढ करून महापालिका उद्योजकांचा व व्यापार्यांचा अंत पाहत आहे. सर्वसामान्य नागरिकांनाही दैनंदिन गरजेच्या वस्तू कशा मिळवाव्यात, असा प्रश्न पडतो आहे. दुकान उघडल्याशिवाय ज्यांचा व्यवसाय होऊ शकत नाही असे दुकानदार तसेच वेगवेगळ्या पद्धतीच्या सेवा पुरवणार्या संस्था याठिकाणी काम करणार्या लोकांच्या रोजगारावर लॉकडाऊनचा अनिष्ट परिणाम जाणवू लागला आहे. पनवेल महापालिका हद्दीत 150 ते 200च्या घरात वाढणारी रोजची रुग्ण संख्या पाहता आवश्यक असणारे ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेड उपलब्ध करून देण्याची महापालिका अधिकार्यांची धडपड ही अपुरी पडते, अशी नागरिकांमध्ये स्पष्ट भावना आहे.
या परिस्थितीत रुग्णांसाठी जास्तीत जास्त वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे आणि रुग्णांच्या संपर्कात आलेल्या तसेच संभाव्य रुग्णांची स्वॅब टेस्ट व रॅपिड अँटीबॉडी टेस्ट वाढविण्याला प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे ज्या उद्योग, आस्थापनांना आपले काम चालू ठेवायचे आहे त्यांनी आपल्या कामगारांच्या आरोग्याची काळजी घेणे व त्यांना कोरोनाची लागण झाल्यास त्यांच्या उपचाराचा खर्च उचलणे बंधनकारक करण्याची आवश्यकता आहे, मात्र केवळ लॉकडाऊन करून महापालिका या सर्वांपासून सुटका करून घेऊ इच्छिते. याचा पनवेल परिसरातील नागरिक व विविध घटकांमार्फत निषेध केला जात आहे. जनसामान्यांचा विचार करून महापालिका हद्दीतील लॉकडाऊन तातडीने हटवून जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी पावले उचलावीत; अन्यथा भारतीय जनता पक्षाला आंदोलनात्मक भूमिका घ्यावी लागेल, असेही आमदार प्रशांत ठाकूर यांनी स्पष्ट केले आहे.
मनपाकडून लॉकडाऊन शिथिल
* पनवेल महानगरपालिकेने सुधारित अध्यादेश काढून लॉकडाऊन शिथिल केला आहे. सलग मोठ्या लॉकडाऊनबाबत येथील नागरिक नाराजी व्यक्त करीत होते. तीव्र जनभावना लक्षात घेऊन या संदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी महापालिकेचे लक्ष वेधले होते.
* जनसामान्यांचा विचार करून पनवेल महापालिका हद्दीतील लॉकडाऊन तातडीने हटवून जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी पावले उचलावीत; अन्यथा भारतीय जनता पक्षाला आंदोलनात्मक भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा आमदार प्रशांत ठाकूर यांनी निवेदनातून दिला होता. त्यानंतर आयुक्तांनी सुधारित आदेश काढून लॉकडाऊनमध्ये अंशत: बदल केले आहेत.
* अन्नधान्य, भाजीपाला, फळे, अंडी, बेकरी, मासळी, चिकन, मटण, किराणा व इतर जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत उघडी राहतील. सामाजिक अंतर ठेवून काऊंटर सेल करता येईल. या नियमाचे उल्लंघन केल्यास दुकान सील करण्यात येईल.
दूध डेअरी सकाळी 5 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरू राहील.
* औषधांची व चष्म्यांची दुकाने (फक्त औषधे आणि चष्मे विक्री) सकाळी 9 ते रात्री 9 भौतिक अंतराचे पालन करून सुरू राहतील. 24 तास सुरू ठेवण्याची परवानगी असलेल्या दुकानांना तशी मुभा असेल.
* स्टेशनरी, जनरल स्टोअर्स, हार्ड वेअर, बांधकाम साहित्य, स्टील, सिमेंट ट्रेडर्स, पावसाळी प्रावरणे विक्री, इलेक्ट्रिक व इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची विक्री, कॉम्प्युटर, मोबाईल विक्री, गॅस, कुकर, मिक्सर, एसी दुकाने, भांड्यांची दुकाने (फक्त होम डिलेव्हरी) सोमवार ते गुरुवार सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत सुरू राहतील
* पिठाची गिरणी सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत सुरू राहील.
* रेस्टॉरंट व किचन सकाळी 10 ते रात्री 10 पार्सलकरिता
* वृत्तपत्र विक्री सकाळी 7 ते सायंकाळी 5 सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून सुरू राहील.