Breaking News

आणीबाणीचे दिवस…

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात स्वातंत्र्यकाळातील आणीबाणीचे काळे दिवस आठवले की, स्वातंत्र्याची महती अधिकच मनावर ठसते. या काळ्या दिवसांतील ज्येष्ठ भाजप नेते राम नाईक यांच्या आठवणी..

भारतीय जनता पार्टी आज देशातलाच नव्हे; तर जगातला सर्वांत मोठा राजकीय पक्ष आहे. केंद्र सरकाराबरोबरच देशातील 18 राज्यांमध्ये आजमितीस भारतीय जनता पार्टी स्वतःच्या ताकदीवर किंवा मित्र पक्षांच्या सहकार्याने सत्तेत आहे. अशा पक्षाचा ज्येष्ठ नेता म्हणून जेव्हा लोकं मला संबोधतात तेव्हा कृतार्थ वाटतं, पण त्याचवेळी पक्षाची इथवर प्रगती करण्यासाठी कोणकोणते काटेरी मार्ग पादाक्रांत केले त्याचेही स्मरण होते.

25 जून म्हटलं की अशा अनेक आठवणींचे मोहोळच मनात उठते. 25 जून 1975मध्ये भारतीय जनता पार्टी अस्तित्त्वातच नव्हती. भाजपाची मुळे असलेल्या भारतीय जनसंघाचे ते दिवस होते. जनसंघाचे निवडणूक चिन्ह होते पणती!  तेव्हा मुंबईत जनसंघाची ती पणती घरोघरी पोहचावी यासाठी अहोरात्र मेहनत घेणार्‍यांची एक मोठी फळीच तयार झाली होती. डॉ. वसंतकुमार पंडित, सर्वश्री झमटमल वाधवानी, वेदप्रकाश गोयल, बाळासाहेब कानिटकर, वामनराव परब, बबनराव कुलकर्णी, नानूभाई पटेल, विनोद गुप्ता, जयवंतीबेन महेता, मालतीबाई नरवणे असे आम्ही एकदिलाने काम करीत होतो.   मी जनसंघाचा मुंबईतील संघटन मंत्री होतो.  देशाच्या राजकीय पटलावर त्या वेळी इंदिरा गांधींची हुकुमत होती. त्यांनी हातची सत्ता सोडायची नाही म्हणून 25 जून 1975च्या रात्री आणीबाणी घोषित केली. पाठोपाठ काँग्रेसच्या विरोधातील विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना यांच्या कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणावर धरपकड झाली. त्याला जनसंघाचे मुंबईतले कार्यकर्तेही अपवाद नव्हते. संघटनेत मी ज्यांच्याकडे ज्येष्ठ म्हणून बघे, ज्यांच्या सल्ल्याने काम करीत असे अशा सर्व मंडळींची तुरुंगात रवानगी झाली होती. मुंबईतील पदाधिकार्‍यांपैकी दैनंदिन पातळीवर काम करणारे आम्ही दोघेच, मी व बबनराव कुलकर्णी (पत्रकार वैजयंती कुलकर्णी-आपटे यांचे वडील) अटक न होता बाहेर होतो. आम्ही मुंबईतील महत्त्वाचे जनसंघाचे पदाधिकारी, पण तुलनेने सौम्य स्वभावाचे. वामनराव परब, रामदास नायक, प्रेमकुमार शर्मा हे हल्लीच्या भाषेत ‘फायरब्रॅण्ड’. सरसकट धरपकड नाही हे दाखविण्यासाठी बहुधा ही मवाळ मंडळी काय करतील या विचाराने आम्हाला मोकळे ठेवले असावे, पण सौम्य स्वभावाची माणसंही किती कणखर असतात हे दाखवून द्यायची जिद्द आमच्यात होती.

राजकीय कार्यकर्त्यांना आणीबाणीच्या काळ्या दिवसांचा किती त्रास झाला याच्या अनेक कथा सर्वांना माहीत आहेत.  तपशीलात थोडाफार बदल केला, तर सर्वांचे हाल सारखेच होते. माझ्यावर व बबनरावांवर मुंबई जनसंघाची संपूर्ण जबाबदारी होती. मुंबईचा संघटन मंत्री असल्यामुळे आणीबाणीत मला सर्व आघाड्यांवर लढावे लागत होते. सगळ्यात पहिले काम म्हणजे मुंबईत सत्याग्रहांचे नियोजन, दुसरे महत्त्वाचे काम म्हणजे धरपकड झालेले आमचे नेते, कार्यकर्ते यांच्या कुटुंबीयांशी समन्वय, कुटुंबीयांच्या तुरुंगातील भेटी योजण्यापासून त्यांना दैनंदिन जीवनात होणारा त्रास कमी करण्याचे प्रयत्न करण्यापर्यंत सर्व सहयोग द्यायचा. या कामामुळेच अनेकांच्या कुटुंबीयांशीही माझे भावबंध जुळले. तिसरे महत्त्वाचे काम म्हणजे जनसंघाचे व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे उच्चपदस्थ भूमिगत नेते जेव्हा मुंबईत येत तेव्हा त्यांची व्यवस्था, निरोपानिरोपी याकडे लक्ष देणे. चौथे माझ्या आवडीचे, पण अत्यंत जोखमीचे काम म्हणजे आणीबाणीविरुद्ध जनमत तयार करण्यासाठी तसेच आंदोलनांसाठी गुप्तपणे पत्रके काढणे, त्यांचे वाटप करणे आणि सर्वांत महत्त्वाचे पाचवे काम म्हणजे आणीबाणीविरुद्ध संघर्षासाठी उभे ठाकलेले अन्य राजकीय पक्ष-समाजवादी पक्ष, संघटना काँग्रेस, कम्युनिस्ट पार्टी तसेच सर्वोदय मंडळ व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या मुंबईतील मंडळींशी समन्वय साधून आंदोलन मजबूत करणे.

निवडणुकीची रणनीती

नुकत्याच पार पडलेल्या राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकांची रणनीती कौशल्याने आखल्याबद्दल माझ्या तरुण सहकार्‍यांची, विशेषतः देवेंद्र फडणवीस आदींची सध्या सर्वत्र वाहव्वा होते आहे.  त्या पार्श्वभूमीवर आणीबाणीत विधान परिषदेवर मुंबई पदवीधर मतदारसंघातून भारतीय जनसंघाच्या दोन्ही उमेदवारांना विजयश्री मिळावी यासाठी मी माझे सर्व संघटन कौशल्य पणास लावले होते. ते दिवस आठवले. आमचे दोन्ही उमेदवार डॉ. वसंतकुमार पंडित व प्रा. ग. भा. कानिटकर त्यावेळी तुरुंगात होते. तरीही त्यांचा विजय झाला. या दोन्ही जागा पहिल्या फेरीतच 70 टक्क्यांपेक्षा जास्त मते घेऊन आम्ही जिंकल्या. त्यासाठी केलेल्या कष्टांचे चीज झाले. या निवडणुकीची आठवण झाली की मी मानाचा मुजरा करतो तो आमच्या गोरेगावच्या श्रीमती शरयू कोल्हटकर यांना! त्यांचे पती व त्या वेळचे गोरेगाव जनसंघाचे उपाध्यक्ष स. के. कोल्हटकर यांचे मतदानाच्या आदल्या दिवशी हृदयविकाराच्या झटक्याने आकस्मिक निधन झाले. दुःखाचा पहाड कोसळला असतानाही आणीबाणीचा निषेध म्हणून कोल्हटकर वहिनींनी दुसर्‍या दिवशी जाऊन मतदान केले. सामन्यांच्यात दडलेलं असामान्यत्व आणीबाणीच्या काळोखात असं उजळून निघालं. या निकालामुळे मुंबईतील सुशिक्षित पदवीधर आणीबाणीच्याविरोधात असल्याचे सिद्ध झाले.

आकस्मिक आघातातही लढा सुरू…

निवडणुकीच्या निमित्ताने माझे काम अन्य राजकीय पक्षांच्याही नजरेत आले. मला जवळून ओळखणारे माझे एक सहकारी तर मला आजही प्रेमाने ऐकवतात की आणीबाणी त्रासाची खरी, पण त्या सर्व आव्हानांतूनच तुमचं नेतृत्व फुललं, तुमचे गुण लक्षात यायला. त्यांचा उपयोग व्हायला एरवी कदाचित बराच काळ जावा लागला असता, पण मुंबई जनसंघात तुमचा एकखांबी तंबू झाल्याने पुढे येऊन तुम्ही जे काम केलं त्यामुळे तुमचे गुण अल्पावधीतच कळले. काही अंशी मीही त्यांच्याशी सहमत आहे.

मी आणि बबनराव कुलकर्णी दोघे अटक न होता बाहेर असताना नियतीच्या दणक्याने माझा एकखांबी तंबू झाला. आणीबाणीविरुद्ध मुंबईतील लढ्याच्या आयोजनाच्या कठीण जबाबदारीमुळे आमच्या दोघांतली मैत्री आणखीच घट्ट झाली होती. एके दिवशी आणीबाणीविरोधात काढावयाच्या दोन पत्रकांचे मसुदे आम्ही तयार केले. ते व अन्य काही सामग्री बबनराव दुसर्‍या दिवशी छपाईसाठी देणार होते. कामे आटोपून दादर स्थानकावर आम्ही एकमेकांचा निरोप घेतला. मी स्कूटरवरून गोरेगावला आलो, तर बबनराव मध्य रेल्वेने मुलुंडला रवाना झाले. घरी येऊन हातपाय धुतो न् धुतो तोच फोन आला. बबनरावांना गाडीतच हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. सहप्रवाशांनी त्यांना इस्पितळात नेले होते, परंतु ते वाचले नाहीत. अतीव दुःख झाले. त्यातच मनात पुढचे विचार आले आणि पायाखालची जमीनच सरकली. बबनरावांच्या बॅगेत आमचे साहित्य व छापखान्याचा तपशील आणि आणीबाणीसंदर्भातील अनेक कागदपत्रे होती. सारेच गोपनीय. मामला रेल्वेत निधनाचा म्हणजे पोलीस हजर झालेच असणार. मी तिथे पोहचण्यापूर्वीच सारे साहित्य पोलिसांच्या हाती लागले, तर आंदोलनाला मोठीच खीळ बसणार. त्याही परिस्थितीत मनावर ताबा ठेवून बबनरावांचे शेजारी व आमचे मित्र आकाशवाणीतील वृत्तनिवेदक शरद चव्हाण यांना फोनवर गाठले. तुम्ही गुपचूप बॅग ताब्यात घेता येते का बघा, अशी गळ घातली. सरकारी नोकरीत असूनही शरद चव्हाणांनी त्याच प्रकारची बॅग झपाट्याने शोधली आणि ती घेऊन ते तडक रुग्णालयात गेले. अतिशय चलाखीने बॅग बदलून बबनरावांची बॅग घेऊन ते परतले. मित्राच्या निधनाचे दुःख बाजूला ठेवून देशहिताचे काम आधी करायचा धडा आणीबाणीविरुद्ध लढताना आम्हाला मिळाला. आजही आणीबाणीचे दिवस म्हटले की या दोन्ही सहकार्‍यांची मला हमखास आठवण येतेच.

पक्षातीत मित्रता

बबनरावांसारखा जिवलग मित्र आणीबाणीत मी गमावला. तथापि. याच आणीबाणीमुळे अन्य राजकीय पक्षांचे मुंबईतील बिनीचे शिलेदार – संघटना काँग्रेसचे प्राणलाल व्होरा व प्रद्युम्न बधेका, सर्वोदय मंडळाचे गोविंदराव देशपांडे, समाजवादी पक्षाचे प्रभुभाई संघवी, आदींशी मित्रत्वाचे नाते जडले ते कायमचे.  आणीबाणीत सर्वांशी समन्वय साधत केलेल्या कामाचा परिणाम म्हणजे आणीबाणी उठल्यावर मुंबईतील लोकसभेच्या सर्वच्या सर्व सहा जागांवर जनता पार्टीचे उमेदवार विजयी झाले. अर्थात जनता पार्टीची औपचारिक स्थापना या लोकसभा निवडणुकीनंतर झाली. जनता पार्टी स्थापन झाल्यानंतर जनता पार्टी, मुंबईच्या अध्यक्षपदाची निवडणूक मतदान घेऊन झाली आणि त्यात मी विजयी झालो याचे कारण जनसंघाव्यतिरिक्त जनता पार्टीत सहभागी झालेल्या अन्य पक्षांच्या मंडळींनीही माझं आणीबाणीतील काम पाहून डॉ. शांती पटेलांनी पुरस्कृत केलेल्या मुकुंदराव भुजबळ पाटील यांच्याऐवजी मला पसंत केलं.

थोरा-मोठ्यांचे थेट मार्गदर्शन

आणीबाणीच्या न भूतो न भविष्यति अशा परिस्थितीमुळे जनसंघाच्याच नव्हे; तर इतरही अनेक मोठ्या नेत्यांशी माझा थेट संबंध आला. माझे राजकीय व्यक्तिमत्त्व संपन्न होण्यास त्याची मोठीच मदत झाली.  आणीबाणीमुळेच रा. स्व. संघाचे भाऊराव देवरस (सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांचे वडील बंधू), नानाजी देशमुख, श्री दत्तोपंत ठेंगडी, मोरोपंत पिंगळे आदी मंडळींना वारंवार भेटता आले. त्यांचे मार्गदर्शन मिळाले. आणीबाणीमुळेच एस. एम. जोशी यांचे सान्निध्यही लाभले; अन्यथा वेगळ्या विचारसरणीच्या नेत्याशी एरवी एवढ्या जवळून कोठला परिचय व्हायला? याच काळात प्रकृती अस्वास्थ्यामुळे जयप्रकाश नारायण यांना जसलोक रुग्णालयात दीर्घकाळ दाखल केले गेले. त्यामुळे त्यांच्या भेटीला देशाभरांतून येणार्‍या अनेक मोठ्या नेत्यांच्या गाठीभेटी झाल्या. अनेकांना ते भूमिगत असल्याने पोलीस पहारे चुकवत जयप्रकाश नारायणांचे दर्शन घडविले.  गनिमी लढायांच्या त्या आधुनिक पद्धती होत्या. भूमिगत नेत्यांनी अनेकदा अचानक वेगवेगळ्या रूपात येऊन आम्हालाही चकविले. नानाजी देशमुखांसारखा धीरगंभीर ज्येष्ठ नेता सुटाबुटात समोर येऊन बोलू लागला तरी आमच्या लक्षात न आल्यामुळे आम्ही कसे कसनुसे झालो ते आठवून आजही हसू येते. त्यात नानाजींची भूमिगत राहायची व्यवस्था आम्हीच गोरेगावात केली होती. समोरच्याला चकवायचे कसे ते असे शिकलो.

आणीबाणीला सर्वांचाच विरोध

आणीबाणी संपविणे भाग पडावे म्हणून एकाचवेळी देशभर वेगवेगळ्या ठिकाणी सत्याग्रह करण्यात यश मिळत होते.  मुस्कटदाबीला न जुमानता बोलण्याचे धैर्य दाखवावे अशी इच्छा, धाडस जनसामान्यांत निर्माण करण्यात आम्ही यशस्वी होत होतो.  आणीबाणीविरुद्धचे जनमत सर्व स्तरांतील लोकांत जागृत करायचे होते. त्यामुळे वेगवेगळ्या क्षेत्रांतील तज्ज्ञांशी जवळून संपर्क साधला. त्यामुळेही माझ्या व्यक्तिमत्त्वाचाही विकास झाला. राजकीय कार्यकर्त्याप्रमाणेच वृत्तपत्रांचीही मुस्कटदाबी होत होती. वृत्तपत्र स्वातंत्र्यावरही गदा आली होती. मग पत्रकारांनाही एकत्र करून त्यांनी सत्याग्रह करण्याचे ठरले.  ‘महाराष्ट्र टाइम्स’चे दि. वि. गोखले, ‘मिड-डे’चे अरविंद कुलकर्णी, ‘इंडियन एक्स्प्रेस’चे नीळकंठ देशमुख यांच्याशी व्यावसायिक सीमांपलिकडे जाऊन मैत्री जुळली. समाजातील सर्वच स्तरांचा आणीबाणीला विरोध होता. एरवी जाहीरपणे भाष्य न करणारा वर्ग म्हणजे न्यायसंस्था, पण आम्ही अनेक ज्येष्ठ न्यायाधीश मंडळींनाही बोलते व्यायचे आवाहन केले. न्यायमूर्ती एम. सी. छगला, न्या. तारकुंडे यांसारख्या ज्येष्ठ मंडळींच्या सभा आम्ही आयोजित केल्या.  त्यांनीही प्रेरणादायी भाषणे केली.

आणीबाणीतली दिवाळी

आणीबाणीत दिवाळीपूर्वी मोठ्या प्रमाणात अटकसत्र सुरू होण्याची पूर्वसूचना माझ्या पोलीस अधिकारी मित्राने दिली होती. मी मुंबईबाहेर जाणे हा त्यावर उपाय होता. तो अंमलात आणणार असल्याचे तुरुंगातील सहकार्‍यांच्याही कानावर जाईल अशी व्यवस्था केली. लगोलग मला आमचे त्या वेळचे महाराष्ट्र जनसंघाचे अध्यक्ष डॉ. वसंत कुमार पंडित यांचा तुरुंगातून निरोप आला.  तुरुंगात नसतानाही कुटुंबीयांशिवाय दिवाळीत राहू नकोस. माथेरानला माझा बंगला रिकामा आहे. तिथे तुम्ही चौघे दिवाळीत जाऊन रहा, असा आदेशच त्यांनी दिला. दोन खणी घरात राहणार्‍या माझ्या दोन्ही शाळकरी मुलींना मुंबईबाहेर तेही मोठ्या बंगल्यात फक्त आई-बाबांसोबत दिवाळी साजरी करताना अवर्णनीय आनंद झाला होता. आजही ती त्यांच्या आठवणीतील अत्यंत लाडकी दिवाळी आहे.

लक्षावधींना तुरुंगवास

देशभरातून आणीबाणीचा होत असलेला विरोध चिरडण्याचे बरेच प्रयत्न झाले, पण अखेर आणीबाणी उठवणे इंदिरा गांधींना भाग पडले. त्यानंतर देशावर कोणतीच संकटे कधी आली नाहीत असे नाही, पण आज देशाच्या स्वातंत्र्याला अमृत महोत्सव साजरा करीत असताना मला वाटतं स्वातंत्र्योत्तर काळातील सर्वांत काळा कालखंड म्हणजे आणीबाणीचे 19 महिने!  या 19 महिन्यांमध्ये देशातील थोडेथोडके नव्हे; तर 1,10,000 जण अटकेत होते. विविध राजकीय पक्ष, संघटना यांच्या सामान्य कार्यकर्त्यापासून अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी यांसारख्या अनेकानेक शीर्षस्थ नेत्यांचा यात समावेश होता. त्याखेरीज आणीबाणीविरुद्ध सत्याग्रह केला, किंबहुना करण्याचा प्रयत्न केला म्हणून काही काळासाठी तुरुंगवास भोगलेल्यांची तर नेमकी गिणतीच उपलब्ध नाही. ती संख्याही अशीच मोठी होती. या सर्व धरपकडींमुळे सामान्य जनता सतत चिंतेत, तणावग्रस्त असे. महागाई, सक्तीची नाकाबंदी अशा अनेक संकटांचा तोंड दाबून सामना करताना जनता पिचून जात होती. या जुलमी राजवटीला कंटाळली होती. सरकारच्या गुप्तचर विभागालाही जुलमी राजवट नकोशी वाटून त्यांनी चुकीचा अहवाल दिला किंवा काय हे ईश्वर जाणे, परंतु गुप्तचर विभागाने निवडणुका घेतल्या तरी पुन्हा तुमचंच राज्य येईल अशी ग्वाही इंदिरा गांधी यांना दिली. त्यामुळे निवडणुका घेण्याचा निर्णय श्रीमती गांधी यांनी घेतला. त्यांच्या कार्यपद्धतीनुसार अचानक आणीबाणी रद्द झाली. दिग्गज नेते-कार्यकर्ते सार्‍यांची मुक्तता झाली. आणीबाणीविरुद्धच्या आंदोलनात सर्व विरोधी राजकीय पक्ष एकत्र आले होते. आम्ही निवडणुकाही एकत्र लढलो. आणीबाणीच्या विरोधात जनमत असल्याने इंदिरा गांधी यांचा दणदणीत पराभव झाला. स्वतंत्र भारताच्या इतिहासातील एका काळ्या कालखंडावर पडदा पडला. आणीबाणी जवळून पाहिलेली पिढीही आता हळूहळू काळाच्या पडद्याआड जाईल. आज स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात या आठवणींना उजाळा देण्यामागे एकच हेतू आहे तो म्हणजे स्वातंत्र्यासाठी परकियांशी आणि प्रसंगी स्वकियांशीही लढावे लागते आणि अंतिमतः विजय स्वातंत्र्यासाठी निर्धाराने लढणार्‍यांचाच होतो हे त्रिकालाबाधित सत्य नव्या पिढीला उमजावे. या देशात पुन्हा अशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी योग्य सरकार निवडणे गरजेचे आहे हेही यानिमित्ताने अधोरेखित करावेसे वाटते.

-राम नाईक, माजी राज्यपाल, उत्तर प्रदेश

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply