Breaking News

व्यापक सायबर प्रशिक्षण हवे

राज्य महिला आयोग आणि रिस्पॉन्सिबल नेटिझम यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यात मंगळवारपासून डिजिटल स्त्री शक्ती उपक्रम राबवला जाणार आहे. या उपक्रमांतर्गत राज्यभरातील दहा शहरांतील 5 हजार महाविद्यालयीन तरुणींना सायबर सुरक्षेबाबत ऑनलाइन प्रशिक्षण दिले जाणार आहे. कोरोनाचा फैलाव व पाठोपाठचे लॉकडाऊन यामुळे बदललेल्या जीवनशैलीत सर्वसामान्यांच्याही ऑनलाइन व्यवहार व संपर्कात कमालीची वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर स्वाभाविकच सायबर गुन्हेही बोकाळले असून एकंदरच सायबर साक्षरतेची गरज कधी नव्हे इतकी वाढली आहे.

स्मार्ट फोनमुळे इंटरनेटचे महाजाल अगदी सामान्यातल्या सामान्य माणसापर्यंत जाऊन पोहचले असून त्याची व्याप्ती वेगाने वाढते आहे. फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपसारखी संपर्काची सुलभता वाढवणारी समाजमाध्यमे जसजशी लोकप्रिय होत गेली तसतसा तळागाळातला सर्वसामान्य माणूसही सायबर विश्वात सक्रिय होत गेला. ऑनलाइन खरेदीत मिळणार्‍या बक्कळ डिस्काऊंटनेही त्याला इंटरनेटच्या वापराकडे वळवले. महानगरांतील तळाच्या स्तरातील घरकामगार महिलांपासून ते खेड्यातील लहान शेतकरी कुटुंबातील किशोरवयीन मुलांपर्यंत सारेच आता प्रयत्नपूर्वक सायबर विश्वाचा घटक होऊ पाहताना दिसतात. टिकटॉकसारखे आतापर्यंत लोकप्रिय असलेले आणि चिनी अ‍ॅपवरील बंदीमुळे आता बंद झालेले व्हिडिओ मेकिंग अ‍ॅप असेल वा युट्यूबसारखा अधिक स्थिरस्थावर, व्यापक मंच शहरी-ग्रामीण, गरीब-श्रीमंत या भिंती इथे कधीच नाहिशा झालेल्या दिसतात. देशातील इंटरनेटच्या वापरकर्त्यांची संख्या वाढवण्यात यांचा मोठा हातभार आहे. महाराष्ट्रातील कुठल्याशा खेड्यातील गावकुसाबाहेरच्या पालावरचे एखादे मजूर जोडपे

हिरो-हिरोइनप्रमाणे गाण्यांवर नाचून व्हिडिओ बनवते आणि ते वेगाने व्हायरल होतात. किंवा गावरान पदार्थांच्या पाककृती चुलीवर शिजवून दाखवणार्‍या एखाद्या ग्रामीण जोडप्याचा युट्यूब चॅनल लाखो सबस्क्राइबर कमावून बसतो. हे सारे शक्य झाले आहे ते इंटरनेटच्या करामतीमुळेच. अर्थात सायबर विश्वाचे हे फायदे जसे आहेत तशीच त्यातून बोकाळणारी सायबर गुन्हेगारीही आहे. इंटरनेटच्या वापराची, त्यातील तांत्रिक बाबींची पुरती माहिती नसल्याने

सर्वसामान्य जनताच काय बर्‍याचदा अन्यथा सुशिक्षित, उच्चशिक्षित म्हणवणारेही सायबर गुन्हेगारीत लक्ष्य ठरलेले दिसतात. बँकांचे ऑनलाइन व्यवहार करणे हे शहरात गेली काही वर्षे सर्रास रूढ झाले आहे. महानगरांतील वेगवान आयुष्यात ती एक गरजच बनल्याने तसेच बँकांकडूनही ऑनलाइन व्यवहारांनाच अधिक प्रोत्साहन दिले गेल्याने एरव्ही इंटरनेटचा फारसा वापर न करणार्‍यांनाही त्याकडे वळणे भाग पडले. कोरोना विषाणूच्या जगभरातील प्रादुर्भावानंतर तर सारेच जगणे बदलले. कठोर लॉकडाऊनच्या काळात शून्य संपर्कावर भर दिला जाऊ लागला. अगदी गल्लीबोळातील भाजीवाल्यापासून दूधवाल्यापर्यंत सारेच ऑनलाइन पेमेंट, गुगल पे आदी अ‍ॅपची मागणी करू लागले. कोरोना फैलावाची शक्यता लक्षात घेऊन सगळ्यांनाच नोटांची देवाणघेवाण टाळणे आवश्यक वाटू लागले आहे. लॉकडाऊनच्या या काळापासून सायबर गुन्हेगारीही वेगाने वाढल्याचे समोर आले. एकट्या महाराष्ट्रात या काळात 400 सायबर गुन्ह्यांची नोंद झाल्याचे सांगितले जाते. वाढती बेरोजगारी, नैराश्य व ताण आदींमुळे सायबर लैंगिक शोषणातही वाढ झाल्याचे दिसून येते. या सार्‍या पार्श्वभूमीवर राज्यातील तरुणींना सायबर सुरक्षिततेचे धडे दिले जाणार आहेत हे योग्यच आहे. परंतु कोरोनाची चाचणी, उपचार आदींसंदर्भात बोगस मेसेजेसचा सध्या सुळसुळाट झालेला असल्याने विश्वासार्हता तपासूनच एखाद्या लिंकवर क्लिक करा, असे आवाहन जनतेला करावे लागते आहे. त्यामुळे सायबर सुरक्षिततेसंबंधी प्रशिक्षणाची व्याप्तीही वेगाने वाढवावी लागणार आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply