मुंबईमध्ये मंगळवारी फक्त 700 कोरोना केसेसची नोंद झाल्याचा आनंद राज्य सरकारकडून व्यक्त करण्यात आला. पण या आकड्यांच्या खेळाला कोण भुलेल? आजच्या घडीलाही देशातील एकूण कोरोना केसेसच्या एक चतुर्थांश केसेस महाराष्ट्रातील आहेत. वाढते कोरोना मृत्यू हे राज्यासमोरील सर्वात मोठे आव्हान आहे. नुकतेच उत्तर प्रदेशसारख्या राज्याने कोरोना चाचण्यांच्या संदर्भात महाराष्ट्राला मागे टाकले याकडेही ठाकरे सरकारने लक्ष द्यावे.
जसजशी येत्या ऑगस्ट महिन्याची एक तारीख जवळ येत चालली आहे तसतशी पुन्हा अनलॉकच्या पुढील टप्प्याची चर्चा रंगू लागली आहे. अर्थव्यवस्था सांभाळण्याच्या दृष्टीने, लोकांच्या उपजीविका वाचवण्याच्या दृष्टीने आता शक्य तितके सारे काही सुयोग्य खबरदारी घेऊन पूर्वीसारखे सुरू करावे यासाठी उद्योजकांकडून केंद्रसरकारकडे मोठ्या प्रमाणात मागणी केली जाते आहे. खरे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने अनलॉक 2 मध्येच कंटेन्मेंट झोन वगळता उर्वरित भागांत बहुतेक सारे व्यवहार सुरू करण्यास परवानगी दिली होती. परंतु स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन देशभरातीलच महापालिका आणि जिल्हा प्रशासनांकडून नव्याने लॉकडाऊन लादणे सुरू आहे. आता मात्र नोकर्या टिकवायच्या असतील तर गेले चार महिने पूर्णपणे ठप्प असलेल्या काही क्षेत्रांतील व्यवहार पुन्हा सुरू करावेच लागतील असा सूर अर्थतज्ज्ञ लावीत आहेत. मॉलचेच उदाहरण घेतले तर तब्बल 50 लाख नोकर्यांचा प्रश्न आहे. गेले चार महिने मॉल, सिनेमागृहे, जिम, बार पूर्णत: बंद आहेत. खबरदारी घेऊन ठिकठिकाणची सिनेमागृहे पुन्हा सुरू करण्याचे पाऊल उचलले जाईल अशी चर्चा आहे. परंतु पुन्हा स्थानिक परिस्थिती लक्षात घ्यावीच लागेल. महाराष्ट्र एव्हाना चार लाख एकूण रुग्णसंख्येच्या जवळ जाऊन पोहचला आहे. राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर 59.34 टक्के इतका आहे तर हेच प्रमाण देशपातळीवर 64.23 टक्के इतके आहे. देशातील सर्वाधिक कोरोना मृत्यू हे महाराष्ट्रातील आहेत. वाढते मृत्यू हे राज्यासमोरील सर्वात मोठे आव्हान आहे. राज्यात आजवर 13 हजार 883 लोक कोरोनामुळे दगावले असून यापैकी 42 टक्के मृत्यू हे एकट्या जुलैमधील आहेत. यावरून परिस्थिती किती बिकट होत चालली आहे हे ध्यानात यावे. जुलै महिन्यात 27 तारखेपर्यंतच राज्यात 5877 कोरोना मृत्यू नोंदले गेले आहेत. जूनमध्ये ही संख्या 5638 इतकी होती. त्यापूर्वी मे मध्ये 2286, एप्रिलमध्ये 449 तर मार्चमध्ये अवघे 10 कोरोना मृत्यू राज्यात नोंदले गेले होते. परिस्थिती नेमकी कशी आहे हे यातून पुरते स्पष्ट होते. राज्यातील मृत्यू दर सध्या एकूण रुग्णांच्या 3.62 टक्के एवढा आहे. दुसरीकडे, उत्तर प्रदेशसारख्या मागास म्हणवल्या जाणार्या राज्याने आजवर 19.41 लाख इतक्या कोरोना चाचण्या केल्या आहेत. तर महाराष्ट्रात 19.25 लाख चाचण्या झाल्या आहेत. तामिळनाडूने आजवर देशात सर्वाधिक 24.14 लाख इतक्या चाचण्या केल्या आहेत. राज्यात सध्या आठ लाख 85 हजार 545 व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर 42 हजार 733 जण हॉस्पिटल वा तत्सम सुविधांमध्ये उपचार घेत आहेत. राज्यातील एकूण अॅक्टिव्ह रुग्णसंख्या एक लाख 44 हजार 694 इतकी आहे. राज्यातील लोकांनाही मॉल, हॉटेल्स, जिम आदी सुविधा सुरू झालेल्या हव्या आहेत. लोकांना त्यांचे रोजगार परत मिळवून द्यायलाही हवे आहेत. परंतु तूर्तास जीव वाचवण्यालाच प्राधान्य द्यावे लागेल असे दिसते आहे.