- विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची सरकारवर टीका
- भाजप नेत्यांकडून रोह्यातील मयत मुलीच्या कुटुंबीयांचे सांत्वन
रोहा ः प्रतिनिधी
तांबडी बुद्रुक येथील घटना हृदय हेलवणारी असून, या घटनेने माणुसकीला कलंक लावला आहे. गेले अनेक दिवसांपासून राज्यात रोजच महिला-मुलींवर कुठेना कुठे बलात्कार, विनयभंग, अत्याचार असे प्रकार सुरू आहेत. त्यानंतर आता रोहा तालुक्यात निष्पाप अल्पवयीन मुलगी पाशवी अत्याचाराचा बळी ठरली. यासाठी आमचे शब्दच थिटे पडत आहेत. रोज अशा घटना घडत असल्याने कायद्याचे राज्य आहे की नाही, असा सर्वसामान्यांना प्रश्न पडतो, अशा शब्दांत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले.
रोहा तालुक्यातील तांबडी बुद्रक येथील 14 वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेत्यांनी मंगळवारी (दि. 28) घटनास्थळी जाऊन पाहणी केली व त्यानंतर मयत मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. त्या वेळी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर माध्यमांशी बोलत होते. त्यांच्यासह रायगड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व विद्यमान आमदार रवींद्र चव्हाण, भाजप महिला मोर्चा प्रदेश अध्यक्ष अॅड. माधवी नाईक, उपाध्यक्ष चित्रा वाघ, भाजप दक्षिण जिल्हा अध्यक्ष अॅड. महेश मोहिते, संजय कोनकर, तालुका अध्यक्ष सोपान जांभेकर, राजेश मापारा, मेघना ओक, श्रद्धा घाग, धनश्री बापट, शैलेश रावकर, सनीलकुमार, संजय लोटणकर, ज्योती आदी उपस्थित होते.
विरोधी पक्षनेते दरेकर पुढे म्हणाले की, राज्यातील खेड्या-पाड्यात, तांडे-वस्तीत आपल्या मुलीबाळींनी घराबाहेर पडावे की नाही असे लोकांमध्ये भय निर्माण झाले आहे. तांबडी येथील घटनेत आरोपीबद्दल लोकांच्या मनात शंका आहेत. हे एका व्यक्तीचे कृत्य नाही असे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. त्यामुळे पोलिसांना आम्ही सूचना करूच, शिवाय भाजप महिला संघटनेच्या वतीने चांगले वकील देऊ. आरोपीला कठोर शिक्षा मिळावी यासाठी मी स्वत: पोलीस अधीक्षकांशीही बोललो आहे.
या वेळी राज्य सरकारवर टीका करताना दरेकर यांनी सांगितले की, या सरकारच्या संवेदना पूर्णत: मेल्या आहेत. अशा वेळेला बोललो नाही तर सरकारही जागे होणार नाही. घटना घडल्यानंतर पोलीस सतर्क होतात. कायद्याचा धाक निर्माण होतो, परंतु रोज मरे त्याला
कोण रडे अशी मानसिकता त्यांची झाली आहे.
परवा गृहमंत्री पुण्यात होते. पुण्यात आले असताना असताना शेजारी चाकणला झालेल्या घटनेची दखल घेत ना मंत्री गेले, ना कुठला सत्ताधारी आमदार गेला. एवढ्या दहशतीखाली एका घराला राज्यात वावरावे लागत असेल तर पोलिसांचा धाक राज्यात संपलेला आहे. पोलिसांवर सरकारचे नियंत्रण राहिले नाही. त्यामुळेच राज्यात अशा प्रकारच्या घटना घडत आहेत. सरकार वेळीच जागे झाले नाही आणि सरकारने उपाययोजना केल्या नाहीत तर आम्हाला यापुढे कठोर पावले उचलावी लागतील, असा इशाराही त्यांनी दिला.
भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ म्हणाल्या की, आज राज्यात महिला, मुली सुरक्षित नाहीत. अगदी उपचारासाठी दाखल झालेल्या महिलांवर क्वारंटाइन सेंटरमध्ये विनयभंग, बलात्कारसारखे प्रकार घडले आहेत, परंतु सरकार फक्त त्रिसदस्य समिती नेमून व आम्ही चौकशी करणार, असे सांगून मोकळे होते. याने प्रश्न सुटणार नाहीत. ग्राऊंड रियालटीमध्ये राज्यात भयाण व भीषण वास्तव चित्र महाराष्ट्रात आहे. याबाबत सरकारने स्पष्टता द्यावी. 90 दिवसांत चार्टशीट दाखल करून फास्ट ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून आरोपीला शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.
क्वारंटाइन सेंटरमध्ये तरुणीचा विनयभंग
रोहा : तालुक्यातील तांबडी बुद्रुक येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याची घटना ताजी असतानाच धाटाव एमआयडीसीतील सुदर्शन कंपनीच्या क्वारंटाइन सेंटरमध्ये दाखल 19 वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. एका कंत्राटी कामगाराने हे कृत्य केले असून, या प्रकरणी रोहा पोलीस ठाण्यात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित युवती, तिचा भाऊ व इतर क्वारंटाइन सेंटरमध्ये बसले असताना रुग्णांच्या सेवेसाठी असणारा कंत्राटी कामगार (रा. वरसे, ता. रोहा) साफसफाई व अन्य काम करीत होता. संबंधित तरुणी क्वारंटाइन सेंटरमध्ये दाखल झाल्यानंतर या कामगाराने तिचा मोबाइल नंबर मिळवला आणि सतत तिला फोन करू लागला. यादरम्यान मैत्री करण्यासाठीही तो तिच्या मागे लागला, मात्र तिने त्याकडे दुर्लक्ष केले. 26 जुलै रोजी या तरुणीच्या जवळ जात त्या कामगाराने तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार तिने पालकांना सांगितल्यानंतर त्यांनी रोहा पोलीस ठाणे गाठले. या प्रकरणी लंपट कामगाराविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सुरू आहे.
महिला, मुली असुरक्षित; चित्रा वाघ यांचा संताप
या वेळी भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी राज्यात महिला, मुलींवर अत्याचार व त्यांना जीवे मारण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याबद्दल चिंता व संताप व्यक्त केला. राज्य सरकारकडून फक्त भाषणात महिला सुरक्षा व सक्षमीकरणावर बोलले जाते, पण ज्या वेळी खरोखरच महिलांच्या सुरक्षेची वेळ येते त्या वेळी सरकार कुठेही दिसत नाही. आरोपींवर कारवाई होत नाही. हिंगणघाटच्या घटनेनंतर राज्याचे गृहमंत्री आंध्र प्रदेशला गेले व तेथून आपण दिशा कायदा आणणार असे बोलले होते, मात्र अजून किती मुली-महिलांवर बलात्कार, विनयभंगाची वा त्यांची हत्या होण्याची वाट सरकार बघणार, असा सवालही वाघ यांनी केला.