एका सर्वेक्षणानुसार मुंबईतील झोपडपट्टीतील 57 टक्के लोक कोरोनाच्या संसर्गातून स्वबळावर बरे झाल्याचे दिसून आले. मुंबई ‘हर्ड इम्युनिटी’च्या दिशेने असे चित्र यातून सूचित होत असले तरी आणखी व्यापक स्तरावर असे सर्वेक्षण होण्याची गरज आहे. या लोकांमध्ये आढळलेल्या अॅन्टीबॉडी भविष्यातही कोरोनापासून संरक्षण देऊ शकतील का आदी अनेक बाबींविषयी अद्याप संशोधन व्हायचे आहे हेही लक्षात घेतले पाहिजे.
मुंबईत पार पडलेल्या एका सर्वेक्षणात तब्बल 57 टक्के लोकांमध्ये कोरोना विषाणूविरोधी अॅन्टीबॉडी तयार झाल्याचे दिसून आले आहे. मुंबईमध्ये अलिकडच्या काळात गरीब वस्त्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याचे दिसून आल्याने राज्य सरकार व मुंबई महापालिका प्रशासनाने स्वत:ची पाठ थोपटून घेतली होती. परंतु या वस्त्यांमधील बरेचसे लोक हे कोरोनाचा संसर्ग होऊन त्यातून आपोआपच बरे झाले असावेत असे वरील सर्वेक्षणाच्या आधारे म्हणता येऊ शकेल. त्यामुळेच मुंबईतील सुमारे 40 टक्के लोक स्वबळावर कोरोनातून बरे झाले असतील तर राज्य सरकारने काय करुन दाखवले हा भाजपचे ज्येष्ठ नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी विचारलेला प्रश्न रास्तच आहे. मुंबईत एक लाख लोकांची अॅन्टीबॉडी चाचणी करण्याची मागणी शेलार यांनी केली. मोठ्या प्रमाणात या चाचण्या केल्यानंतरच मुंबईतील सत्य समोर येईल, असे शेलार यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे. त्यांची ही मागणी कुणाला राजकीय अजेंड्याचा भाग वाटत असल्यास त्यांनी उपरोक्त सर्वेक्षणावर तज्ज्ञ डॉक्टरांनी काय म्हटले आहे याची माहिती अवश्य घ्यावी. मुंबई हर्ड इम्युनिटीच्या दिशेने असा निष्कर्ष वरील सर्वेक्षणाच्या आधारे काढता येत असला तरी सर्वेक्षणात सहभागी लोकांची संख्या शहराच्या एकंदर लोकसंख्येच्या तुलनेत फारच कमी असल्याने इतर अनेक वॉर्डांमध्ये असे सर्वेक्षण होण्याची गरज आहे यावर तज्ज्ञ डॉक्टरांनी भर दिलेला आहे. मुंबईतील तीन वॉर्डांमधील सहा हजार 936 लोकांची चाचणी केली असता त्याच्यापैकी 40.5 टक्के लोकांना कोरोनाचा संसर्ग होऊन त्यांच्या शरीरात कोरोनाविरोधी अॅन्टीबॉडी तयार झाल्याचे आढळून आले. या सर्वेक्षणात गरीब वस्त्यांमध्ये सुमारे 57 टक्के लोक असे स्वबळावर कोरोनातून बरे झालेले दिसले तर इमारतींमध्ये वा संकुलात राहणार्या लोकांमध्ये हे प्रमाण 16 टक्के असल्याचे दिसून आले. एखाद्या प्रदेशातील 60 टक्के लोक जेव्हा अशा तर्हेने स्वबळाने बरे होतात तेव्हा तेथील जनसमुदायाने त्या विषाणूच्या विरोधात ‘हर्ड इम्युनिटी’ प्राप्त केली आहे असे म्हटले जाते. जगभरात अनेक देशांनी यापूर्वीच आपल्याकडे अशी कोरोनाविरोधी ‘हर्ड इम्युनिटी’ तयार होते का याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याशी तुलना करता मुंबईतील झोपडपट्टयांमध्ये आढळलेले स्वबळावर कोरोनाला सामोरे गेलेल्या लोकांचे 57 टक्के हे प्रमाण खूपच अधिक आहे. स्पेनमध्ये 61 हजार लोकांमध्ये असे केवळ पाच टक्के लोक आढळले होते तर न्यूयॉर्कमध्ये तीन लाखांहून अधिक लोकांपैकी केवळ 26 टक्के लोकांमध्ये अशा अॅन्टीबॉडी आढळल्या होत्या. मुंबईतील गरीब वस्त्यांमध्ये दाटीवाटीने असलेली घरे, सार्वजनिक शौचालये व नळ यामुळे परस्पर संपर्क टाळणे लोकांना अशक्यच होते. त्यामुळे तेथे वेगाने व मोठ्या प्रमाणावर फैलाव झाला असावा. स्वबळावर बरे झालेल्या तेथील लोकांमध्ये स्त्रियांची संख्या मोठी आहे हेही लक्षात घ्यायला हवे. गरीब वस्त्यांच्या तुलनेत परस्पर संपर्क टाळणे सहज शक्य असलेल्या इमारतींमध्ये मात्र स्वबळावर बरे झालेल्यांचे प्रमाण अवघे 16 टक्के दिसते. परंतु मुंबईची लोकसंख्या 1.8 कोटी इतकी असताना अवघ्या सात हजारांहून कमी लोकांच्या सर्वेक्षणाच्या आधारे निष्कर्ष काढण्याची घाई करता कामा नये. सर्व वॉर्डांमध्ये असे सर्वेक्षण झाल्यास मुंबईत कोरोना खरोखरच किती पसरला आहे हेही कळू शकेल.