Breaking News

राष्ट्रवादी-शिवसेनेत आता सोशल वॉर; रायगडातील दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते समाजमाध्यमांवर आक्रमक

अलिबाग ः रामप्रहर वृत्त

महाविकास आघाडी सरकारमधील दोन घटक पक्ष राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात रायगड जिल्ह्यामध्ये वाद निर्माण झाला आहे. आता यावरून सोशल मीडियातून पोस्टर वॉरही सुरू झाले आहे. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यातील संघर्ष आणखी वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. शिवसेनेचे महाडमधील आमदार भरत गोगावले यांनी काही दिवसांपूर्वी माणगाव येथे पत्रकार परिषद घेऊन रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांना हटविण्याची मागणी केली. याला आपल्या पक्षाचे अलिबागचे आमदार महेंद्र दळवी आणि कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांचाही पाठिंबा असल्याचे आमदार गोगावले यांनी म्हटले होते.शिवसेनेच्या पालकमंत्री बदलावा या भूमिकेला राष्ट्रवादी काँग्रेसने उत्तर दिले आहे. पालकमंत्री बदलण्याऐवजी महाडचा आमदार बदलण्याची वेळ आली असल्याचे पोस्टर सोशल मीडियावर झळकले आहेत. 2024मध्ये महाडचा आमदार बदलू हा आमचा शब्द आहे, असे थेट आव्हान राष्ट्रवादीने शिवसेनेला दिले आहे. पालकमंत्री आदिती तटकरे यांची रायगड जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ’पुष्पा’ चित्रपटातील प्रसिद्ध असलेला डायलॉग वापरून तयार केलेली पोस्ट चर्चेत आहे. ’लडकी समजके फ्लॉवर समझे क्या, फायर है हम’ या पोस्टमुळे शिवसैनिक अधिकच आक्रमक बनले आहेत. राष्ट्रवादीच्या पोस्टरबाजीला प्रत्युत्तर देताना त्यांनी ’कालपण… आजपण आणि उद्यापण शिवसेनाच’ या टॅगलाइनने पोस्ट तयार करून ती सोशल माध्यमातून व्हायरल केली जात आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये रायगडातील शिवसैनिकांनी फक्त राष्ट्रवादीची भांडी घासायची काय, असा सवालही शिवसैनिक सोशल मीडियावर विचारत आहेत. राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यापासून रायगडात शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये धुसफूस आहे. जिल्ह्याचे पालकमंत्रिपद राष्ट्रवादीचा एकमेव आमदार म्हणून निवडून आलेल्या आदिती तटकरे यांना दिल्याने तीन आमदार असलेली शिवसेना पहिल्यापासूनच नाराज आहे. त्यानंतर वर्चस्ववाद, विकासकामे, निधीवाटप यांच्यावरून दोन पक्षांमध्ये सातत्याने खटके उडत आहेत. हा असंतोष आता उफाळून आला असून दोन्हीकडचे कार्यकर्तेही आक्रमक झाले आहेत.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर यांना मुंबई मराठी पत्रकार संघाचे विशेष सन्माननीय सदस्यत्व प्रदान

पनवेल : प्रतिनिधी मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वर्धापन दिनानिमित्त संघाच्या पत्रकार भवनातील सभागृहात शुक्रवारी (दि.21) …

Leave a Reply