Breaking News

कोविड केअर सेंटर्समध्ये कर्मचार्यांची कमतरता

रुग्णांच्या उपचारावर मर्यादा

उरण : प्रतिनिधी

जेएनपीटी आरोग्य विभाग आणि उरण तहसीलदारांनी वारंवार आवाहन करूनही कोविड सेंटरमध्ये रुग्णांना वैद्यकीय सेवा देण्यासाठी एकाही एमबीबीएस डॉक्टराने येण्याची तयारी दाखवली नाही. त्याचबरोबर आवश्यकतेनुसार नर्स, वार्डबॉय, अन्य कर्मचारीही येण्यास राजी नाहीत. त्यामुळे उरण, जेएनपीटीमध्ये नव्याने सुरू करण्यात आलेली तिन्ही कोविड सेंटर्स उपचारासाठी कुचकामी ठरू लागली आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस रुग्णांना आवश्यक उपचार मिळणे अवघड होऊन बसले आहे. कमी कर्मचार्‍यांच्या बळावरही प्रशासनाला दररोज कोरोनाशी लढावे लागत आहे. परिणामी कोविड रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

वाढत्या औद्योगिकीकरणामुळे अल्पावधीतच देशाची दुसरी आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणार्‍या उरण परिसरालाही कोरोनाचा विळखा घट्ट होत चालला आहे. उरण परिसरातील कोरोनाबाधित रुग्णांवर

उरणमध्येच उपचारासाठी तीन कोविड केअर सेंटरची उभारणी केली आहे. यामध्ये बोकडवीरा येथील केअर पाइंट सेंटरमधील 40 बेडचे कोविड केअर सेंटर, जेएनपीटी ट्रॉमा सेंटरमधील 16 बेडचे डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटर आणि बोकडवीरा येथील सिडकोच्या प्रशिक्षण केंद्रात जेएनपीटीच्या माध्यमातून उभारण्यात आलेले 120 बेडचे कोविड केअर सेंटर या तीन कोविड केअर सेंटरचा समावेश आहे.

यापैकी 40 बेडचे डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलची जबाबदारी उरण येथील शासकीय इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज बद्रे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली, मात्र या कोविड केअर सेंटरमध्ये अनेक सुविधांची वानवा आहे. सेंटरमध्ये डॉक्टर, नर्सेस, वार्डबॉयची कमतरता आहे. तसेच सेंटरमध्ये एमबीबीएस डॉक्टरच उपलब्ध नसल्याने सध्या खासगी आयुर्वेदिक डॉक्टरांकडून रुग्णांवर उपचार केले जात आहेत. सेंटरमध्ये 25 ते 30 बेडसाठी ऑक्सिजनची व्यवस्था असतानाही डॉक्टरांअभावी रुग्णांना उपचारासाठी नवी मुंबई, पनवेलला पाठविण्याची वेळ प्रशासनावर येते. सध्या कोविड केअर सेंटर अद्ययावत करण्यात येत आहे. सेंटरमध्ये सध्या उपलब्ध असलेले चार खासगी डॉक्टर रुग्णांवर उपचार करण्याचे काम करीत आहेत. रुग्णांना योग्य उपचार मिळण्यासाठी आठ एमबीबीएस डॉक्टर, 10 नर्सेस आणि वॉर्डबॉयची आवश्यकता आहे. याची माहिती तहसीलदारांसह संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांना देण्यात आल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज बद्रे यांनी सांगितले.

बोकडवीरा येथील सिडकोच्या प्रशिक्षण केंद्रात जेएनपीटीच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या 120 बेडच्या कोविड सेंटरची जबाबदारी उरण तालुका आरोग्य विभागाचे आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र इटकरे सांभाळत आहेत. येथेही मोठ्या प्रमाणात एमबीबीएस डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्डबॉयची कमतरता आहे. या सेंटरमध्येही कोविड रुग्णांवर तातडीने उपचारासाठी 10 एमबीबीएस डॉक्टर्स, 10 नर्सेस, वॉर्डबॉयची आवश्यकता आहे. याबाबत वरिष्ठांकडे मागणी केल्यानंतरही अद्याप प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे रुग्णांवर उपचार करणे अवघड होऊन बसल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र इटकरे यांनी दिली आहे.

जेएनपीटी ट्रॉमा सेंटरमधील सध्या उपलब्ध असलेल्या 16 बेडचे डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटरचा  कार्यभार जेएनपीटीचे डेप्युटी सीएमओ डॉ. राज हिंगोरानी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली सुरू आहे. उरण तालुक्यातील दुसर्‍या स्टेजमधील  कोविड रुग्णांच्या उपचारासाठी  रुग्णालयात जिल्हाधिकारी, जेएनपीटीचे विश्वस्त, कामगार नेते दिनेश पाटील, विश्वस्त भूषण पाटील, रवींद्र पाटील, माजी कामगार विश्वस्तांच्या प्रयत्नांतून 48 बेडची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी  प्रयत्न सुरू आहेत, मात्र सध्यातरी किमान 25 बेडसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठीच कामकाज सुरू करण्यात आले आहे. यासाठी ऑक्सिजनची व्यवस्था करण्याचेही काम सुरू करण्यात आले आहे. 16 बेडसाठी ऑक्सिजनची व्यवस्था झाल्याने सध्या सर्वच ऑक्सिजनचे बेड रुग्णांनी भरले आहेत. जेएनपीटीच्या डेडिकेटेड कोविड सेंटरमध्येही मोठ्या प्रमाणात एमबीबीएस डॉक्टर्स, नर्सेसची उणीव भासू लागली आहे. त्यामुळे कोविडच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे सोयीसुविधांवर जेएनपीटीने कितीही खर्च केला तरीही उपचारासाठी डॉक्टर्स नसतील तर सगळेच व्यर्थ आहे. त्यामुळे रुग्णांच्या उपचारावरही मर्यादा आल्या आहेत. येथे एक फिजिशियन, तीन एमबीबीएस डॉक्टर्स आणि नर्सेसची गरज आहे.

यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून फिजिशियन, एमबीबीएस डॉक्टर आणि नर्सेससाठी आवाहनही करण्यात आले, मात्र तहसीलदार आणि जेएनपीटीच्या आवाहनाला अद्यापही प्रतिसाद मिळाला नसल्याची माहिती जेएनपीटीचे डेप्युटी सीएमओ डॉ. राज हिंगोरानी यांनी दिली. या तिन्ही कोविड केअर सेंटरमध्ये किमान 15 एमबीबीएस डॉक्टर्स, 25 नर्सेस, वॉर्डबॉय आदी कर्मचार्‍यांची गरज आहे, मात्र गरीब-गरजू रुग्णांची सेवा करण्याची शपथ घेतलेला एकही एमबीबीएस डॉक्टर कोविड सेंटरमध्ये काम करण्यासाठी तयार नाही.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply