Breaking News

सॅनिटायझरच्या वापराकडे दुर्लक्ष

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

शहरातील काही नागरिकांची बेफिकिरी वाढल्याने कोरोनाबाधित रुग्णांमध्ये पुन्हा वाढ होऊ लागली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने वापरण्यात येणार्‍या सॅनिटायझरची मागणी गेल्यावर्षी 80 ते 85 टक्क्यांवर पोहचली होती, परंतु विविध कारणांमुळे ही विक्रीदेखील 10 ते 15 टक्क्यांवर आली आहे.

नवी मुंबई शहरात आटोक्यात आलेला कोरोना पुन्हा वाढू लागला आहे, परंतु स्वच्छतेच्या दृष्टीने वापरण्यात येणार्‍या सॅनिटायझरचा वापर मात्र कमी झाला आहे. गेल्यावर्षी कोरोनाला सुरुवात झाली त्यावेळी या आजाराच्या उपचाराविषयी माहिती नव्हती. त्यामुळे सॅनिटायझरने हातांची स्वच्छता केल्यास सुरक्षित राहिले जाऊ शकते अशी नागरिकांची समजूत झाली होती. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती सॅनिटायझरचा वापर करू लागला होता. सॅनिटायझरच्या वाढलेल्या मागणीमुळे बाजारात अनेक ठिकाणी सॅनिटायझरची कमतरता भासू लागली होती. त्यामुळे कंपन्यांनी सॅनिटायझरचे दरदेखील वाढविले होते. नागरिकांची आर्थिक लूट होत असल्याने शासनाच्या सूचनेनुसार दर निम्मे करण्यात आले होते. याकाळात शासन, विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये स्वच्छतेची जनजागृती करताना  सॅनिटायझर किंवा साबणाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात येत होते. त्यानंतर काही प्रमाणात सॅनिटायझरची मागणी घटली. कोरोनाकाळात कामानिमित्त घराबाहेर पडणारे नागरिक स्वतःकडे सॅनिटायझर बाळगत होते, परंतु आता अनेक नागरिक कोरोनाला गांभीर्याने घेत नाहीत. तसेच सुरक्षा नियमांचे पालन करत नाहीत.

विक्री 15 टक्क्यांवर

कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात हातांची स्वच्छता करण्यासाठी सॅनिटायझरला प्राधान्य दिले जात होते. सॅनिटायझरची मागणी वाढल्याने अनेक कंपन्यांनी बाजारात विविध सुगंध, रंगांचे सॅनिटायझर विक्रीसाठी आणले होते. सुरुवातीला यांचे दरदेखील जास्त होते. तरी देखील नागरिक सॅनिटायझर खरेदी करत होते. परंतु आता नागरिक कोरोनाची भीती नसल्यासारखे वागत असून पूर्वीप्रमाणे नियमाचे आणि स्वच्छतेचे पालन करत नाहीत.  त्यामुळे सॅनिटायझरचा वापर देखील कमी झाला असून पूर्वीच्या तुलनेत सॅनिटायझरची विक्री सुमारे 15 टक्क्यांवर आली आहे.

कोरोनापासून संरक्षण होण्यासाठी आता साबणाचा वापर करतो. कार्यालय, बँक आदी ठिकाणी गेल्यावर त्या ठिकाणी असलेल्या सॅनिटायझरचा वापर करतो.

-शशिकांत म्हात्रे, नागरिक

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply