पनवेल : बातमीदार
कोरोना संकटाला रोखण्यासाठी सरकारने जाहीर केलेल्या लॉकडाऊन, अनलॉकदरम्यान 24 तास घरात बसून अन्य आजारांना निमंत्रण मिळत आहे. विविध उपाययोजना राबवूनही दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत असल्याने घराबाहेर पडण्याची सोयच नाही. डोकेदुखीबरोबरच आता पोटाचे विकारही नागरिकांना जडत आहेत. त्यातही अपचन, बद्धकोष्टता आणि मूळव्याधाच्या दुखण्याने डोकेवर काढले आहे. याशिवाय वर्क फ्रॉम होममुळे दिवसरात्र लॅपटॉप, मोबाइलच्या वापरामुळे डोळे, पाठ, मानेचे त्रास सुरू झाले आहेत. याशिवाय पोटाचे दुखणे घेऊनही रुग्ण येत आहेत. अगदी विशीतील तरुणांपासून पन्नाशीपर्यंतचे रुग्ण मोठ्या संख्येने उपचारासाठी येत असल्याचे वैद्यकीत क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले. लहान मुलांबरोबरच मोठ्यांनाही अनेक त्रासांना सामोरे जावे लागत आहे. विशेषतः सध्या पोट साफ न होणे ही समस्या बहुतांश जणांना जाणवत आहे. ही समस्या घेऊन अनेक रुग्ण उपचारासाठी येत असल्याचे खारघरमधील श्री रुग्णालयाचे डॉ. उद्धव तळनीकर (एमडी,चाइल्ड स्पेशालिस्ट) यांनी सांगितले.
ते म्हणाले, ’नवी मुंबईतील नागरिकांना सध्या शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. कोरोनाच्या भीतीमुळे मानसिक आरोग्य ढासळत आहे. चिडचिड, वाद वाढत आहेत, तर दुसरीकडे लॅपटॉप, मोबाइलच्या अतिरिक्त वापरामुळे डोळ्यांवर परिणाम होत आहेत. मणक्याचे आजार डोके वर काढत आहेत. प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने विविध जीवनसत्वे पुरवणार्या गोळ्यांचे सेवन करत आहेत. कोरोनाला दूर ठेवण्यासाठी नागरिक हे करत असले, तरी त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार या गोळ्या घ्याव्यात, याकडेही डॉ. तळनीकर यांनी लक्ष वेधले. या गोळ्यांचा अतिरेक होता कामा नये, त्याऐवजी नागरिकांनी पुरेशी झोप, योग्य आहार आणि योगाभ्यास करावा. तासभर मोबाइल बंद करून मौन पाळावे, याचा त्यांना निश्चितच फायदा होईल.’
हाच धागा पकडत सीवूड्स येथील डायबिकेअर क्लिनिकचे मधूमेहतज्ज्ञ डॉ. मनीष पडसलगे (एमडी) यांनी नागरिकांच्या मनातून कोरोनाची अनाठायी भीती काढण्यासाठी डॉक्टरांनीच पुढाकार घेण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, ’कोरोनाच्या भीतीने अलीकडे बहुसंख्य नागरिक डॉक्टरांकडे जाणेच टाळत आहेत. त्यांच्यावर मानसिक आघात झाल्याने झोप न येणे, घाम फुटणे, छातीत धडधडणे असे प्रकार वाढले आहेत. ताण वाढल्याने नागरिक अगतिक झाले आहेत. त्यांच्या मनातील भीती काढल्यानंतरच ते समस्यांविषयी मोकळेपणाने बोलत असून त्यांच्यावर उपचार करणे सोपे होत आहे.’
सर्दी, खोकला झाल्याचे सांगण्यासही रुग्ण कचरत आहेत. डॉक्टरांसमोरील खुर्चीवर बसण्यासही नागरिक धजावत नसून दुरूनच उपचार करण्याचा आग्रह करत आहेत. सध्या अपचन, पोटाच्या समस्या असणारे रोज पाच, तरी रुग्ण येत आहेत, असे खारघर येथील साई पॉलिक क्लिनिकचे डॉ. रमेश शाह (एमडी, फॅमिली फिजिशियन) यांनी सांगितले. याबाबत वाशी येथील श्री रुग्णालयाचे संचालक आणि शल्यचिकित्सक डॉ. गिरीश मोहरीर (मूळव्याध, हर्निया) म्हणाले, ’सध्या नागरिक घरातच असले, तरी त्यांचे वेळापत्रक काहीसे बिघडले आहे. टीव्हीसमोर बसून वेळी-अवेळी खाणे वाढले आहे. याशिवाय रोज काही, तरी नवे करून खाण्याच्या मोहामुळे अनैसर्गिक, तेलकट, तिखट खाण्याला पसंती दिली जात आहे. साहजिकच यामुळे पोटावर परिणाम होत असून अपचन, बद्धकोष्ठता आणि मूळव्याध आदी तक्रारी वाढल्या आहेत.’
मधुमेहग्रस्तांना चिंता
कोरोनाच्या भीतीमुळे अनेकांनी गावचा रस्ता धरला आहे, तर बहुतांश जणांनी घरातून बाहेर पडणेच बंद केले आहे. याचा मधुमेह असणार्यांना रुग्णांवर परिणाम झाला आहे. काही रुग्णांचे नियमित तपासणीचे वेळापत्रक कोलमडले असून औषध-गोळ्यांकडे दुर्लक्ष होत असून त्यांच्या आहारवरही परिणाम झाल्याने साखरेचे प्रमाण वाढल्याचे दिसत आहे, असे पडसलगे यांनी सांगितले.
आरोग्याशी खेळ नको
समाजमाध्यमांवर कोरोनासंदर्भात अनेक प्रकारची माहिती दिली जाते. यात प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काही गोळ्या, काढे आदींबाबत जाहिरीतीही केल्या जातात. याची सत्यता न तपासता काही जण डोळे झाकून यावर विश्वास टाकतात. त्यांची खरेदी करून त्यांचे सेवनही करतात. मात्र जीवनसत्वांसाठी गोळ्यांचे सेवन करताना ते वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच करावे, असे मत सर्व डॉक्टरांनी व्यक्त केले.