Breaking News

गणेशोत्सव काळात भाज्यांचे दर कमी?

पनवेल : बातमीदार

वाशी येथील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील भाजी बाजारात गेले पाच महिने सुरू असलेली टोकन पद्धती बंद करण्यात आल्याने बाजारात नियमित आवक वाढणार आहे. त्यामुळे  गणेशोत्सव काळात भाज्यांचे दर कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सोमवारी भाजी बाजारात एकाच दिवशी 432, तर मंगळवारी 356 ट्रक टेम्पो भरून शेतमाल आला आहे. साधारपणे 550 ते 600 वाहने भरून भाज्यांची आवक झाल्यास दर स्थिर राहात असल्याचे आढळून आले आहे.कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी मार्चपासून लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीत जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा भासणार नाही, असे आश्वासन सरकारच्या वतीने देण्यात आले होते. त्यामुळे नवी मुंबईतील एपीएमसी (तुर्भे) येथील पाच घाऊक बाजार पहिल्या दिवसापासून सुरू ठेवण्यात आले होते. एप्रिलमध्ये या पाच बाजारांत कोरोना साथ रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने काही दिवस बाजारपेठ र्निजतुकीकरणासाठी बंद ठेवण्यात आली होती. जीवनावश्यक वस्तूंचा सर्वात मोठा घाऊक बाजार असल्याने तो बंद ठेवता आला नाही. काही दिवसांनी एपीएमसीला सर्व प्रतिबंधात्मक खबरदारी घेऊन बाजार सुरू करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले. त्यामुळे सुरक्षित अंतराचा नियम पाळून बाजार सुरू करण्यात आले. त्यासाठी टोकन पद्धत राबविण्यात आली.

राज्यभरातून येणार्‍या शेतकर्‍यांनी टोकन घेऊन शेतमाल बाजारपेठेत सोडण्याची ही पद्धत काही दिवसांनी वादग्रस्त ठरली. त्यामुळे सोमवारपासून ती बंद करण्यात आली. त्याऐवजी शेतमाल बाजारात उतरविण्याची मुभा देण्यात आली आहे. घाऊक बाजारात आवक घटल्याने गेले पाच महिने भाज्यांचे दर चांगलेच वधारले होते. मात्र, सोमवारपासून टोकन पद्धत रद्द करून नेहमीप्रमाणे घाऊक बाजार सुरू  झाल्यानंतर पहिल्याच दिवशी भाजी बाजारात 432 वाहने आल्याची नोंद आहे. दुसर्‍या दिवशी ही आवक थोडी कमी झाली आहे, मात्र येत्या आठवडयाभरात ही आवक वाढून दर स्थिर होणार असल्याचे व्यापार्‍यांनी सांगितले.

कांदा दरात मात्र वाढ

मध्यंतरी कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली होती. मात्र, कमी प्रतीचा कांदा घाऊक बाजारात किलोमागे आठ ते नऊ रुपयांवर पोहचला आहे. तर उत्तम प्रतीच्या कांद्याला 15 ते 16 रुपये भाव मिळत आहे. कांद्याच्या  40 ते 50 गाडया दाखल होत आहेत.

घाऊक बाजारातील आवक सुरळीत सुरू झाली आहे. मात्र, गेले दोन दिवस असलेल्या पावसामुळे ही आवक नेहमीपेक्षा कमी आहे. काही दिवसात ही आवक वाढणार असून गेले पाच महिने वधारलेले भाज्यांचे दर कमी होण्याची शक्यता अधिक आहे.

-कैलाश तांजणे, अध्यक्ष घाऊक भाजीपाला महासंघ

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply