नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
मच्छर चावल्यानंतर मलेरियाने मृत्यू झाल्यास त्याला अपघात मानायचा का? जर तो अपघात समजला गेल्यास त्याला अपघात विम्याचा लाभ द्यायचा की नाही? असा पेचात टाकणारा खटला सर्वोच्च न्यायालयात आला होता, मात्र सर्वोच्च न्यायालयाने या प्रश्नाचे उत्तर नकारार्थी दिले आहे. ताप किंवा व्हायरल फ्लूमुळे मृत्यू झाल्यास त्याला अपघात म्हणता येणार नाही. मलेरिया अनपेक्षितपणे होतो. मच्छर चावल्याने मलेरिया होणे नैसर्गिक आहे, त्याला अपघात म्हणता येणार नाही, असा निर्वाळा न्यायालयाने दिला आहे. राष्ट्रीय ग्राहक फोरमने मलेरियामुळे झालेल्या मृत्यूला अपघाताच्या श्रेणीत आणले होते. त्यानंतर विमा कंपनीला मलेरियामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना भरपाई देण्याचे आदेश दिले होते. विमा कंपन्यांनी या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले असता न्यायालयाने ग्राहक फोरमचा हा आदेश पलटला. देशात प्रत्येक तिसर्या व्यक्तीला मलेरिया होतो, म्हणून त्याला अपघात म्हणता येणार नाही, असे कोर्टाने म्हटले आहे. न्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या खंडपीठाने हा निर्वाळा दिला आहे.
देवाशीष भट्टाचार्य नावाच्या एका व्यक्तीने सरकारी बँकेतून 16 जून 2011 रोजी गृहकर्ज घेतले होते. दर महिन्याला तो 19,105 रुपये हप्ता भरत होता. एकूण 113 हप्ते त्याला भरायचे होते. त्यासाठी त्याने सुरक्षा विमाही उतरवला होता. भूकंप, आग आणि वैयक्तिक अपघातात झालेल्या मृत्यूबाबतचा हा विमा होता. तो आसाममध्ये नोकरीला होता. त्यानंतर मोझांबिकाला त्याची बदली झाली. तिथेच 22 जानेवारी 2012 रोजी मच्छर चावून मलेरिया झाल्याने त्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी ग्राहक फोरमकडे धाव घेऊन विमा मिळविण्याचा प्रयत्न केला होता.