नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
पाकिस्तानमधील सिंध प्रांतात सोमवारी रात्री अजून एका हिंदू मुलीचे अपहरण करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वीच 15 वर्षीय रिना आणि 13 वर्षीय रवीना यांचे अपहरण करत जबरदस्ती त्यांचे धर्मांतरण करण्यात आले आणि मुस्लीम व्यक्तीशी लग्न लावून देण्यात आले. होळीच्या दिवशीच हा प्रकार घडला होता. सिंध प्रांतात हिंदू मुलींचे अपहरण करून त्यांचे धर्मांतर होण्याची ही सातवी घटना आहे. यादरम्यान दोन हिंदूंची हत्याही करण्यात आली.
यादरम्यान पाकिस्तानी न्यायालयाने अपहरण झालेल्या दोन मुलींच्या सुरक्षेचा आदेश दिला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंध प्रांतातील अल्पसंख्याक मंत्री हरीराम किशोरीलाल यांनी पोलिसांना अपहरणप्रकरणी गुन्हा दाखल करण्यास सांगितले आहे. यासोबतच अपहरण झालेल्या मुलीला पुन्हा घरी आणण्यासाठी प्रयत्न करण्याचा आदेशही देण्यात आला आहे. वारंवार होणार्या अपहरण आणि धर्मांतरामुळे पाकिस्तानातील हिंदूंमध्ये प्रचंड नाराजी व संताप आहे. काही हिंदू नेते आपल्या धर्मातील लोकांची मदत करण्याऐवजी सरकारच्या हितासाठी काम करीत आहेत, असा आरोप येथील लोकांनी केला आहे. हे नेते सरकारच्या हातातील बाहुले झाले आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, मंगळवारी केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी अपहरण करण्यात आलेल्या दोन अल्पवयीन हिंदू मुलींना कुटुंबाकडे सोपवण्याची ताकीद दिली आहे.