Breaking News

जनता कर्फ्यू शंभर टक्के यशस्वी; देशभरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पनवेल : रामप्रहर वृत्त

कोरोनाच्या संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि. 22) जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन देशवासीयांना केले होते. पंतप्रधानांच्या या आवाहनाला देशभरातील सुमारे 13 कोटी नागरिकांनी घरीच राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्याचप्रमाणे सायंकाळी 5 वाजता थाळी, घंटा, शंख व अन्य वाद्य वाजवून अत्यावश्यक सेवा देणार्‍यांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

महाराष्ट्रात आजपासून लॉकडाऊन

मुंबई : प्रतिनिधी

कोरोना विषाणूचा वाढता फैलाव रोखण्यासाठी राज्यातील नागरी भागात कलम 144 लागू करण्यात आले आहे. त्यानुसार 31 मार्चपर्यंत महाराष्ट्र लॉकडाऊन राहणार आहे.

राज्यातील सर्व नागरी भागात मध्यरात्रीपासून 144 कलम लागू करण्यात आले आहे. या काळात पाचपेक्षा जास्त लोकांनी एकत्र येण्यास मनाई आहे. रेल्वे तसेच खासगी व एसटी बसेस बंद राहणार आहेत. फक्त जीवनावश्यक आणि अत्यावश्यक कारणांसाठीच शहरांतर्गत बससेवा सुरू राहील. अन्नधान्य, भाजीपाला, औषधांची दुकाने सुरूच राहणार असून बँका, वित्तीय संस्थाही चालू राहतील.

शासकीय कार्यालयात आता केवळ पाच टक्के कर्मचारीच असणार आहेत. ज्यांचे घरीच विलगीकरण केलेले आहे व ज्यांच्या हातावर शिक्के आहेत अशांना 15 दिवस घराबाहेर पडण्यास मज्जाव करण्यात

आला आहे.

सर्व विमाने रद्द करण्यात आलीत, तर सर्व प्रार्थनास्थळांवर पूजाअर्चेस मुभा असेल, पण भाविकांसाठी ती बंद असतील. 31 मार्च हा पहिला टप्पा आहे. गरज लागली तर पुढेही निर्णय कायम राहील, असे राज्य शासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

मुंबई लोकलसह देशभरातील रेल्वेसेवा बंद

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने आतापर्यंतचा सर्वांत मोठा निर्णय घेतला आहे. 31 मार्चपर्यंत रेल्वेने होणारी देशातील प्रवासी वाहतूक बंद करण्याचा निर्णय रेल्वे खात्याने घेतला आहे. मुंबईतील लोकलसेवाही बंद करण्यात आली आहे. त्यामुळे आता मुंबईत 31 मार्चपर्यंत एकही लोकल धावणार नाही.

देशभरात कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. त्यातच महानगरांमधून गावी जाणार्‍या लोकांनी रेल्वेमध्ये मोठी गर्दी केली आहे. शिवाय आता रेल्वे प्रवाशांमध्येही कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

रेल्वे मंत्रालयाने काढलेल्या पत्रकानुसार आतापर्यंत कोरोना रोखण्यासाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून रविवारी मध्यरात्रीपासून 31 मार्चपर्यंत देशातील सर्व प्रवासी रेल्वेसेवा बंद करण्यात येत आहे. सर्व प्रकारच्या मेल-एक्स्प्रेस, इंटरसिटी ट्रेन्स (प्रीमियम ट्रेन्ससह) आणि सर्व पॅसेंजर ट्रेन्सही रद्द करण्यात आल्या आहेत. देशातील अन्नधान्य व इतर वस्तूंचा पुरवठा सुरळीत राहावा यासाठी मालवाहतूक मात्र सुरूच राहणार आहे.

‘महाराष्ट्राच्या सीमा सील करणार’

महाराष्ट्रात परदेशातून आलेल्या लोकांच्या माध्यमातूनच कोरोना आला, मात्र आता याला आळा बसणार आहे. कारण परदेशातून येणारी विमाने मध्यरात्रीपासून बंद करण्यात आली. त्याचबरोबर शेजारील राज्यांमधून लोक येऊन नये म्हणून राज्याच्या सीमा बंद करण्याचा विचार सुरू आहे. यासंदर्भातील प्राथमिक कारवाई करण्यात आली आहे. गरज लक्षात घेऊन लवकरच हा निर्णय घेऊ, असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे.

रायगड जिल्ह्यात 609 जणांचे अलगीकरण

अलिबाग : प्रतिनिधी

रायगड जिल्ह्यात परदेशातून परतलेल्या नागरिकांची संख्या 740वर पोहोचली असून त्यापैकी 130 जणांचा 14 दिवसांचा निगराणी कालावधी पूर्ण झाला आहे. 521 जणांचे घरातच अलगीकरण केले आहे, तर 88 लोक शासकीय अलगीकरण केंद्रात दाखल आहेत. मुंबईतील कस्तुरबा गांधी रुग्णालयातील विलगीकरण केंद्रात एक नागरिक दाखल आहे.  त्याची प्रकृती उत्तम असल्याचे जिल्हा प्रशाससाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे.

  मुरूड येथील एका नागरिकाला शनिवारी नव्याने मुंबई येथील कस्तुरबा रुग्णालयात तपासणीसाठी दाखल करण्यात आले असून त्याची तब्येतदेखील उत्तम आहे. आतापर्यंत मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात परदेशातून आलेल्या रायगडातील 23 नागरिकांना तपासणीसाठी पाठविण्यात आले होते.

यापैकी सात जणांची तपासणी केल्यानंतर स्वॅब टेस्टिंग न करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच कस्तुरबा रुग्णालयात 16 नागरिकांची स्वॅब टेस्टिंग करण्यात आली होती. त्यापैकी एका नागरिकाचा तपासणी अहवाल प्रलंबित आहे. तपासणीअंती 15 नागरिकांचा तपासणी अहवाल निगेटिव्ह आला. फक्त एकाच व्यक्तीचा अहवाल पॉझेटिव्ह आला असून तो कस्तुरबा रुग्णालयात विलगीकरण केंद्रात उपचार घेत आहे. त्याच्या प्रकृतीतदेखील सुधारणा होत असल्याचे सांगण्यात आले.

कोरोना विषाणूच्या लढाईचे नेतृत्व करणार्‍या प्रत्येक व्यक्तीला देशाने एका मनाने धन्यवाद दिलेत. यासाठी देशवासीयांचे खूप खूप आभार! हा धन्यवादचा नाद आहे. त्याचबरोबर एका मोठ्या लढाईला सुरुवात करण्याचा हा शंखनादही आहे. याच संकल्पासोबत याच वेळेपासून एका मोठ्या लढाईसाठी आपण स्वतःला बंधनात (सोशल डिस्टन्स) बांधून घेऊयात! -नरेंद्र मोदी, पंतप्रधान

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply