नागरिकांचे आरोग्य धोक्यात
पाली : प्रतिनिधी
सुधागड तालुक्याचे मुख्यालय व अष्टविनायकाचे स्थान असलेल्या पाली येथील बसस्थानक परिसर गटारातील सांडपाणी व घाणीचे आगार झाले आहे. येथील दुर्गंधीने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. स्वच्छता व प्रवाशांना सोयीसुविधा देण्याच्या गंभीर बाबीकडे राज्य परिवहन महामंडळाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.
पाली बसस्थानकाचे प्रवेशद्वार असलेल्या मार्गावर दोन मोठे नाले आहेत. त्यामध्ये सांडपाणी तुंबत असून अनेक जीवजंतूंची पैदास होत आहे. हे नाले उघडे असल्याने त्यातून सतत दुर्गंधी येत असते. या नाल्यात अनेकदा वाहने फसून अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या नाल्याच्या बाजूने बसस्थानकात एसटी गाड्या शिरतात व बाहेर पडतात. त्यामुळे मोठ्या अपघाताचीदेखील शक्यता आहे.
दोन भल्या मोठ्या व उघड्या नाल्यातून पाली बसस्थानकात मोठ्या प्रमाणावर सांडपाणी व दुर्गंधी पसरत आहे. येथील अस्वछता व दुर्गंधी यामुळे बसस्थानक व बाजारपेठेत येणार्या जाणार्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शाळकरी मुले, वृद्ध प्रवासी, रुग्ण यांना स्थानकातील सांडपाण्यातून ये-जा करावी लागते, त्यामुळे आरोग्य व रोगराईची भीती निर्माण झाली आहे. बसस्थानक असल्याने या ठिकाणी सतत नागरिकांची वर्दळ व रहदारी सुरू असते, शिवाय सभोवताली दुकाने, हॉटेल, रसवंतीगृह, तसेच मच्छी व मटण मार्केट असल्याने नागरिकांची गर्दी असते. येथील सांडपाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
कोरोनाचे संकट टळलेले नाही, सर्वत्र स्वच्छता व जनजागृतीवर भर दिला जात आहे. मात्र पाली बसस्थानकात अक्षम्य अस्वच्छता दिसून येत आहे. सांडपाण्यातूनच प्रवाशांना या-जा करावी लागत आहे, त्यामुळे रोगराईची भीती वाढली आहे. याबाबत परिवहन महामंडळाने त्वरित योग्य ती कार्यवाही करावी, असे नियमित प्रवासी मंगेश कदम यांनी सांगितले.