पनवेल : रामप्रहर वृत्त
जोपर्यंत पुनाडे, वशेणी व सारडे येथील शेतकरी आणि ग्रामस्थांच्या हिताचे सकारात्मक निर्णय होत नाही तोपर्यंत शासनाने कोणत्याही प्रकारची कार्यवाही करू नये, अशी ठाम भूमिका आमदार महेश बालदी यांनी प्रांताधिकारी यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत मांडली.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने औद्योगिकीकरणासाठी उरणमधील पुनाडे, वशेणी व सारडे या तीन गावातील जमीन संपादनाची अधिसूचना जाहीर केली आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांनी आमदार महेश बालदी यांची भेट घेऊन या संदर्भात लक्ष घालण्याची विनंती केली. आमदार महेश बालदी यांच्या मागणीनुसार प्रांताधिकारी राहुल मुंडके आणि अधिकार्यांसोबत बैठक झाली. या बैठकीस एमआयडीसीचे विभागीय अधिकारी डॉ. संतोष थिटे, उरणचे तहसीलदार श्री. कदम यांच्यासह सारडे, वशेणी व पुनाडे ग्रामस्थ उपस्थित होते.
या वेळी झालेल्या बैठकीत आमदार महेश बालदी यांनी ग्रामस्थांच्या भावना मांडल्या. संपादनाच्या अनुषंगाने जमीन किती संपादित करणार, शेतकर्यांना मोबदला किती असणार, पुनर्वसन पॅकेज काय असणार, नोकरी व्यवस्था कशी असणार, सार्वजनिक सुविधा कशा देणार आणि या अनुषंगाने संपूर्ण धोरण काय असणार याची पूर्ण माहिती मिळाल्याशिवाय आणि शेतकर्यांचे, ग्रामस्थांचे समाधान होत नाही तोपर्यंत संपादनाची कोणतीच कार्यवाही करू देणार नाही, असे आमदार महेश बालदी यांनी स्पष्ट केले. यावर प्रांताधिकारी राहुल मुंडके यांनी शासन स्तरावर ही भूमिका पोहचविण्याचे आश्वासन दिले.
Check Also
शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …