बनावट कुलमुख्यत्यारपत्राचा वापर करून परस्पर विकल्या जमिनी
पनवेल : वार्ताहर – आशापुरा रियल्टर्स या बांधकाम व्यवसायीक कंपनीतील राकेश संघवी या भागीदाराने कंपनीच्यावतीने विकत घेतलेल्या जमीनीच्या सातबारावर त्याच्या नावाची नोंद असल्याचा फायदा घेऊन तसेच इतर भागीदारांच्या बनावट कुल मुखत्यारपत्रांचा वापर करुन त्याद्वारे कंपनीच्या नावावर पनवेलच्या विचुंबे गावात असलेली कोट्यावधी रुपये किंमतीची जमीन परस्पर नॅशनल बिल्डर्सच्या संचालकांना विकून कंपनीतील इतर भागीदारांची तब्बल 17 कोटी रुपयांची फसवणुक केल्याचा प्रकार उघडकिस आला आहे.
या प्रकरणी खांदेश्वर पोलिसांनी राकेश संघवी व नॅशनल बिल्डर्सच्या तिघा संचालकांवर फसवणुकीसह बनावटगीरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन तपासाला सुरुवात केली आहे.
घाटकोपर येथे राहणार्या विपुल पटेल व दिपक पटेल या बांधकाम व्यावसायीकांनी भविष्यातील डेव्हलपमेंटचा विचार 2007 मध्ये पनवेल भागात शेतजमीनी विकत घेण्यासाठी प्रयत्न सुरु केले होते. त्यासाठी त्यांनी नवीन पनवेल येथील ब्रोकर राकेश संघवी याची भेट घेतली होती. त्यावेळी संघवी याने पनवेलमधील आदई, भिंगारी व विचुंबे या भागातील शेतकरी जमीन विक्री करत नसल्याने त्यांना जमीन विक्रीसाठी तयार करण्यास वेळ लागेल, त्यासाठी सर्वजण मिळुन एक नवीन कंपनी स्थापन करण्याची व कंपनीच्या नावाने सर्व जमीनी खरेदी करण्याचा प्रस्ताव समोर ठेवला. विपुल पटेल, दिपक पटेल व त्यांच्या कुटुंबियांना हा प्रस्ताव पसंत पडल्यानंतर मोहनलाल पटेल, धिरेन पटेल, दिपक पटेल, विपुल पटेल, रितेश पटेल-संघानी व ब्रोकर राकेश संघवी या सर्वांनी भागीदारीत आशापुरा रियल्टर्स नावाने नवीन कंपनी स्थापन केली.
त्यानंतर सर्व भागीदारांनी जमीन खरेदीसाठी कंपनीच्या खात्यावर कॅपीटल रक्कम व लोन रक्कम जमा केल्यानंतर सर्व भागीदारांनी पनवेलमधील शेतकर्यांकडून त्यांच्या जमीनींचे व्यवहार करण्यास सुरुवात केली. त्यावेळी जमीन खरेदीसाठी राकेश संघवी हा पुढाकार घेऊन सर्व कामे करत असल्याने इतर भागीदारांचा त्याच्यावर विश्वास बसला होता. या दरम्यान, संघवी याने शेतकर्यांसोबत साठेकरार करीत असलेल्या जमीनीमध्ये काही जमीनी भोगवाटा वर्ग दोनच्या तसेच कुळ कायद्याच्या असल्याने त्या जमीनीच्या खरेदीसाठी रायगड जिल्हाधिकारी यांच्या परवानगीसाठी तसेच साठेकरार, रजिस्ट्रेशन, खरेदीखत करण्यासाठी सर्व भागीदारांना वेळोवेळी रजिस्टर ऑफीस, अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जावे लागेल असे सांगितले होते.
तसेच सर्व भागीदारांनी जमीन खरेदीसाठी, सरकारी कार्यालयातील सर्व कामे करण्यासाठी कंपनीतर्फे आपल्याला लेखी अधिकारपत्र (मुखत्यारपत्र) दिल्यास कंपनीच्या वतीने आपण सर्व ठिकाणी हजर राहुन सर्व परवानग्या मिळवून असे आश्वासन देखील संघवी यांनी इतर भागीदारांना दिले होते. तसेच खरेदी केलेल्या जमीनीचा सातबारा देखील आशापुरा रियल्टर्स कंपनीतर्फे भागीदार म्हणून आपले नाव असणार असल्याचे सांगितल्याने इतर भागीदारांनी त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून त्याला 2010 साली जमीन खरेदी विक्रीची परवानगी मिळविण्यासाठी लेखी अधिकारपत्र दिले होते. त्यानंतरच्या काळात आशापुरा रियल्टर्स कंपनीने 13 शेतकरी व त्यांच्या कुटुंबीयांकडून त्यांच्या जमीनी संघवी याच्या नावाने घेऊन त्या रजिस्टर केल्या होत्या. काही जमीनी रजिस्टर खरेदी खताने कंपनीतर्फे भागीदार राकेश संघवी याच्या नावाने खरेदी केल्या होत्या. तर काही जमीनी बयाणा (टोकन) देऊन साठेकरार करुन ठेवल्या होत्या.
जमीनीचे सर्व व्यवहार राकेश संघवी हा पहात असल्याने जमीनीची सर्व कागदपत्रे त्याच्याच कार्यालयात ठेवण्यात आली होती. विकत घेतलेल्या जमीनी कंपनीच्या नावाने असल्याने व राकेश संघवी हा सर्व भागीदारांसोबत सतत संपर्कात असल्याने इतर भागीदारांनी खरेदी केलेल्या जमीनीचा सातबारा काढलाच नाही. मात्र फेब्रुवारी 2020 मध्ये संघवी याने आशापुरा रिएलेटर्स कंपनीने विचुंबे येथे खरेदी केलेल्या जमीनीपैकी काही जमीनी परस्पर विक्री केल्याची माहिती इतर भागीदारांना मिळाली. त्यामुळे त्यांनी विचुंबे येथे कंपनीने साठेकरार तसेच खरेदी केलेल्या सर्व जमीनीचे ऑनलाइन सातबारे काढल्यानंतर राकेश संघवी याने सन 2016 व 17 मध्येच नॅशनल बिल्डरचे मालक एम.सन्नी, सिजो सन्नी यांना तसेच रसिका किर्ती कोठारी यांना सदर जमीनी परस्पर विक्री केल्याचे व त्यांच्या नावे सातबारा नोंद झाल्याचे आढळुन आले.
त्यानंतर इतर भागीदारांनी रजिस्टर कार्यालयातुन या व्यवहाराची अधिक माहिती मिळविली असता, संघवी याने त्याला इतर भागीदारांनी 2010साली दिलेल्या मुखत्यारपत्रामध्ये बदल करुन बनावट मुखत्यारपत्र कंपनीतर्फे भागीदार म्हणुन सादर करुन तसेच सातबारावर राकेश संघवी याची नोंद असल्याचा फायदा घेवुन त्याने विचुंबे येथील चार हेक्टर 36.3 गुंठे जमीन परस्पर नॅशनल बिल्डर्सच्या संचालकांना विकल्याची माहिती मिळाली.