श्रीवर्धन : प्रतिनिधी
यावर्षी पावसाची सुरुवात 3 जून रोजीच झाली. तीन जून रोजी कोकण किनारपट्टीवर निसर्ग चक्रीवादळ धडकले व या चक्रीवादळाच्या सोबतच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर जून महिन्याच्या आठ तारखेपासून नियमित पणे मोसमी पाऊस पडू लागला. शेतकर्यांनी रोहिणी नक्षत्र निघाल्यावर पेरलेले भात चक्रीवादळाच्या वेळी पडलेल्या पावसामुळे शेतात उगवले होते व मोसमी पाऊस सुरू झाल्यानंतर ते आणखीनच चांगल्या प्रमाणात उगवले.
जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच भात लावण्यांना सुरुवात झाली. जुलै महिन्याच्या अखेरीस भात लावण्याची कामे पूर्ण झाली. आता सप्टेंबर महिना सुरु झाला आहे व पावसाचे प्रमाण देखील थोडे कमी झाले आहे. त्यामुळे शेतात भात चांगल्याप्रकारे हिरवेगार वाढलेले दिसत आहे. येत्या काही दिवसातच या भाताला लोंब्या फुटतील व भात रोपावरील दाणे भरण्यास सुरुवात होईल. ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीला भात कापणी योग्य होईल, मात्र यावेळी पावसाने दगा दिला नाही तर यावर्षी भाताचे उत्पन्न चांगले येण्याचा अंदाज शेतकरी बांधवांमधून वर्तविला जात आहे.
श्रीवर्धन समुद्र किनारी सुद्धा मोठ्या प्रमाणावर भात शेती आहे. प्रत्यक्ष श्रीवर्धन गाव व समुद्र किनारा यांच्या मधल्या भागामधे भातशेती दरवर्षी करण्यात येते. भातशेती कापून झाल्यानंतर या ठिकाणी वाल, चवळी, मूग यांसारखी कडधान्ये ही पिके घेतली जातात.