खारघर : प्रतिनिधी
तळोजा एमआयडीसीमध्ये मागील साडेचार महिन्यापासून बंद असलेल्या 804 उद्योग धंदे सुरु करण्यास शासनाने परवानगी दिल्याने गुरुवारपासून संपूर्ण तळोजा एमआयडीसी लॉकडाऊन नंतर प्रथमच सुरु होणार आहे. लाखो कामगार वर्गाचा रोजगाराचा प्रश्न सुटणार आहे. तळोजा एमआयडीसीच्या मध्ये एकूण 973 कारखाने आहेत. यापैकी 169 उद्योग धंदे अत्यावश्यक सेवा पुरवीत असल्याने त्यांना परवानगी देण्यात आली होती. उर्वरित 804 कारखाने बंद असल्याने कारखानदारासह कामगार वर्ग आर्थिक संकटात होते. लघु, मध्यम आणि मोठ्या उद्योगांच्या कमाईत मोठ्या प्रमाणात घट झाल्याने बर्याच उद्योगांना भाडे, वेतन, वीज यासारख्या निश्चित खर्चापोटीदेखील असंख्य समस्यांना तोंड
द्यावे लागत होते. तळोजा इंडस्ट्रीज असोसिएशन (टीआयए)च्या माध्यमातून इतर व्यवसाय सुरु करण्यासंदर्भात शासकीय पातळीवर सर्वच ठिकाणी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडे पाठपुरावा सुरु होता. या पाठपुराव्याला यश आले असून तळोजा एमआयडीसी मधील सर्वच कारखाने सुरु करण्यास परवाणगी मिळाली असल्याचे टीआयएचे अध्यक्ष सतीश शेट्टी यांनी सांगितले.