Breaking News

अंगार आणि भंगार

एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीसमोर दोस्तीचा हात पुढे केला आणि नव्याच वादाला तोंड फुटले. महाविकास आघाडीत सामील होण्याच्या एमआयएमच्या ऑफरमुळे शिवसेनेच्या प्रतिमेला तडा जायचा तो गेलाच. पूर्वीच्या काळी एमआयएमची अशी हिंमत तरी झाली असती का, या एकाच प्रश्नाचे उत्तर शिवसेनेच्या नेत्यांनी स्वत:लाच प्रामाणिकपणे द्यावे. अंगार कोण आणि भंगार कोण या प्रश्नाचे उत्तरही तेव्हाच मिळून जाईल.

शिमग्याचा मुहुर्त साधून राजकारणात आता नवे कवित्व सुरू झालेले दिसते. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष कुठल्या न कुठल्या कारणाने भारतीय जनता पक्षावर तोंडसुख घेण्याची एकही संधी सोडत नाहीत आणि आघाडी सरकारातील तोंडाळ नेत्यांना सळो की पळो करण्याचे धोरण भाजपने देखील हातातून सोडलेले नाही. खरे तर या दररोजच्या दळणाचा सामान्य नागरिकांना एव्हाना कंटाळाच आला असेल. गेल्या 28 महिन्यांमध्ये जनसामान्यांच्या हिताचे एकही काम झालेले दिसत नाही. महाराष्ट्राच्या हिताचा एकही निर्णय महाविकास आघाडीचे सरकार आजवर घेऊ शकलेले नाही. बळकावलेल्या खुर्च्यांचा बचाव करणे आणि भाजपवर तोंडसुख घेणे एवढाच दोन कलमी कार्यक्रम सध्या सुरू असल्याने सामान्यजनांना त्याचा कंटाळा येणे साहजिकच आहे. भारतीय जनता पक्षाला रोखायचे असेल तर समविचारी पक्षांनी एकत्र येऊन मोर्चेबांधणी करायला हवी. त्याखातर आम्ही महाविकास आघाडीत येऊ शकतो अशाप्रकारचा अनौपचारिक प्रस्ताव एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष, औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासमोर ठेवला. त्यांनी तो आपल्या पक्षश्रेष्ठींकडे पोहोचवला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातून जलील यांच्या प्रस्तावाला काहिसा सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्यासारखे वाटल्याने प्रकरण पेटले आणि महाविकास आघाडीतील वैचारिक दुफळी उघडकीस आली. काँग्रेसने निराळाच पवित्रा घेतला. एमआयएम हा धर्मांध पक्ष असल्याकारणाने त्यांच्याशी हातमिळवणी होऊ शकत नाही असा खुलासा काँग्रेसतर्फे करण्यात आला तर सर्वात जास्त मिरच्या झोंबल्या त्या शिवसेनेला. औरंगजेबाच्या कबरीसमोर नतमस्तक होणार्‍यांशी हातमिळवणी होणे मंजूर नसल्याची ग्वाही शिवसेनेचे प्रवक्ता संजय राऊत यांनी दिली खरी, परंतु या सगळ्या प्रकरणात शिवसेेनेची दुटप्पी भूमिका पुन्हा एकदा उजेडात आली. तसे बघायला गेले तर सध्याची शिवसेना ही शिवसेनाच उरलेली नाही असे म्हणावे लागेल. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना हिंदुत्वाचा कडवा पुरस्कार करणारी दमदार संघटना होती. सध्याची शिवसेना मात्र राष्ट्रवादी आणि काँग्रेससारख्या पारंपरिक विरोधकांच्या मांडीला मांडी लावून सत्तेत बसलेली आहे. जिच्या नावाने एकेकाळी हिंदु संघटनांचा आवाज दुमदुमत असे ती शिवसेना अजानच्या स्पर्धा घेऊ लागली आहे. शिवसेनेने आता शिवसेनाप्रमुखांच्या नावापुढे जनाबही स्वीकारले आहे. मात्र तशी टीका होताच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आम्हाला जनाब म्हणणारी भाजप स्वत:च हिजबुल सेना आहे असा टोला लगावला. परंतु हा टोला कुचकामी आहे. भारतीय जनता पक्षाचे हिंदुत्व राजकारणापुरते मर्यादित असून शिवसेना हा हिंदुत्वाचा अंगार आहे असे उद्धव ठाकरे म्हणतात. मात्र त्यात तथ्य उरलेले नाही हे सारेच जाणतात. भाजपचे हिंदुत्व राजकारणापुरते आहे की अस्सल आहे याचे उत्तर भारतीय मतदारांनी यापूर्वीच दिले आहे. हिंदुत्वासाठी भाजपने आजवर किती किंमत मोजली आहे हे वेगळे सांगावयाची गरज नाही.

Check Also

पनवेल भाजी मार्केटमध्ये इनरव्हील क्लबतर्फे कापडी पिशव्यांचे व्हेंडिंग मशीन

पनवेल ः रामप्रहर वृत्तपर्यावरण संरक्षण आणि प्लास्टिकमुक्तीचा संदेश देण्यासाठी इनरव्हील क्लब ऑफ पनवेलतर्फे शहरातील कृष्णाळे …

Leave a Reply