Breaking News

मनुष्य गौरव प्रदाता – पांडुरंगशास्त्री आठवले

19 ऑक्टोबर, म्हणजे आपल्या देशातील कृतिशील तत्त्वचिंतक व वैश्विक स्वाध्याय परिवाराचे प्रवर्तक पद्मविभूषण पांडुरंगशास्त्री आठवले (पूजनीय दादा) यांचा जन्मदिवस. 19 ऑक्टोबर हा या महापुरुषाचा जन्मदिवस वैश्विक स्वाध्याय परिवार ’मनुष्य गौरव दिन’ या सार्थ नावाने साजरा होतो. 1990 सालापासून म्हणजे गेली 30 वर्षे स्वाध्याय परिवार हा उत्सव साजरा होतो. 1920 साली रायगड जिल्ह्यातील रोहा येथे जन्मलेल्या दादांचे 2019-20 हे जन्मशताब्दी वर्ष आणि 19 ऑक्टोबर हा दादांचा 100 वा जन्मदिवस.

आपल्या देशात असंख्य प्रतिभावान व प्रज्ञावान व्यक्तिमत्त्वे आहेत. पांडुरंगशास्त्री हे अशाच रचनात्मक कार्य करणार्‍या दुर्मीळ महापुरुषांपैकी एक अग्रगण्य नाव. दादा नेहमी म्हणत की भक्ती म्हणजे केवळ कर्मकांड नव्हे, तर भक्ती म्हणजे मी त्या भगवंतापासून विभक्त नाही ही पक्की समजूत. त्याच्या हृदयस्थ असल्यामुळे माझे अस्तित्व आहे ही भावपूर्ण समजूत भक्तीत नसेल तर केवळ फुले, हार, सजावट, प्रसाद हे सर्व उपचारात्मक कर्मकांड अपूर्ण आहे. त्यांनी सांगितले तुझा आणि भगवंताचा संबंध आहे. दादा नेहमी म्हणत की भारतीय तत्त्वज्ञानाने जगाला काय द्यावे? तर तत्त्वमसि हे वेदवाक्य. तत्त्वमसि म्हणजे तत् त्वम् असि, म्हणजे ते ब्रह्म तूच आहेस. तुझा आणि त्याचा संबंध सांगणारे तीन अर्थ यात आहेत. प्रथम तेन त्वम् असि, तू त्याच्यामुळे आहेस. तुझं बोलणं, चालणं, राहणं सर्व त्याच्यामुळे आहे. दुसरा तस्य त्वम् असि, म्हणजे त्याचा तू आहेस, तुझं आणि त्यांचं काहीतरी नातं आहे. आणि तिसरा अर्थ म्हणजे तत् त्वम् असि, तोच तू आहेस, तू त्याच्यापर्यंत पोहोचू शकतोस. मानवी आध्यात्मिक विकासाच्या या पायर्‍या आहेत. दादा नेहमी सांगत की तत्त्वमसि आणि अहं ब्रह्मास्मिसारखी महावाक्ये ही सिद्धांच्या अनुभूतीचा विषय नाहीत तर सामान्य साधकाला काठीसारखा उपयोग होतो अशा वाक्यांचा. सारांश दादांनी हे प्रतिपादित केले की चराचर सृष्टी चालवणारी शक्ती तुझ्याबरोबर आहे, तुझा आणि त्याचा संबंध आहे. 

अर्थात दादा केवळ भगवंताचा संबंध व त्यातून येणारी कृतज्ञता, अस्मिता, तेजस्विता सांगून थांबले नाहीत तर त्या भक्तीच्या पायावर उभा असणारा परस्पर संबंध सांगितला. दादांनी हे केवळ पुस्तकातून किंवा प्रवचनांतून प्रतिपादित केले नाही तर आपल्या स्वाध्याय केंद्र, तत्त्वज्ञान विद्यापीठ, योगेश्वर कृषी, वृक्षमंदिर, श्रीदर्शनम, मत्स्यगंधा यासारख्या अनेकविध प्रयोगांतून ते सिद्ध करून दाखवले. दादा नेहमी म्हणत असत की जर भगवदशक्ती माझ्यात बसली आहे हे बुद्धीत उतरले तर व्यसन का नाही सुटणार? दुराचारापासून माणूस का नाही परावृत्त होणार? आज एक दोन नाही तर हजारो स्वाध्यायी गावातून व्यसने हद्दपार झाली, तंटे मिटले, भेदाभेद मिटले; ते केवळ हृदयस्थ भगवंताच्या जाणीवेतूनच. अर्थात दादांनी कधीही या परिवर्तनाची जाहिरात केली नाही कारण जाहिरात, प्रसिद्धी, बडेजाव हा मुळात हेतूच नव्हता. दादांनी वास्तविक अर्थाने भक्तीच्या संकल्पनेचं सामाजिकीकरण केलं. ईश्वराच्या माझ्यातील अस्तित्वामुळेच मी करू शकतो, बदलू शकतो, बदलवू शकतो ही लरप वे वृत्ती लाखो लोकांमध्ये उभी झाली. वैश्विक स्वाध्याय परिवाराच्या रूपाने एक वैकल्पिक समाजच (Alternative society) निर्माण करून दाखवला.

मनुष्य गौरवाचा विचार हे ही दादांचे एक अत्यधिक महत्त्वाचे योगदान. दादांचे जीवनच मनुष्य गौरव उभा करण्यासाठी आहे. एक स्वाध्यायी कवी म्हणतो, ’दादांच्या जीवनाचे वर्णन काय करावे? मनुष्य गौरव केवळ हो, दुसरे काही नाही. परम पूजनीय दादा नेहमी म्हणत की आज समाजात बाह्य आभूषणांशिवाय गौरवच मिळत नाही. ज्याच्याकडे वित्त आहे, सत्ता आहे, विद्या आहे, कीर्ती आहे त्यालाच किंमत मिळते. पण ही सर्व आभूषणे नसतील तर माणसाला किंमतच नाही का? समाजातील 90 टक्के पेक्षा जास्त लोकांकडे विद्या, वित्त, सत्ता, कीर्ती, यातील काहीच नाही व ते नसल्यामुळे जर त्यांना किंमतच मिळणार नसेल, गौरव प्राप्त होणार नसेल तर आपण खरोखरच सुधारलो आहोत का हा विचार करावा लागेल. दादांनी ठामपणे सांगितले की, तुझ्याकडे या प्रस्थापित शक्तींपैकी काहीही नसेल कदाचित, पण तुझ्याजवळ तुझा भगवंत आहे, चराचर सृष्टी चालवणारा भगवंत माणसात येऊन राहिला आहे हाच माणसाचा सर्वात मोठा गौरव आहे. मनुष्याचा हा गौरव उभा करण्यासाठी पूजनीय दादांनी अवघे आयुष्य वेचले. सर्वसामान्य माणसाला अस्मिता दिली, आत्मगौरव दिला, माणसाचा कणा मजबूत केला. 

पूजनीय दादांना त्यांच्या अद्वितीय अशा रचनात्मक कार्यासाठी रॅमन मॅगसेसे, टेम्पल्टन अशा मनाच्या आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी तर पद्मविभूषण, लोकमान्य टिळक पुरस्कार, महात्मा गांधी पुरस्कार, राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार, राष्ट्रभूषण पुरस्कार अशा अनेकानेक पुरस्कारांनी गौरविले गेले. अर्थात पुरस्कारांसाठी कधीही काम न केलेल्या दादांनी या सर्व पुरस्कारांचा भगवंताचे प्रेमपत्र या पवित्र भावनेने स्वीकार केला. अशा या मनुष्य गौरव प्रदात्याचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे व 19 ऑक्टोबर 2020 रोजी दादांचा 100 वा जन्मदिवस आहे. मनुष्य गौरव दिन तसेच दादांच्या जन्मशताब्दी पर्वात दादांना भावपूर्ण वंदन!

-आमोद दातार

Check Also

सीकेटी विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्तजनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) …

Leave a Reply