बंद असलेला पूल सुरू झाल्याने कोंडी सुटणार
पनवेल ः बातमीदार
कोपरा येथून ओढा ओलांडून खारघरमध्ये प्रवेश करण्यासाठी बंद असलेला पादचारी पूल दुरुस्त करण्याचे काम सिडकोने सुरू केले आले आहे. अनेक महिन्यांपासून बंद असलेला पूल सुरू होणार असल्यामुळे या भागातून खारघरमध्ये रहदारी करणार्या नागरिकांची मोठी गैरसोय दूर होणार आहे. खारघरमधील कोपरा गावाजवळून स्पॅगेटी, घरकूल या सिडकोच्या निवासी वसाहतींसह अनेक ठिकाणांना जोडणारा ओढ्यावरील पूल धोकादायक झाल्यामुळे एकाच मार्गावरून नागरिकांची ये-जा सुरू होती. अनेक वर्षांपूर्वी बांधलेला पूल धोकादायक झाल्यामुळे सिडकोने नवा पूल बांधण्याची मागणी नागरिकांनी केली. हा पूल सिडकोने धोकादायक ठरविला होता. सिडकोने याच पुलाच्या बाजूला नवा पूल बांधल्यामुळे धोकादायक पूल बंद केला. बंद केलेल्या पुलामुळे नव्या पुलावर जास्त गर्दी होऊन वाहनांची कोंडी होऊ लागली. एकावेळी एकच वाहन जात असल्यामुळे या पुलावर कायमस्वरूपी कोंडी होत होती. वास्तूविहार, स्वप्नपूर्ती, स्पॅगेटी, घरकूल आदी भागांसह सिडकोच्या इतर भागांत जाण्यासाठी हा मार्ग अधिक सोयीचा असल्यामुळे नागरिक या पुलावर ये-जा करतात. त्यामुळे सिडकोने एक वर्ष पूल बंद ठेवल्यानंतर 25 लाख रुपये खर्च करून पुलाची डागडुजी करण्याचा निर्णय घेतला. महिंद्रा इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला हे काम दिले. काही दिवसांपूर्वी कामाला सुरुवातदेखील करण्यात आली.
एका वेळी एकाच बाजूचे वाहन पुलावर जाऊ शकत असल्यामुळे वाहतूककोंडी होत आहे. एकमेकांच्या समोर वाहने आल्यास एका वाहनाने माघार घेतल्याशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे अनेक वेळा वाहनचालकांमध्ये शाब्दिक खटके उडतात. पुलाची डागडुजी पूर्ण झाल्यास नागरिकांमध्ये होणारा वाद थांबेल.
-करण गायकर, स्थानिक नागरिक