सिने-नाट्य क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती
पनवेल : रामप्रहर वृत्त
श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या अकराव्या राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेच्या महाअंतिम फेरीला शुक्रवार (दि. 10)पासून पनवेलमध्ये शानदार सुरुवात झाली.
भरघोस रकमेचे पारितोषिक, दर्जेदार आणि उत्कृष्ट आयोजन व आयोजन राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेची वैशिष्ट्ये आहेत. दरवर्षी या स्पर्धेची कलाकार आणि रसिक आतुरतेने वाट पहात असतात. त्या अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष स्पर्धेकडे लागलेले असते. नवोदित कलाकार आणि नाट्यरसिकांना मोठी पर्वणी असलेल्या या अटल करंडकाच्या माध्यमातून 12 जानेवारीपर्यंत राज्यातील उत्कृष्ट एकांकिकांची मेजवानी मिळणार आहे.
शहरातील आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या महाअंतिम फेरीच्या उद्घाटन सोहळ्याला प्रमुख मान्यवर म्हणून सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते विजय गोखले, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल महापालिकेचे उपायुक्त वैभव विधाते, श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे उपाध्यक्ष अरुणशेठ भगत, स्पर्धा प्रमुख व श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे सचिव परेश ठाकूर, सुप्रसिद्ध अभिनेत्री सुकन्या मोने, सुप्रसिद्ध दिग्दर्शक देवेंद्र पेम, विराजस कुलकर्णी, भाजपचे शहर अध्यक्ष अनिल भगत, जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे, सरचिटणीस नितीन पाटील, माजी उपमहापौर चारुशीला घरत, महिला मोर्चाच्या शहर अध्यक्ष राजेश्री वावेकर, माजी नगरसेवक राजू सोनी, अजय बहिरा, विकास घरत, विजय चिपळेकर, प्रदीप भगत, माजी नगरसेविका दर्शना भोईर, श्यामनाथ पुंडे, अभिषेक पटवर्धन, चिन्मय समेळ, गणेश जगताप, स्मिता गांधी यांच्यासह कलाकार, आणि नाट्यरसिक उपस्थित होते.
12 जानेवारीला सायंकाळी 7 वाजता होणार्या पारितोषिक वितरण सोहळ्यात महाअंतिम फेरीतील विजेत्या एकांकिकेला एक लाख रुपये आणि मानाचा अटल करंडक देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे ज्येष्ठ रंगकर्मी सतीश पुळेकर यांचा गौरव रंगभूमीचा पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे.
महाराष्ट्रात नाट्यचळवळ एक मोठी परंपरा आहे. नाट्य क्षेत्रातून कलाकार घडत असतात. त्या अनुषंगाने ही परंपरा कायम रहावी आणि नवोदित कलाकारांना व्यासपीठ मिळावे, त्यांनी आपल्या अंगी असलेले कौशल्य सादर करून या क्षेत्रात उज्वल कामगिरी करावी हा उद्देश अटल करंडकचा राहिला आहे. त्या अनुषंगाने ज्येष्ठ कलाकारांचा आशीर्वाद स्पर्धेला मिळाला आहे. त्यामुळे या स्पर्धेच्या उत्कृष्ट आयोजनाबाबत कटाक्षाने लक्ष देऊन स्पर्धा यशस्वी केली जाते. त्याच पार्श्वभूमीवर दरवर्षी ही स्पर्धा अधिकाधिक समृद्ध करण्यासाठी मेहनत घेतली जात आहे.
-आमदार प्रशांत ठाकूर, अध्यक्ष,अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा