कोरोनाचे संकट अजून टळलेले नाही. परंतु लोकांनी जणु काही कोरोना महामारी संपुष्टात आल्यासारखे वर्तन सुरू केलेले दिसते. गावोगावच्या बाजारपेठांमधली गर्दी बघितली की कोरोनाची दुसरी लाट फार दूर नाही असा नकारात्मक विचार बळावतो. सर्वच ठिकाणी गर्दी टाळायला हवी आहे, तसेच कोरोना रुग्णांना प्रामुख्याने श्वसनाचा त्रास जाणवतो हे लक्षात घेऊन सगळ्यांनीच फटाके फोडणेही टाळायला हवे आहे.
यंदाची दिवाळी काहिशी अनिश्चिततेच्या वातावरणातच उगवणार आहे. एरव्ही दिवाळीचा सण उंबरठ्यावर आला की बाजारपेठा, दुकाने, मॉल वगैरे गजबजून जातात. खरेदीचा सपाटा सुरू होतो. यंदाही थोडेफार तसेच चित्र दिसत असले तरी ते पोटात गोळा आणणारे आहे हे लक्षात घ्यायला हवे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल, पुणे, नाशिक अशा शहरांमध्ये प्रचंड गर्दीने वाहून जाणारे रस्ते पाहिले की कुठल्याही सुजाण नागरिकाच्या छातीचा ठोका चुकल्याशिवाय राहणार नाही. कोरोनाच्या दुसर्या लाटेला आपणच आमंत्रण देत आहोत हे लोकांनीच ओळखायला हवे आहे. मुंबई महानगरपालिकेने दिवाळीच्या दिवसांमध्ये फटाके उडवण्यावर निर्बंध आणले आहेत. नव्या नियमावलीनुसार लक्ष्मीपूजनाच्या दिवशी संध्याकाळी सौम्य स्वरुपाचे फटाके वाजवता येतील. ते देखील घर किंवा सोसायटीच्या आवारातच. सार्वजनिक ठिकाणी फटाके उडवल्यास ते कठोर कारवाईला निमंत्रण ठरेल. जिमखाना, क्लब, मोकळे रस्ते वा उद्याने अशा ठिकाणी फटाके फोडण्यास सक्त मनाई आहे. कोरोना रुग्णांना जाणवणारा श्वसनाचा त्रास लक्षात घेऊन ही नियमावली तयार करण्यात आली आहे हे लक्षात घ्यायला हवे. राजधानी दिल्लीच्या परिसरात राष्ट्रीय हरित लवादाने फटाक्यांवर व आतषबाजीवर सरसकट बंदी लादली आहे. दिल्ली परिसराला असह्य प्रदूषणाचा त्रास गेली अनेक वर्षे भेडसावतो आहे. फटाक्यांमुळे प्रदूषणाच्या पातळीत घातक स्वरुपाची वाढ होऊन ते कोरोनालाच बोलावणे ठरेल. मुंबई व आसपासच्या परिसराची परिस्थिती दिल्लीपेक्षा काही वेगळी नाही. येथे गर्दी ही सर्वात मोठी समस्या आहे. त्यामुळे कोरोनाच्या लागणीसंदर्भात काळजी घेणे गरजेचे ठरते. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी संध्याकाळी फटाके फोडणार्यांनीही मोकळीकीचा गैरफायदा घेऊ नये. किंबहुना, फटाक्यांच्या संदर्भात नागरिकांनी स्वत:हून काही निर्बंध पाळायला हवेत अशी अपेक्षा आहे. ती रास्तच म्हणावी लागेल. यंदाच्या वर्षी असलेली अभूतपूर्व परिस्थिती जाणून घेऊन सामाजिक निर्बंध स्वीकारले तर कोरोनाची दुसरी लाट नक्कीच रोखता येईल. दिवाळीच्या दिवसांमध्ये एकमेकांकडे जाणे-येणे होते. आप्तेष्टांनी एकत्र मिळून दिवाळी साजरी करण्याचा आनंद काही औरच असतो हे खरे. पण यंदा हा मोह टाळणे इष्ट ठरावे. फुलबाजा लावताना किंवा दाराशी दिवा लावताना काळजी घ्यावी. अशा वेळी सॅनिटायजरचा वापर पूर्णत: टाळावा. सॅनिटायजरमध्ये अल्कोहोलचे प्रमाण अधिक असते व ते अतिशय ज्वालाग्राही असते. त्याच प्रमाणे यंदाची दिवाळी ही बचतीची दिवाळी म्हणून साजरी करण्यात यावी असे वाटते. गेल्या काही महिन्यांमध्ये कोरोनामुळे अनेक कुटुंबे देशोधडीला लागली. कित्येक व्यवसाय उद्ध्वस्त झाले. अनेकांच्या नोकर्यांवर गदा आली. यंदाच्या दिवाळीत वायफळ खर्च टाळून एखाद्या तरी व्यक्तीला आपण साह्यभूत ठरू शकलो तरी खर्या अर्थाने दिवाळी साजरी होईल. मुंबई महापालिकेने जाहीर केलेल्या दिवाळीविषयक नियमावलीतील सगळीच कलमे ही समाजहिताच्या दृष्टीने सगळ्यांनीच स्वीकारली पाहिजेत.