Breaking News

पनवेल शहर बॉक्सिंग संघटनेची होणार स्थापना

पनवेल ः रामप्रहर वृत्त – पनवेल शहर बॉक्सिंग संघटनेची स्थापना करण्यात येणार असून यासाठी इच्छुक व्यक्ती तसेच संस्थांनी यामध्ये सहभाग घ्यावा, असे आवाहन राज्य संघटनेचे उपाध्यक्ष व विकसन संचालक भरतकुमार व्हावळ यांनी केले आहे.

भारतीय क्रीडा प्राधिकरणाने ऑलिम्पिककरिता शिफारस केलेल्या सहा निवडक क्रीडा प्रकारांत बॉक्सिंग या क्रीडा प्रकाराचा दुसरा क्रमांक लागतो. आशियाई कॉमनवेल्थ विजेते, ऑलिम्पिक पदके भारतास मिळवून देणार्‍या क्रीडा क्षेत्रात आपल्या महाराष्ट्राचेही भक्कम योगदान व स्थान आहे. देशातील बॉक्सिंगमधील प्रथम ध्यानचंद जीवनगौरव व अर्जुन पुरस्कारासह बॉक्सिंगच्या पहिल्या पद्मश्री पुरस्काराबरोबरच सन 1950 सालच्या पहिल्या राष्ट्रीय स्पर्धेसह नियमितपणे अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धांचे आयोजनही महाराष्ट्रातच करण्यात आले होते. राज्य अजिंक्यपद स्पर्धा, प्रशिक्षण शिबिर व राष्ट्रीय स्पर्धेतील सहभाग गेली 95 वर्षे नियमितपणे आयोजित करून चांगले खेळाडू घडविण्याव्यतिरिक्त ऑलिम्पिक, आशियाई व कॉमनवेल्थ स्पर्धेत भारतातून पाठविण्यात आलेल्या भारतीय पंचाधिकार्‍यांतील सर्वांत जास्त पंचाधिकारी महाराष्ट्रातूनच घडले. हे या राज्य संघटनेच्या कर्तव्यपूर्ण कार्याचे द्योतक आहे.

बॉक्सिंग या ऑलिम्पिक क्रीडा प्रकाराचा प्रसार-प्रचार महाराष्ट्रातील ग्रामीण भागात नेण्याचा राज्य संघटनेचा निर्धार आहे. या धोरणामुळे पनवेल शहर येथील अनेक लोकांचे व संस्थांचे अर्ज राज्य संघटनेकडे आले आहेत, परंतु राज्य संघटना सर्वसमावेशक अशा पनवेल शहर बॉक्सिंग संघटनेची स्थापना करू इच्छित आहे. त्यामुळे या खेळाच्या पनवेल शहर येथील जडणघडणीशी इच्छुक लोकांकडून व समूहाकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

नजीकच्या काळात राज्य संघटनेची समिती पनवेल शहराला भेट देणार आहे. त्या वेळी सर्व इच्छुकांना बरोबर घेऊन जिल्हा, शहर संघटना स्थापना तसेच शहर, जिल्हा संघटनेचा कार्यविस्तार यावर सखोल चर्चा करून ठोस निर्णय घेण्यात येणार असून शहर संघटनेत रितसर सहभागासाठी पनवेल शहर क्षेत्रातील इच्छुक व्यक्ती, व्यक्ती समूह तसेच संस्थांनी राज्य संघटनेच्या मुंबईतील कार्यालयात त्वरित लेखी अर्ज करावे किंवा अद्वैत शेंबवणेकर 9870407804, 7045222324 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन असोसिएशनच्या वतीने करण्यात आले आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply