Breaking News

रायगड जिल्ह्यात लेप्टोची साथ

जिल्हा परिषदेच्या आरोग्य यंत्रणेला मात्र गांभीर्य नाही

अलिबाग : प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यात कोरोनाचा प्रभाव काहीसा कमी झाला आहे, मात्र जिल्ह्यात लेप्टोस्पायरोसीसचे रुग्ण वाढत आहेत. अलिबाग व पेण तालुक्यात लेप्टोमुळे काहींच्या मृत्यू झाला आहे. या साथीमुळे ग्रामीण भागातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे, मात्र रायगड जिल्हा परिषदेची आरोग्य यंत्रणा याकडे गांभीर्याने पाहत नसल्याचे चित्र आहे. लेप्टोच्या रुग्णांबाबत जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे माहितीच नाही.
लेप्टोस्पायरेसीस या आजाराचा फैलाव जनावरांच्या मलमूत्रातून होत असतो. विशेषतः शेतामध्ये धान्य खाण्यासाठी येणारे उंदीर या आजाराचा फैलाव अधिक करतात. त्यामुळे दरवर्षी साधारण भातकापणीच्या हंगामात या रोगाचा प्रसार होत असतो. पायाला किंवा हाताला जखम झाली असेल, तर त्याद्वारे जनावरांच्या मलमूत्राने दूषित झालेले पाणी शरीरात शिरते आणि हा आजार उद्भवतो.
सध्या जिल्ह्यात भातकापणी सुरू आहे. मागील काही दिवसांमध्ये अलिबाग व पेण तालुक्यात लेप्टोमुळे काही शेतकर्‍यांचा मृत्यू झाला. अलिबाग तालुक्यातील धोकवडे येथील लेप्टोच्या संशयित रुग्णाचा मुंबईतील लीलावती रुग्णालयात मृत्यू झाला, तर नागाव ग्रामपंचायत हद्दीत तीन संशयित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
पेण तालुक्यातदेखील लेप्टोचे संशयित रुग्ण असल्याचे जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती प्रमोद पाटील यांनी सांगितले, मात्र आरोग्य यंत्रणा याबाबत अनभिज्ञ आहे. त्यांना काहीच माहिती नाही. आरोग्य यंत्रणा लेप्टो गांभीर्याने घेत नाही, असा आरोप पाटील यांनी केला आहे.
लेप्टोस्पायरोसीस या आजाराचा फैलाव जनावरांच्या मलमूत्रातून होत असतो. शेतात साचलेल्या पाण्यात काम करणार्‍यांना हा आजार होण्याची जास्त शक्यता असते. आजाराकडे दुर्लक्ष झाल्यास आणि वेळीच उपचार न घेतल्यास तो बळावून त्यात रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे भातकापणीसाठी शेतात जाताना काळजी घ्या. काम करताना पायात गमबूट घाला. जखमा झाल्या असतील तर त्यावर तातडीने उपचार करा, असे आवाहन   आवाहन आरोग्य यंत्रणेने केले आहे.  

जिल्ह्यात लेप्टोस्पायरेसीस या आजाराची चाचणी करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात यंत्रणा कार्यान्वित आहे. ही चाचणी पूर्णपणे मोफत केली जाते. संशयित रुग्णांनी आपली चाचणी करून घेणे गरजेचे आहे. वेळीच उपचार न घेतल्यास रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो.  त्यामुळे दुर्लक्ष करू नका. तातडीने तपासणी करून उपचार घ्यावेत. भात कापणीसाठी जाणार असाल तर डॉक्सीसायक्लीन गोळ्या घ्या.
-डॉ. सुहास माने, जिल्हा शल्यचिकीत्सक रायगड

Check Also

खांदा कॉलनीतील ‘उबाठा’चे पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लागलेली गळती सुरूच …

Leave a Reply