नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
खाद्याच्या शोधात दरवर्षी नवी मुंबईतील खाडीकिनारी परदेशी पक्षी येत असतात. करावे आणि खारघरच्या खाडीकिनार्यावर सध्या पॅसिफिक गोल्डन प्लोव्हर (सोनचिखल्या वा सोनटिटवी) हा परदेशी पाहुणा आला असून पक्षीप्रेमींना आकर्षित करीत आहेत. या पक्ष्यांचा मुक्काम पुढील दोन आठवडे असून त्यानंतर पुढील प्रवास सुरू होईल, असे पक्षीमित्र नीलेश तांडेल यांनी सांगितले. खाद्याच्या शोधात अलास्का येथून म्हणजेच नऊ हजार 800 किलोमीटरचे अंतर कापून हा पक्षी आल्याचे तांडेल यांनी सांगितले. इंग्रजीत या पक्ष्याचे नाव पॅसिफिक गोल्डन प्लोव्हर असून मराठीत त्याला सोनचिखल्या वा सोनटिटवी असे म्हणतात. संस्कृतमध्ये स्वर्ण टिट्टम असे म्हटले जाते. दररोज किमान दोन हजार किलोमीटरचे अंतर हा पक्षी प्रवास करतो. आशिया खंडात मुक्कामाचे त्याचे आवडते ठिकाण म्हणजे खाडीकिनारा आहे. नवी मुंबईच्या खाडीकिनारी मुबलक खाद्य मिळत असल्याने तो या ठिकाणी येत असतो. त्याच्या पाठीवरील सोनेरी, करडे ठिपके अधिकच खुलून दिसतात. या पक्ष्यासह गॉड विट (पाणटिटवा), युरेशियन पक्षी स्टीट्स (शेकोट्या), कोरेला (ठिपक्यांचा तिलब्रा), सॅण्ड पायलर (तिंबा), पाइड अव्होकेड (उचल्या), कॉमन स्पाइप (पाणकावळा) हे पक्षीही दिसू लागले आहेत.