Breaking News

कोविशिल्ड लशीचा प्रयोग

प्रादुर्भाव कमी झालेल्या कोरोनाने देशात पुन्हा डोके वर काढले आहे. दिवाळीनंतर रुग्णवाढ अपेक्षितच होती. नियमांचे उल्लंघन केल्यावर दुसरे काय होणार. सध्या काही देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली असल्याने हिवाळ्यात आपल्याकडेही भीती व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर निर्बंध लागू होत आहेत, तर दुसरीकडे लशीसाठीचे संशोधनही जोमाने सुरू आहे.

2020 हे वर्ष संपायला आले. वर्षभर एकाच गोष्टीवर अवघ्या जगाचे लक्ष केंद्रित होते आणि आजही आहे ते म्हणजे कोरोना. या विषाणूने अक्षरश: होत्याचे नव्हते केले. आपल्याकडे मार्च महिन्याच्या उत्तरार्धापासून सुरू झालेला कोरोनाचा फैलाव व सोबतच दहशत सप्टेंबरपर्यंत कायम होती. या काळात सारे काही बदलले व ते सर्वांनीच अनुभवले आहे. सहा महिन्यांनंतरया महामारीची तीव्रता कमी झाली. त्या दृष्टीने ऑक्टोबर दिलासादायक ठरला. सुरुवातीला जसे रुग्ण आढळत असत तशी संख्या विरळ होत गेली. त्यामुळे बेफिकीरपणा वाढला आहे. मग रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागली आहे. दिवाळी व अन्य सण-उत्सव लक्षात घेता रुग्ण वाढतील असा अंदाज होताच. तसे ते वाढेलही. तरी युरोप, अमेरिकेत कोरोनाची दुसरी लाट आली असल्याने आपल्याकडेही हिवाळ्यात रुग्ण वाढण्याची भीती आहे. त्या दृष्टीने कोविड-19वरील लस अत्यंत आवश्यक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून ही बाब दुर्लक्षित कशी होईल. सुरुवातीलाच त्यांनी लॉकडाऊन तसेच अन्य कडक निर्णय घेतल्याने आपल्या देशाची एवढी मोठी लोकसंख्या असूनही कोरोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या इतर देशांच्या तुलनेत कमी आहे. पंतप्रधान मोदींनी शनिवारी एकाच दिवशी अहमदाबाद, हैदराबाद आणि पुणे या तीन शहरांचा दौरा करून कोरोनावरील लस उत्पादनाची पाहणी करून आढावा घेतला. यापैकी पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या कंपनीची लसनिर्मिती महत्त्वाची मानली जात आहे. कोरोनावरील लसीवर संशोधन करणार्‍या ऑक्स्फर्ड विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांना प्राथमिक यश मिळाल्यावर लगेच त्या फॉर्म्युलाचा उपयोग करून सीरम इन्स्टिट्यूटने कोरोनावरील कोविशिल्ड या लसीचे डोस बनवणे सुरू केले. यासाठी ऑक्सफर्ड-अस्त्राझेनेकासोबत करार करण्यात आला आहे. या अंतर्गत आतापर्यंत चार कोटी डोसची निर्मिती केली असून, जुलै 2021पर्यंत 30 ते 40 कोटी डोस उपलब्ध केले जाणार आहेत. विशेष म्हणजे सर्वसामान्य जनतेला परवडेल अशीच लशीची किंमत असणार असल्याचे ‘सीरम’चे अदर पुनावाला यांनी म्हटले आहे. त्याचप्रमाणे ही लस सुरुवातीला भारतीय लोकांना दिली जाईल, असेही त्यांनी जाहीर केलंय. आता कंपनीकडून सरकारकडे परवान्यासाठी अर्ज केला जाणार आहे. एकंदर पाहता हा प्रयोग यशस्वी झाला तर भारताचे हे मोठे यश असेल तसेच त्यातून संपूर्ण जगाला दिलासा मिळू शकतो. म्हणूनच पंतप्रधान मोदींनी पुण्यात येऊन याबाबतची वाटचाल जाणून घेतली तसेच निर्मात्या कंपन्या आणि शास्त्रज्ञांना शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान मोदी कोणत्याही चांगल्या गोष्टीला प्रोत्साहन देण्यासाठी स्वत:हून पुढे आल्याचे अनेकदा देशवासीयांनी पाहिले आहे. मग ते भारतीय जवानांसाठी असो की ‘इस्रो’च्या शास्त्रज्ञांसाठी असो. आताही एका कोरोना महामारीतून नागरिकांच्या संरक्षणासाठी ते सरसावले आहेत. त्यांचे प्रत्येक पाऊल हे देशहिताचे आहे. कोरोनावरील लसनिर्मितीला त्यांनी पाठबळ दिले आहे. आता या लशीचा प्रयोग यशस्वी व्हावा हीच समस्त देशवासीयांची इच्छा आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply