Breaking News

उरणमध्ये मासळीची आवक घटली

प्रदूषणाचा मच्छीमारांना फटका; आर्थिक नुकसान

उरण : प्रतिनिधी – रायगड जिल्ह्याचा 240 किमीचा विस्तीर्ण सागरी किनारा मासेमारीसाठी अनुकूल असला तरी मागील काही वर्षांत या किनारपट्टीवर प्रदूषण वाढले आहे. आर्थिक लाभासाठी केल्या जात असलेल्या बेसुमार मासेमारीमुळे किनार्‍याच्या परिसरात आढळणार्‍या माश्यांच्या विविध जातीही नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. परिणामी पारंपरिक व्यवसाय करणार्‍या मच्छीमार बांधवांना चिंता आहे ती मत्स्य दुष्काळाची.

रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील करंजा व मोरा हा परिसर मासेमारीसाठी प्रसिद्ध आहे. या किनार्‍यावर कोळी समाजाची मोठी वस्ती आहे. या सागरी संपन्न किनार्‍याने कोळी समाजाची नेहमीच भरभराट केली आहे. आजही येथे पारंपरिक पद्धतीने सुरू असलेला मासेमारीचा व्यवसाय कोळी बांधवांच्या रोजीरोटीचे मुख्य साधन आहे. काही मंडळींनी पारंपरिक पद्धतीमध्ये बदल घडवून या व्यवसायात आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून व्यवसायात वृद्धी केली आहे. आजही उरणच्या खाडी किनार्‍यावर कोळी समाजाचा मासेमारी हाच प्रमुख व्यवसाय आहे.

या खाडीत मिळणारे बोंबील, ढोमी, मांदेली, घोळ, कलेट, कोळंबी, शिंगाली, चिंबोरी, खुबे, कालवे, निवट्या इत्यादी माश्यांचे प्रकार हे कोळी बांधवांना दैनंदिन रोटीरोजी मिळवून देतात. त्यामुळे तेथील कोळी बांधवांनी माश्यांची निर्यातही सुरू केली आहे. त्यासाठी उरण तालुक्यातील दिघोडे येथे मत्स्यप्रक्रिया सहकारी कारखानाही सुरू करण्यात आला आहे. या ठिकाणाहून मिळालेली मासळी केवळ महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातच पाठविली जात नसून देशांतील सर्व राज्यात ती पाठविली जाते. परंतु गेल्या काही वर्षांत या व्यवसायात अनेक अडचणी उदभवू लागल्या आहेत. जलप्रदूषणामुळे या व्यवसायावर फार मोठे संकट आले आहे.

डिझेल परतावा, होड्या बांधणी व दुरुस्तीसाठी आवश्यक जागा नसणे, मासळी सुकविण्यासाठी जागा नसणे, कोल्ड स्टोअरेजची व्यवस्था नसणे, महिलांना मासे विक्रीसाठी अपुरी व्यवस्था तसेच  बेसुमार खारफुटीची कत्तल यामुळे या क्षेत्रांतील भागातून नाहीशा होणार्‍या माशांच्या जाती याला जबाबदार कोण? अशी अनेक संकटे, समस्या आज पारंपारिक पद्धतीने मासेमारी करणार्‍या मच्छीमार बांधवांच्या समोर आव्हान म्हणून उभे ठाकली आहेत. अशा स्थितीत राज्य शासन केवळ घोषणाबाजी पलीकडे काही करू शकले नाही. तेव्हा वर्षानुवर्षे दर्या सारंग हा उपेक्षितच राहिला आहे.

माश्यांच्या फक्त 78 जाती शिल्लक

जलप्रदूषणामुळेे किनार्‍यालगत आणि खाडीत मासळीचे प्रमाण घटले आहे. सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन या संस्थेने केलेल्या संशोधनानुसार मुंबई रायगडच्या सागरी व खाडी परिसरातील 125 माश्यांच्या जाती होत्या. त्यापैकी आता फक्त 78 जाती शिल्लक आहेत. 20 ते 25 वर्षांच्या काळात या ठिकाणी अतिरिक्त मासेमारी करण्यात आली. शिवाय मासेमारीसाठी पर्शियन जाळ्यांचा वापर तसेच एलइडी पद्धतीने मासेमारी करण्यात आली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मासेमारी झाली.

Check Also

दुर्गम भागातील विद्यार्थी सक्षम करण्यासाठी आमची तळमळ -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्ततळागाळात दुर्गम भागातील विद्यार्थी सक्षमपणे सामोरे जायला पाहिजे ही आमची तळमळ असते, …

Leave a Reply