Breaking News

आत्मनिर्भर युवा-आत्मनिर्भर भारत  

भाजप युवा मोर्चा करणार स्वदेशीचा जागर

पनवेल : रामप्रहर वृत्त
‘आत्मनिर्भर युवा-आत्मनिर्भर भारत’ या उपक्रमाद्वारे युवकांमध्ये विदेशी बनावटीच्या वस्तूंऐवजी स्वदेशी विकल्पाबद्दल प्रसार व प्रचार करण्यासंदर्भात युवा मोर्चा जिल्हाभरात युवकांमध्ये जागृती करणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाने प्रभावित होऊन भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेतून ‘आत्मनिर्भर युवा-आत्मनिर्भर भारत’ या स्वदेशी वस्तूंचा वापर रोजच्या जीवनात वाढविण्यासाठीचा उपक्रम भाजप युवा मोर्चाने हाती घेतला आहे. चिनी बनावटीच्या वस्तूंवर बहिष्कार घालताना जिल्हाभरातील युवकांमध्ये भारतीय बनावटीच्या वस्तू वापरण्यासाठीचा सकारात्मक प्रचार व प्रसार करण्यासाठी या उपक्रमाद्वारे युवा मोर्चाचे कार्यकर्ते सज्ज झाले आहेत.
2022 साली येत्या 75व्या स्वातंत्र्यदिनापर्यंत रोजच्या जीवनात वापरल्या जाणार्‍या वस्तूंपैकी किमान 75 टक्के भारतीय बनावटीच्या (मेड इन इंडिया) वस्तू वापरण्याचा निर्धार करण्यासाठी येत्या रविवारी (दि. 21) जागतिक योग दिनाचे औचित्य साधून आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली युवा मोर्चाच्या पदाधिकार्‍यांसमवेत शेकडो युवक ऑनलाइन प्रतिज्ञा घेणार आहेत.
हिंदुस्थान लिव्हर (युनिलिव्हर)सारख्या अनेक नामांकित कंपन्या आता भारतात स्वत:चे उत्पादन करतात. भारताबाहेर बनणार्‍या उत्पादनातून परदेशातील लोकांना रोजगार मिळवण्याची व पैसा कमावण्याची संधी देण्यापेक्षा अशा वस्तूंचे भारतात बनणारे उत्तम दर्जाचे व किफायतशीर पर्याय कोणते याची माहिती देणारे व जनजागृती करणारे ‘आत्मनिर्भर युवा, आत्मनिर्भर भारत’ या नावाचे फेसबुक पेज व ग्रुप युवा मोर्चाने तयार केले आहेत. या फेसबुक पेजवर आपल्याला लागणार्‍या वस्तूंचा भारतात तयार होणारा विकल्पदेखील सुचवला जाईल अशी व्यवस्था आहे.
प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ, देशावर निस्सीम प्रेम करणारे लडाखचे सोनम वांगचूक यांनी चीनला नमवण्यासाठी ‘वॉलेट से मारेंगे चीन को,’ असे आवाहन केले आहे. त्यासाठी प्रत्यक्ष पुढाकार जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर यांच्या नेतृत्वाखाली भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते घेत आहेत.

Check Also

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयासह भव्य मूट कोर्टचे बुधवारी उद्घाटन

उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सोहळा पनवेल ः रामप्रहर वृत्तजनार्दन भगत शिक्षण प्रसारक …

Leave a Reply