Breaking News

सोनिया गांधींचा ‘लेटरबॉम्ब’

राज्यातील महाविकास आघाडी सरकारला नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले खरे, मात्र तीन पक्षांच्या सरकारमधील कुरबुरी अधूनमधून बाहेर येतच आहेत. विशेषकरून काँग्रेस नेत्यांमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून डावलले जात असल्याची भावना आहे. याची दखल आता थेट काँग्रेस हायकमांडने घेतली असून, मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे नाराजी दर्शविली आहे.

खरेतर महाविकास आघाडीत सहभागी होण्यासाठी काँग्रेस नेतृत्व तयार नव्हते. हिंदुत्ववादी म्हणून ओळखल्या जाणार्‍या शिवसेनेसोबत कसे जायचे ही त्यामागची अडचण होती, पण इकडे राज्यातील नेते सत्तेसाठी आसुसलेेले होते. त्यांची अवस्था पाण्यावाचून असलेल्या माशासारखी झाली होती. पाच वर्षे सत्तेविना राहिल्यानंतर आता उरलेसुरले अस्तित्वही गमावून बसू अशी भीती त्यांना होती. शिवसेनेसोबत गेल्यास भाजपला सत्तेपासून दूर ठेवता येईल हे पक्षश्रेष्ठींना पटवून देण्यात अखेर ते यशस्वी ठरले आणि सुरू झाला नवा राजकीय अंक. मुख्यमंत्रिपदी उद्धव ठाकरे यांचे नाव निश्चित करून राष्ट्रवादीने मलईदार खाती आपल्या पारड्यात पाडून घेतली. (म्हणजे उद्या सारे खापर शिवसेनेवर फोडायला मोकळे) मग उरलेेले काँग्रेसच्या ताटात आले. अर्थात तीन पक्षांमध्ये कमी जागा काँग्रेसच्याच आहेत. त्यामुळे त्यांनीही जमवून घेतले, पण जसजसे दिवस पुढे सरकू लागले तशी काँग्रेसमध्ये अस्वस्थता निर्माण होऊ लागली. निर्णयप्रक्रियेत डावलले जाणे, निधी न मिळणे अशा काँग्रेस नेत्यांच्या तक्रारी आहेत. या संदर्भात काँग्रेस नेते व मंत्री अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष व मंत्री बाळासाहेब थोरात यांनी यापूर्वीच नाराजी व्यक्त केली असून, वरिष्ठ नेतृत्वाकडे तक्रारीही केल्या आहेत. त्याची दखल घेत मध्यंतरी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे लक्ष वेधले होते. त्यानंतरही आघाडीत आलबेल नसल्याचे नुकतेच काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रावरून स्पष्ट होते. यापूर्वी महाराष्ट्र सरकारमध्ये सोनिया यांनी हस्तक्षेप केला नव्हता, पण आताचा त्यांचा लेटरबॉम्ब बरेच काही सांगून जातो. या पत्राचा विषय राज्यातील अनुसूचित जाती-जमातींच्या विकासाबाबत कार्यवाही करावी हा असला तरी काँग्रेसच्या नाराजीची योग्य दखल शिवसेना आणि राष्ट्रवादी घेत नसल्यानेच हा पत्रप्रपंच असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यात तथ्यही दिसते. मुळात आघाडीची स्थापना किमान समान कार्यक्रमावर आधारित आहे हे लक्षात घेतले पाहिजे. जेव्हा शिवसेना आणि राष्ट्रवादीचे जुळले होते तेव्हा काँग्रेस राजी नव्हती. अखेर काही अटी-शर्थी टाकून काँग्रेसने सरकारला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे सोनिया यांचे पत्र म्हणजे इशाराच आहे. तुम्ही आम्हाला गृहित धरत असाल, तर आम्ही वेळप्रसंगी पाठिंबा काढूनही घेऊ शकतो हा यामागचा सांगावा आहे. राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेसची अवस्था सध्या बिकट आहे. भाजप एकामागून एक राज्य पादाक्रांत करीत असताना आणि पक्षाचा विस्तार करीत असताना दुसरीकडे काँग्रेसला अंतर्गत बंडाळीने ग्रासले आहे. त्यामुळे ‘हाता’त असलेली राज्ये काँग्रेसला गमवावी लागत आहेत. अशातच पक्षनेतृत्वाची माळ कुणाच्या गळ्यात घालायची, हा काँग्रेससाठी यक्षप्रश्न बनला आहे. राहुल गांधी यांच्या विरोधात पक्षातच नाराजी आहे. स्वत: सोनिया यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे मर्यादा आल्या आहेत. अशा वेळी कुणी डावलत, डिवचत असेल तर काँग्रेस नेते कसे गप्प बसतील. त्याचाच उद्रेक होताना दिसत आहे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply