नववर्षाच्या तोंडावर अवघ्या आरोग्य यंत्रणेला पुन्हा एकदा मोठ्या फैलावाला तोंड देण्यासाठी सज्ज व्हावे लागणार की काय, अशी चिंता निर्माण झाली आहे आणि ही चिंता एकट्या भारताच्याच वाट्याला आली नसून अवघे जगच पुन्हा एकदा या चिंतेतून जात आहे. युरोपात ब्रिटनखेरीज स्पेन, स्वित्झर्लंड, स्वीडन आणि फ्रान्स या देशांत ब्रिटनहून आलेल्या व्यक्तींच्या संपर्कातील काही जणांमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळला आहे. याखेरीज कॅनडा आणि जपानमध्येदेखील हा नवा स्ट्रेन पोहचल्याचे स्पष्ट झाले आहे. जपाननेही महिनाभरासाठी ब्रिटनहून येणार्या प्रवाशांना प्रवेशबंदी घोषित केली आहे.
एकीकडे देशभरातील कोरोना केसेसची आकडेवारी लक्षणीयरीत्या खाली जात आहे. जनसामान्यांमध्ये तर आता कोरोना जवळपास नाहिसाच झाल्याची भावना बळावत आहे. पूर्ववत सुरू झालेले बहुतेक व्यवहार आणि नवे वर्ष अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपल्यामुळे एकंदरच निर्माण झालेले उत्साही वातावरण यामुळे सामान्यांकडून कोरोनासंबंधी प्रतिबंधक उपायांबाबत वाढती हलगर्जी होत असतानाच आपल्या देशातही ब्रिटनमधील कोरोना विषाणूचा नवा स्ट्रेन येऊन थडकला असल्याचे स्पष्ट झाले आहे. सरकारी स्तरावर झालेल्या नोंदींनुसार 25 नोव्हेंबर ते 23 डिसेंबर या काळात ब्रिटनहून तब्बल 33 हजार लोक भारतात आले. यापैकी बहुतेकांचा मागोवा घेऊन त्यांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. यापैकी 114 जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले होते. या रुग्णांच्या नमुन्यांची अधिक तपशिलात पाहणी केली असता यापैकी सहा रुग्णांच्या शरीरात कोरोनाचा नवा स्ट्रेन अर्थात ब्रिटनमध्ये अलीकडच्या काळात सापडलेला नव्या स्वरूपातील कोरोना विषाणू आढळून आला आहे. संपूर्ण देशाकरिता ही पुन्हा एकदा धोक्याची मोठी घंटा आहे. या सर्व रुग्णांचे विलगीकरण करण्यात आले असून त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांनाही क्वारंटाइन करण्यात आले आहे. अर्थातच हे सारे खूपच जिकिरीचे काम आहे. इतरही अनेक प्रवाशांचा मागोवा घेण्याचे काम सुरूच आहे. ब्रिटनमध्ये रुग्णांची तपासणी अतिशय कसून होत असल्यामुळेच हा नवा स्ट्रेन त्या देशात आधी आढळून आला असावा, असे मतही काही शास्त्रज्ञ व्यक्त करीत असून एव्हाना तो जगभरात अनेक देशांत पसरलेला असावा, असा त्यांचा कयास आहे. हा नव्या स्वरूपातील विषाणू अधिक वेगाने पसरणारा आहे, पण तो अधिक घातक आहे अथवा नाही हे मात्र अद्याप पुरते स्पष्ट झालेले नाही. ब्रिटनमध्ये अलीकडच्या काळात रुग्णांमध्ये झालेली प्रचंड वाढ ही या विषाणूमुळे असल्याचे सांगितले जाते. जगभरात आताच्या घडीला जिथे जिथे हा नव्या स्वरूपातील विषाणू आढळला आहे, त्या त्या रुग्णांचा थेट अथवा अन्यथा ब्रिटनशी संपर्क आल्याचेही स्पष्ट झाले आहे. त्यामुळे काही शास्त्रज्ञ ब्रिटनमध्ये पुन्हा कठोर लॉकडाऊनची गरज असल्याचेही म्हणत आहेत. हे सारे अर्थातच आपली चिंता वाढवणारे आहे. कारण गेल्या महिनाभरात ब्रिटनहून भारतात आलेल्या प्रवाशांची संख्या बरीच मोठी असून त्यापैकी अनेकांचा ठावठिकाणा अद्याप सापडलेला नाही. ब्रिटनहून पुण्यात परतलेल्यांची संख्याही सहाशे-सातशेच्या घरात असल्याचे सांगितले जाते. यापैकीही अनेकांचा पत्ता सापडत नसल्याने पोलिसांची मदत घेण्यात येत आहे. एकंदर परिस्थिती पुन्हा एकदा आपण सार्यांनी आत्यंतिक दक्षता घेण्याची गरज अधोरेखित करणारीच आहे.