Breaking News

राज्य मंत्रिमंडळाचा मंगळवारी विस्तार

मुंबई : प्रतिनिधी
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार मंगळवारी (दि. 9) होणार आहे. सकाळी 11 वाजता राजभवनमध्ये शपथविधी सोहळा होईल. याबाबत जनसंपर्क कार्यालयाने पत्रक जारी केले आहे.
या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत भाजपश्रेष्ठींशी चर्चा केली आहे. त्यानुसार काही मंत्री पहिल्या टप्प्यात शपथ घेतील. यात भाजपमधून चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, प्रवीण दरेकर, राधाकृष्ण विखे-पाटील, गणेश नाईक; तर शिंदे गटातून दादा भुसे, उदय सामंत, संदिपान भुमरे, भरत गोगावले, गुलाबराव पाटील, शंभूराज देसाई, दीपक केसरकर, संजय शिरसाठ यांची संभाव्य मंत्री म्हणून चर्चा आहे. याशिवाय अपक्ष आमदार बच्चू कडू यांनाही मंत्रिमंडळात स्थान दिले जाण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगाचा निकाल आल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार होईल.
मुख्यमंत्री शिंदे हे नुकतेच दिल्लीत जाऊन आलेे. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराबाबतच्या चर्चांना उधाण आले होते. अखेर त्यावर शिक्कामोर्तब झाले असून कोणकोणत्या मंत्र्यांचा शपथविधी होतो आणि कुणाला कुठल्या खात्याची जबाबदारी दिली जाते याची उत्सुकता आहे.
पावसाळी अधिवेशन 17 ते 26 ऑगस्टदरम्यान?
राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन पुढे ढकलले जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हे अधिवेशन 10 ते 17 ऑगस्ट या काळात होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती, पण आता ते 17 ते 26 ऑगस्ट या काळात होईल, असे सांगितले जात आहे.  मंत्रिमंडळ विस्तार झाल्यास प्रत्येक मंत्र्याला आपल्या खात्याची जबाबदारी समजून घ्यावी लागणार आहे, कारण काही मंत्री नव्याने शपथ घेणार आहेत. त्यामुळे त्यांना थोडा वेळ देणे आवश्यक आहे. म्हणून अधिवेशन पुढे ढकलण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

Check Also

पनवेल ग्रामीण भागातील रस्त्यांचा होणार विकास

50 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता; आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी व पाठपुराव्याला यश पनवेल …

Leave a Reply